SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

Articles on Water and More

येलमरवाडी… बदलत्या गावाची गोष्ट 

इच्छा नसताना पोटाची खळगी भरण्यासाठी काळ्या आईला सोडून शहरांत जाणाऱ्यांचे पाय पुन्हा आपल्या मातीत खेचून आणण्यासाठी येलमरवाडीच्या तरुणांनी झपाटून काम करायला सुरूवात केली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत येलमरवाडी हे गाव महाराष्ट्रभरातून आघाडीवर आलेल्या १२ गावांपैकी एक होते. वॉटर कप स्पर्धेनिमित्ताने आपल्या गावाचा इतिहास नव्याने लिहण्यासाठी सज्ज झालेल्या या तरुण फळीबद्दल जाणून घेऊ.  

खटाव तालुक्यातलं येलमरवाडी हे गाव २०१५ च्या आधी कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं. गावात ५०० च्या आसपास लोकसंख्या मात्र घरातले सगळे कर्ते पुरूष गिरणीकामगार म्हणून मुंबईतल्या १० बाय १० च्या खोल्यांमध्ये गेले होते. या गावातल्या तुटपूंज्या मतांनी फारसा फरक पडत नसल्याने ना कोणतेही राजकीय पुढारी इथे फिरकले ना कोणत्याही सरकारी योजनांची माहिती या गावांपर्यंत पोहोचली.

पण २०१५ मध्ये अवघं २५ वय असलेले प्रसाद बागल हे सरपंच झाले आणि खऱ्या अर्थाने येलमरवाडी महाराष्ट्राच्या नकाशावर दिसू लागले. येलमरवाडीच्या ग्रामपंचायतीतील सदस्य शिकलेले आणि तरुण आहेत. त्यामुळे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची घोषणा होताच मोठ्या हिरिरीने या गावाने त्यात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. येलमरवाडीला शिकलेला सरपंच मिळाल्याचे अनेक फायदे झाले. प्रसाद बागल यांना मनरेगा या योजनेत होणाऱ्या कामांची तंतोतंत माहिती होती ज्याचा फायदा त्यांना वॉटर कप स्पर्धेसाठी लागणारी सी.सी.टी., डीप सी.सी.टी., शेततळं वगैरे कामांसाठी झाला. शासकीय योजनांचे लाभार्थी होण्यासाठी लागणारे सगळे कागद प्रसाद बागल यांनी जमा केले. मात्र मुख्य अडचण होती ती म्हणजे श्रमदान करण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याची.

“शेतीत पोटाला पुरण्याइतकं धान्य होत नव्हतं कारण पाऊसच नव्हता. बागायती क्षेत्रच नाय आमच्या गावात. त्यामुळे कुटूंबाचं पोट भरायला सगळेच मजुरी करतात. मी पन २५ वर्ष काढली मुंबईत गिरणीकामगार म्हणून.” वयाच्या साठीत पोहोचलेले मसकू बागल यांनी सांगितलं.

पाण्याअभावी शेतात काही पिकत नाही म्हणून येलमरवाडीकरांची ही दुसरी पिढी आजुबाजूच्या गावांमध्ये शेतमजूरी करायला जात होती. त्यामुळे दिवसा बायका आणि लेकरांशिवाय गावात कोणीही गडीमाणूस नसायचं. लोकांना गावातच रोजगार मिळावा आणि वॉटर कप स्पर्धेसाठीचं पाणलोटाचं कामही व्हावं यासाठी काहीतरी करण्याची गरज होती. “लोकांना त्यांचा रोजगार सोडून गावातल्या पाणलोटाच्या श्रमदानासाठी बोलावलं तर त्यांचा घरप्रपंच कसा चालणार? लोक कामावर येणार नाही असं सुरूवातीला वाटलं होतं. पण सरपंचांना मनरेगाची चांगली माहिती होती. त्यामुळे आम्ही कृषी विभागातून २३ लाखांची सी.सी.टी. मंजूर करून घेतली जेणेकरून लोकांना रोजगारही मिळाला आणि स्पर्धेसाठीचं श्रमदानही गावकऱ्यांनी केलं.” पाणलोटाचं ट्रेनिंग घेऊन आलेल्या ३२ वर्षांच्या सुरेश बागल यांनी उत्साहाने सांगितलं.

