SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

जिगरबाज काकडदरा!

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ पुरस्कारावर काकडदरा या गावाचं नाव कोरलं गेलं. विदर्भातलं काकडदरा हे गाव याआधी कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं, पण या जिगरबाज गावकऱ्यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर काळाची ही चक्र उलटी फिरवली आणि सहा ऑगस्ट रोजी काकडदरा गावात दोन महिने आधीच दिवाळी साजरी झाली. 

साथ प्रत्येकाची

काकडदरा गावात १९८७ सालापासून पाणलोटाची कामं सुरू झाली आहेत मात्र वेगवेगळ्या कारणांनी ही कामं बंद पडली. त्यामुळे जेव्हा पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा काकडदरा गावाने त्यात भाग घेण्याचा निश्चय केला होता.

“आमचं गाव गट-ग्रामपंचायतीत मोडत असल्याने प्रशिक्षणाला तीन जणांनाच जाता आलं. पण आम्ही शाळेत असलेल्या एल.ई.डी. वर चतुरराव आणि चतुराताई यांच्या फिल्म बघून बघून शिकलो. त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं.” गावातील एकमेव पदवीधर असलेले दौलत भाऊ सांगत होते. ४५ दिवसांत सगळ्याच कामात जास्त मदत महिलांची झाली. “महिला नसत्या तर आम्ही काहीच करू शकलो नसतो, त्यांच्याशिवाय हे काम आणि हा मान शक्य नव्हता.” असं मत काकडदरा गावातील  अनेक पुरुषांचं आहे. काकडदरा गावात असे अनेक पुरुष आणि महिला आहेत जे उत्तम एल.बी.एस. बांधण्यात पटाईत आहेत. एप्रिल-मे च्या ४६-४७ डिग्री तापमानातही या लोकांनी काम थांबवलं नाही. चटका देणाऱ्या उन्हात तापलेले गोटे गोळा करताना हात भाजत होते, अशावेळेस सुनिता बाईंनी सगळ्या बायकांना हाताला चिंध्या बांधून काम करण्यास सुचवले. या बायकांच्या हातून तयार झालेले ९० एल.बी.एस. बघून सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचे परीक्षक पोपटराव पवार स्वतः म्हणाले, “महाराष्ट्रात इतक्या उत्तम प्रतीचे एल.बी.एस. मी याआधी पाहिले नाही.” हीच काकडदरावासियांच्या कामाची पावती होती. काकडदराच्या महिलांनी कधी शाळेचे तोंड देखील पाहिलेले नाही. परंतु कोणत्याही पाणलोट उपचारांविषयी त्या अचूक माहिती देतात.

बिन रक्ताची नाती!

मुख्याध्यापक विकास वातकर यांनी श्रमदानातून मुलांना यशाचे धडे दिले

गावात पाचवीपर्यंत शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक विकास वातकर हे ९ वर्षांपूर्वी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यादिवसापासुन आजपर्यंत अनेक वेळा बदली चे योग आले. पण ना गावाने सरांना जाऊ दिलं ना सरांनी गावाला सोडलं. “गावातलं प्रत्येक जण इतकं प्रेमळ आहे की, मला हे माझं कुटूंबच वाटतं. आणि कुटूंबाला सोडून कुठे जाणार.” हे तितकेच आपुलकीचे शब्द आहेत विकास सरांचे. सरांनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्यापासुन स्पर्धा संपेपर्यंत गावाची साथ दिली. कधी शिक्षणातून तर कधी कष्टातून गावाला पुढे नेलं. सकाळी ७ ते २ आणि परत ४ ते ७ अशा कामांच्या वेळात सगळे दिवस विकास सर गावकऱ्यांच्या बरोबरीने उभे राहिले. कुठलाही निर्णय घेतांना सरांचा शब्द हा गावासाठी मोलाचा असतो.

 

 


असंच एक दुसरं उदाहरण म्हणजे मुळचा मराठवाड्यातला इंजिनिअर असलेला कुणाल परदेशी! स्वतःचं शिक्षण आणि गावांमधील समस्या यांची सांगड कुठे घालता येईल या शोधात असलेला कुणाल काकडदरा गावात आला. स्पर्धेचा शेवटचा १ महिना तिथे राहून, त्यांच्यापैकी एक होऊन कुणालने गावाला मदत केली. आपला अनुभव सांगतांना कुणाल म्हणतो, “ते सगळेच दिवस अविस्मरणीय आणि विलक्षण होते. न थकता, न थांबता ४५ दिवस सगळ्यांनी काम केलं. इतकी साधी माणसं, इतकी सरळ माणसं काकडदरात आहेत की त्यांच्याकडे बघून माणूसकी काय असतं ते कळलं.”

“बक्षिसासाठी काम नाही केलं. पण विश्वास होता, पाणी आलं म्हणजे बक्षीस पण येईल. कोणत्याही अशुद्ध गोष्टीचं शुद्धीकरण हे पाण्याचे चार थेंब शिंपडून होतं. गावाच्या समृद्धीला लागलेलं दुष्काळाचं ग्रहण आम्ही आमच्या मेहनतीतून सोडवलं.” असं म्हणत ३७६ लोकसंख्या असलेल्या काकडदरावासियांनी संपूर्ण महाराष्ट्रा समोर उदाहरण ठेवलं आहे की मुठभर लोक एकत्र आली तर आपल्या कामातून जगभर आपलं नाव करू शकतात.