गावातले तरूण हे येलमरवाडीची खरी शक्ती आहेत. श्रमदान असो की मशिनने करायची कामं… ही सगळी तरुण मंडळी रात्रीचा दिवस करत होती. अनेकजण तर झोपायलाच माळावर जात होते. गेली अनेक वर्षे हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक तरूण श्रमदानाच्या या प्रक्रियेत पूर्ण बदलले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने तरुण आपल्या गावाबाबत जास्त विचार करू लागले याचा पुरावा गावकऱ्यांना लवकरच मिळाला.

“पाऊस झाला तेव्हा आम्ही सगळी पोरं भिजायला आणि माळावर पाणी भरलंय का ते बघायला बाहेर पडलो. त्यावेळी पाझर तलावाजवळून पाण्याचा ओघळ भलत्याच दिशेने वाहत चालला होता. त्याचा मार्ग आम्ही केलेल्या कामांकडे वळवणं गरजेचं होतं तेव्हाच त्यात पाणी साठणार होतं. लगेच आमच्यातले दोन जण त्या पाण्यात आडवे झाले आणि इतर दगड लावण्यासाठी धावपळ करू लागले. जवळपास अर्ध्या तासाने तो ओघळ योग्य दिशेने वळवण्यात आम्हाला यश आलं.” सुहास बागल या २२ वर्षांच्या तरुणाने सांगितलेली ही आठवण ऐकली की त्यांच्यात झालेल्या बदलाची प्रचिती येते.

गावातले तरुण आज अनेक आघाड्यांवर काम करत आहेत. सरपंच प्रसाद बागल यांनी गावातल्या प्रत्येकाची कागदपत्र, जॉब कार्ड, फोटो वगैरे सगळी माहिती स्कॅन करून ग्रामपंचायतीच्या कॉम्प्युटरमध्ये साठवून ठेवल्या आहेत. याच पद्धतीने ते शेतकऱ्यांना शेततळ्याचे, ट्रॅक्टरसाठीचे अनुदान मिळवून देतात. गावाच्या वॉट्सअप ग्रुपवर कोणाला अनुदान पाहिजे, पाणलोटाचं काम कुठवर आलंय, पाणी भरलंय का अशी सगळी माहिती फोटोंसह शेअर केली जाते. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या मात्र कुटूंब गावात असलेल्या येलमरवाडीच्या चाकरमान्यालाही आपल्या गावाची इत्थंभूत माहिती सतत मिळत राहते.

येलमरवाडी गावाने अनेक वर्षे दुष्काळाची बघितली, अनेक लहान मुलांनी तर साठलेलं पाणी याआधी बघितलंच नव्हतं. त्याच गावाच्या उंबरठ्यावर असलेला पाण्याने भरलेला बंधारा गावात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करतोय. पाणी आल्यामुळे बंधाऱ्यावर पाणपक्षी विहार करताना दिसू लागले आहेत. माळरानात मोर आणि ससेही परत आले आहेत. हीच बदलाची नांदी आहे.


पळसखेडा – श्रमदानाचा आदर्श ठेवणारं गाव!

सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ मध्ये गावाचा सहभाग नसतांनाही बाजूच्या गावाचं काम बघून बघून गेल्यावर्षीच श्रमदानाची चळवळ उभं करणारं गाव म्हणजे यंदाच्या वॉटर कप मध्ये तृतीय क्रमांक पटकवणारे केज तालुक्यातील आदर्शगाव पळसखेडा.

वॉटर कप स्पर्धेदरम्यान ४५ दिवसांत ४७ ग्रामसभा घेणारं मराठवाड्यातलं एकमेव गाव पळसखेडा आपल्या प्रचंड इच्छाशक्ती सहित सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ च्या स्पर्धेत सहभागी झालं. मागच्या वर्षी केलेल्या कामातून मिळालेल्या रिझल्टमुळे यावर्षी लोक मोठ्या संख्येने तयार झाले. जोरो-शोरो से कामाची सुरुवात करणाऱ्या या गावाने शेवटच्या सात दिवसांमध्ये कुलूपबंद श्रमदान केलं. या दिवसांत गावातील एकूण एक घर श्रमदानासाठी गावाबाहेर होतं. गावात इतका शुकशुकाट असायचा की बाहेरून आलेल्या व्यक्तींना या सात दिवसांत एकही माणूस दिसला नाही. या दरम्यान गावाने ज्या बंधाऱ्यातून ४० वर्षांपासून पाणी वाहून जात होतं त्या बंधाऱ्याची दुरुस्ती केली. एरवी लाखांमध्ये होणारी ही दुरुस्ती गावकऱ्यांनी फक्त ४० हजारांत केली. ह्या दुरुस्तीसाठी आणि जलसंधारणाच्या कामासाठी आलेला सगळा खर्च गाव वर्गणीतून करण्यात आला.

गावातील एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणजे त्रिंबक शंकर चव्हाण. सगळं गाव त्यांना जिजा म्हणतं. ७० वर्षांचे जिजा म्हणजे गावातील सगळ्यात तरुण व्यक्ती! स्पर्धेदरम्यान स्वतःच्या शेतातलं काम करून सगळ्या गावाला भल्या पहाटे कामासाठी उठवायचे. १०-१२ तरुण मुलांच्या टीमचे ते कॅप्टन होते. एवढं वय असूनही सगळ्यात जास्त काम जिजा करायचे आणि तेही न थकता. एकही दिवस असा नव्हता की जिजा श्रमदानाला गैरहजर राहिले. सगळ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भरपूर काम केलं. या तरुण टीम बरोबरच जिजा अजून एक टीम सांभाळत होते. ही दुसरी टीम होती ज्येष्ठ नागरिकांची. या टीम मेंबरपैकी तर कित्येक जणांना चालता पण येत नव्हतं. पण जिजांनी त्यांच्याकडूनही काम करून घेतलं. काठी घेऊन चालणाऱ्या या टीम मधल्या कित्येक जणाची काठी ४५ दिवसांनी सुटली. या आधीच्या पिढीने नव्या पिढीच्या बरोबरीने स्पर्धेत आपलं योगदान दिलं.

पळसखेडातील प्रत्येक ग्रामस्थाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांच्या इतक्याच प्रामाणिकपणे जलसंधारणाच्या या कामात कृषी विभागाचीही त्यांना मोठी मदत झाली. स्पर्धा सुरू होण्याच्या आधीपासून कृषी विभागाचे अधिकारी चंद्रकांत थोंटे आणि बी. एस. सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. “आवाज दिल्यावर सगळ्यात आधी ते हजर झाले. कृषी विभागाच्या सहकार्यामुळेच आम्ही हा टप्पा गाठू शकलो,” असं गावकरी सांगतात.

गाव म्हटलं की तिथे अनेक समाजाचे लोक एकत्र राहत असतात. प्रत्येकाचे आचार-विचार वेगळे. या वेगवेगळ्या विचारातून अनेक भेद-तंटे देखील निर्माण होतात आणि मग प्रत्येक जण आपापल्या परीने येणाऱ्या अडचणींवर मात करत असतात. पण काही गावं अशीही असतात जिथे अडचणी आणि समस्यांना जागाच नसते. पळसखेडा हे त्यापैकीच एक गाव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे शक्य झालं ते इथल्या साध्या-सरळ, निःस्वार्थी माणसांमुळे.

पळसखेडात ५०-६० कुटुंब अशी आहेत जी मागासवर्गीय भूमिहीन आहेत. स्वतःच्या मालकीची शेत-जमीन नसतांना या सगळ्या कुटुंबांनी ४५ दिवस खांद्याला खांदा लावून श्रमदानाबरोबरच जलसंधारणाची सगळी कामं केली. त्याच बरोबर सगळ्या गावासाठी अन्नदान केलं. एवढंच नाही तर लोक वर्गणीत देणगी देऊन आपलाही वाटा दिला. आजही त्यांचं कामातलं सातत्य टिकून आहे. दर रविवारी होणाऱ्या कामात त्यांचाही सहभाग असतो. ह्या कुटुंबातील सदस्यांपैकीच असलेल्या प्रसादने त्याच्या भावना व्यक्त केल्या. “आमची शेती नसली तरी हे गाव आमचं आहे, ही जमीन आमची आहे आणि जर पाणीच नसेल तर शेतकरी पिकवेल काय आणि आपण खाणार काय? म्हणून आम्ही ह्या लाखमोलाच्या कामात आमचा हिस्सा दिला आणि यापुढेही देऊ.”  गेल्या कितीतरी वर्षांपासून तंटामुक्त, नालीमुक्त, पाटमुक्त, डासमुक्त, नशामुक्त आणि आगपेटीमुक्त शिवार असलेलं पळसखेडा हे गाव इतरांनी आदर्श घ्यावा असंच आहे.


बिदाल आणि बदल… एकाच नाण्याच्या दोन बाजू!

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेलं गाव म्हणजे बिदाल. हे गाव म्हणजे अनेक सामाजिक बदलांचे उगमस्थान आहे. महाराष्ट्रातल्या इतर गावांमध्ये जेव्हा ग्रामपंचायत निवडणूकीत गटा-तटाचं राजकारण आणि भांडणं होतात तिथेच बिदालमध्ये मात्र गेल्या ५० वर्षांपासून सरपंच पदाची निवड बिनविरोध होत आहे. एखाद्या गोष्टीतच शोभेल अशा बिदाल गावात वॉटर कप स्पर्धेदरम्यान आलेले हे काही अनुभव.

लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या तुलनेत साताऱ्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणजे बिदाल. जवळपास सहा हजारांच्या लोकसंख्येच्या या गावात ५० वर्षांपासून बिनविरोध सरपंच आणि ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांची नेमणूक होत आहे हे विशेष. शासनाने ग्रामपंचायत निवडणूकीत महिला आणि इतर वर्गियांसाठी आरक्षण आणण्याच्या आधीपासून आमच्याकडे आरक्षणाशिवाय आणि बिनविरोध महिला तसेच सगळ्या जातीधर्माचे लोक सरपंच होत आहेत असं इथले रहिवासी अभिमानाने सांगतात.

गावागावातं असलेले राजकीय गट-तट, जातीय किंवा धार्मिक असे कोणतेही तंटे बिदालमध्ये नाहीत. पंचायतीत बसलेले ६८ वर्षांचे चंदुभाई डांगे मोठ्या उत्साहाने सांगत होते. “बिदालमध्ये मुसलमानांची चार घरं आहेत पण आम्ही वेगळे आणि हे वेगळे असा भेद कधीच इथं झाला नाही. मी १९९४ पासूनच्या सगळ्या ग्रामसभा आणि सरपंच पाहिलेत पण कधीही एखाद्या पदासाठी किंवा सामाजिक तेढ म्हणून भांडणं झाल्याचं एकही उदाहरण नाही.”

संपूर्ण बिदाल गाव चंदुभाईंना डांगेचाचा म्हणून आदर देतं. चाचा २५ वर्षे एअर फोर्समध्ये टेक्निशिअन म्हणून काम करत होते. शस्त्रास्त्रांची देखभाल करणं, ती फायटर प्लेनला लावणं असं जोखमीचं आणि जबाबदारीचं काम त्यांनी केलं. कामानिमित्त देशभर फिरलेले चाचा रिटायर झाल्यानंतर गावी परतले. ज्या हातांनी त्यांनी भारतमातेचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली होती त्याच हातांनी आता ते मायमातीचं रक्षण करण करत आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी योजलेल्या सगळ्या कामांमध्ये चाचांनी १०० टक्के वेळ दिला. मोठं क्षेत्रफळ असलेल्या बिदाल गावचा कोपरा न कोपरा या कामासाठी त्यांनी पिंजून काढला. या दगदगीत त्यांना साथ दिली ती त्यांच्या सायकलीने. दररोज वेगवेगळा सुविचार लिहलेली ही सायकल चालवत प्रवास करणारे चाचा हे चित्र बिदालकऱ्यांना इतकं परिचित झालं होतं की एक दिवस जरी चाचांनी खाडा केला तर लोक घरापर्यंत त्यांची विचारपूस करायला पोहोचायचे.

पुढच्या पिढीला दुष्काळापासून सुटका मिळावी या विचाराने बिदालकरांनी श्रमांची शर्थ केली होती. त्यात ६८ वर्षांचे डांगे चाचाही मागे नव्हते. यंदाची ईद त्यांनी शोषखड्डे करून साजरी करायची ठरवली आणि या त्यांच्या निर्णयाला बायको झुबैदा भाभींनी मोकळ्या मनाने पाठींबा दिला. यावर्षीच्या ईदला डांगे परिवाराने घरातल्या कोणालाही नवे कपडे केले नाहीत उलट त्यावर होणारा खर्च पानी फाउंडेशनच्या कामासाठी वापरला. डांगे चाचांसारखेच गावातला प्रत्येकजण जलसंधारण करण्यासाठी झटत होता.

बिदालच्या पुष्पांजली गावच्या आरोग्य खात्यात आशा सेविका म्हणून काम करतात. या स्पर्धेसाठी पानी फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंगला त्या गेल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळामुळे गावातल्या लोकांवर झालेल्या परिणामांच्या त्या साक्षीदार आहेत.

“गेल्या दहा वर्षांपासून आम्ही दुष्काळाशी झुंजतोय. दोन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे चारा छावण्यांचं प्रमाण वाढलं होतं. त्यावेळी गावात एक म्हातारी एकटीच राहत होती. तिच्याकडे असलेली एकुलती एक म्हैस चारा छावणीला घेऊन जात असताना पाण्याच्या टॅंकरखाली चिरडली आणि मेली. आरोग्य खात्यात असल्यामुळे गावाचं आरोग्य कसं बिघडत चाललंय हे मी जवळून बघत होते. या पाण्यापायी अनेक महिलांचा गर्भपातही झालाय. जुलाब, मुतकडा तसंच मुत्राशयाचे अनेक आजार गावातल्या अनेक बायकांना जडले.”

ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर गावातला एकही उंबरठा त्यांनी सोडला नाही.  तब्बल एक महिना घरोघरी बायकांना वेगवेगळी उदाहरणं देत त्या पाणलोटाच्या कामाचं महत्त्व समजावून सांगत होत्या. “घराबाहेर परातीत एक तांब्या पाणी टाकून ठेवा आणि दिवसभरात त्यात किती पाणी राहतं हे पहा.” असं सांगत त्यांनी शाळेत प्रत्येकाने शिकलेल्या बाष्पीभवनाचा थेट प्रयोगच बायकांना करून दाखवला. याचा परिणाम असा झाला की टॅंकर आला की कळशा घेऊन धावणाऱ्या आणि काटकसरीने पाणी वापरणाऱ्यांना पाणी कसं आणि कुठे कुठे वाया जातं याचा हिशोब लावता येऊ लागला. पुष्पांजली ताईंच्या या जिद्दीमुळे बायकांना शोषखड्डे, सी.सी.टी., डीप सी.सी.टी. यांचं महत्त्व समजलं आणि प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यानंतर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून बिदालमधील ‌‍‍‌‍स्त्रीयांनी श्रमदान केलं.

“बिदाल गावातल्या अनेकांकडे स्वतःच वाहन आहे. त्यांच्या बायका घरातून बाहेर पडल्या की थेट गाडीतच बसायच्या. घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या त्या बायकांनी कधी स्वतःचं शेतही बघितलं नव्हतं. अशा बायकासुद्धा स्पर्धेचे ४५ दिवस गावातल्या इतर महिलांसोबत ट्रॅक्टर मध्ये बसायच्या आणि श्रमदान करायच्या.” पुष्पांजली मगर यांनी सांगितलेली ही घटना बिदाल गावातल्या गृहीणींच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती.

खरंतर सहा हजारांच्या बिदाल गावात प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखणं तसं कठीणच पण स्पर्धेदरम्यान होणाऱ्या ग्रामसभा आणि श्रमदानाच्या निमित्ताने वरच्या काही घटनांमधून माणसे एकमेकांना ओळखू लागली. स्वयंप्रेरणेने अनेक बाबतीत बदल करणारे बिदाल आता गावच्या पाण्याबाबतही जागृत झाले आहेत तेव्हा बदल हीच बिदालची दुसरी ओळख पुन्हा एकदा ठळक झाली आहे.

 


भोसरे – पाण्याच्या वेडात दौडणाऱ्या वीरांचं गाव!

शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांचे गाव.  या गावातल्या प्रत्येक माणसात प्रतापरावांची झुंजार वृत्ती दिसून येते. प्रतापरावांचाच वारसा चालवणाऱ्या विश्वास गुजर यांनी गावाचं सेनापतीपद भुषवलं आणि स्पर्धेत २ रा क्रमांक पटकावला.

प्रतापराव गुजरांमुळे इतिहासाच्या पानात सोनेरी अक्षरांत उमटलेलं भोसरे गाव वर्तमानकाळात मात्र दुष्काळाच्या डागण्यांनी बेजार झालं होतं. २००६ पासून पाण्याअभावी शेतीत काही पिकत नाही म्हटल्यावर अनेकांनी पेंटर म्हणून व्यवसाय सुरू केला.  गावातली कर्ती मंडळी मुंबई, पुणे, गुजरात अशा ठिकाणी या व्यवसायानिमित्त पांगली. सारं गाव रीतं झालं. गावात शिक्षण झालेल्या आणि नोकरी व्यवसायानिमित्त शहरांमध्ये स्थायिक झालेल्या भोसरे गावच्या तरुणांना या परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढायचा होता. पाणी आणण्यासाठी गावातल्या आयाबहिणींचे होणारे हाल त्यांना पहावत नव्हते. मात्र नेमकं करायचं काय? या प्रश्नावर येउन सगळेच थांबत होते.

२०१७ मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भोसरे गावाचा समावेश झाला आणि  गावकऱ्यांना एकाएकी सगळे प्रश्न सुटताना दिसले. ज्याप्रमाणे महाराजांच्या एका आज्ञेसाठी केवळ सहा मराठे वीर घेऊन प्रतापराव प्राणपणाने लढले त्याचप्रमाणे दुष्काळरुपी गनिमाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी प्रतापरावांचे वंशज विश्वास गुजर हे भोसरे गावाचे सेनापती झाले.  या युद्धात विश्वास गुजरांबरोबर केवळ सहाच जणच नाही तर संपूर्ण गावच्या गावच सामील झालं.

 

विश्वास गुजर मुंबईत तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत. स्पर्धेचे ४५ दिवस ते गावातच ठाण मांडून बसले होते.  पाणलोटाचं प्रशिक्षण घेऊन आलेल्या गावातल्या पाच जणांसोबत प्रत्येक माळरानावर त्यांनी कित्येकदा खेपा मारल्या.  एकाच गावात शिकून लहानाचे मोठे झालेले विश्वास गुजर आणि त्यांचे उत्साही मित्रगण या सगळ्यांनी मिळून स्पर्धेचं नेतृत्त्व केलं.

“स्पर्धेमुळे आम्ही ४५० खताचे नाडेप तयार केले. प्रत्येकाच्या शेतात एक याप्रमाणे हे नाडेप करून शेतकऱ्यांना त्याची जबाबदारी  दिली. मारुतीच्या रथात जमलेले ३० लाखही यंदा पाणलोटाच्या कामासाठी खर्च केले. पैसे कमी पडले तेव्हा ४० लाखाचं कर्ज काढलं पण काम थांबू दिलं नाही.” गावाशेजारील डोंगरउतारांवर श्रमदानांतून केलेली कामं उत्साहाने दाखवत विश्वास गुजर सांगत होते.

स्पर्धा सुरू होण्याआधी गावात ग्रामसभा बोलावण्यात आली आणि पहिल्यांदाच या ग्रामसभेला झाडून सगळ्या महिलांना बोलावण्यात आलं. “आवं, या मारुतीच्या देवळात लई ग्रामसभा झाल्या पण या स्पर्धेमुळं आणि पाण्यामुळं महिला मिटींगला येऊ लागल्या. १८-१८ किलोमीटरवरून पानी आनायचं. टॅंकर आला की होनारी भांडणं, घरात कार्य काढलं की कर्त्या बाईला एवढं पानी कुठून आनायचं याचीच काळजी आधी लागायची. आता बगा सगळं ठीक होतंय.” सुशीला सतुरे डोक्यावरचा पदर सावरत बोलत होत्या. वृद्ध सुशीलाबाईंप्रमाणेच या गावातल्या अनेकांनी दुष्काळाच्या छायेत दिवस काढले पण आता नातवंडांच्या वाटेला हे भोग येऊ नयेत म्हणून सुशीलाबाईंसकट गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जमेल तसं श्रमदान केलं.

“वडिलोपार्जित बरीच शेती आहे पण २००६ पासून शेतीसाठी काढलेल्या चक्रव्याढ कर्जांत पुरता अडकलो. शेतकरी म्हणून जगता आलं नाही शेवटी १७ वर्षांनी पुन्हा वकीली सुरू केली.” ५४ वर्षीय अंकूर जाधव यांनी मनातली खंत बोलून दाखवली.  पण वॉटर कप स्पर्धेनिमित्ताने पाणलोटाची कामं करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं आणि सगळ्यांच्या मनातल्या नकारात्मक भावना गळून पडल्या.  हाताला काम नाही म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुण मंडळींचं परिवर्तन झालं. मोहन सतुरे, अर्जुन जाधव, नितीन जाधन, साहेबराव कनवाळू अशा कितीतरी लोकांनी आता गाव अधिकाधिक प्रगत आणि सुंदर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. वर्तमानात दुष्काळी गाव म्हणून नोंद झालेलं भोसरे भविष्यकाळात मात्र पाणीदार म्हणून ओळखलं जाईल याची खबरदारी विश्वास गुजर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व गावकरी घेत आहेत.


कणखर जायभायवाडी!

अशक्य, अद्भुत, अविश्वसनीय, अगम्य, अफाट, अचाट, असाधारण हे सगळे शब्द कमी पडावे असं अचंबित काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील जायभायवाडीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांनी दाखवलेल्या चिकाटीबाबत अधिक जाणून घेऊया.

वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त भागात असूनही एक निसर्गरम्य गाव जायभायवाडी! चारही बाजूने डोंगराने वेढलेल्या गावात प्रवेश केल्या केल्या एक वेगळीच उर्जा जाणवते. २१३ लोकसंख्या असलेलं हे गाव आणि माणसं प्रचंड सकारात्मक. आणि म्हणूनच गावं अनेक संकटं धीराने  झेलतंय.

प्राथमिक शाळा सोडून गावात एकही सुविधा नाही. अनेक गावांना शाप असलेला टँकर देखील इथल्या दुर्गम आणि डोंगराळ परिस्थितीमुळे येऊ शकत नाही. गावात कोणतीही बस येत नाही. दवाखाना आणि चौथी नंतरच्या शाळेसाठी ३-४ कि.मी. जावं लागतं. शेती जी काही आहे ती निसर्गाच्या पाण्यावर आहे. प्यायलाच पाणी पुरत नाही तर शेतीचा विषयच नाही. फक्त पावसाळ्यात शेती म्हणजे खरीप हंगाम तेवढाच.

हिवाळा आणि उन्हाळा भयाण दुष्काळ. सप्टेंबर-ऑक्टोबर पासून जोपर्यंत साखर कारखाने चालू आहेत तोपर्यंत उसतोडणीसाठी अख्खं गाव पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये जातं. गावात असतात ती फक्त शाळेत जाणारी मुलं आणि त्यांना सांभाळण्यासाठी वयोवृद्ध. स्वतःच्या गावात उत्पन्नाचे साधन काहीच नसल्याने ही भीषण परिस्थिती न चुकता दरवर्षी गावावर येते. पाऊस आला की एकदमच पडतो आणि सगळं पाणी वाहून जातं. या वाहत्या पाण्याचा वेग प्रचंड असतो कारण गावाच्या सर्व बाजूंनी डोंगर आहे. याच वेगाने वाहणार्‍या पाण्यात मागच्या वर्षी गावातील रुक्खमिणीबाई जायभाय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे पाणी असायचा तेव्हा पुरासारखी परिस्थिति आणि नसेल तेव्हा दुष्काळ. या दुष्टचक्रातून गावाला सुटका हवी होती. गावकऱ्यांची सतत तळमळ की आपण आणि आपलं गाव सुधारायला पाहिजे आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने ती संधी जायभायवाडीकरांकडे चालत आली.

अचंबित सुरुवात

स्पर्धा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी श्रमदानाची घोषणा केली गेली. प्रत्यक्ष स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता फक्त २५ जणं श्रमदानाच्या ठिकाणी बघून हे लोक थोडे नाराज झाले. पहिल्या दिवशीची ही परिस्थिती तर पुढे काय होईल, असा विचार करत असतांनाच रांगाच्या रांगा डोंगराकडे येतांना दिसल्या. आणि पहिल्या दिवशी श्रमदानाला २१३ लोकसंख्या असलेल्या गावात २०० लोक हजर होते. आणि सुरुवातच अशी जोरदार झाल्यावर गावाने मागे वळून नाही पाहिलं. पण संकटं सांगून येत नाहीत.

जोर मनगटाचा

सकाळ-संध्याकाळ जोरात श्रमदान सुरू होतं. कामाचा हा वेग असतांनाच अघटित घडलं. गावात आघाडीवर काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे धर्मराज नावाचा एक तरुण. २०० लोकांकडून काम करून घेण्याची जबाबदारी असलेला एकमेव माणूस. गावातल्या एका बैलाने धर्मराजला अक्षरशः तुडवलं. सगळ्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा झाल्या. काम तर दूर, चालताही येत नाही अशी परिस्थिती. नाकावर, डोक्यावर मिळून सहा टाके पडले. डॉक्टरांनी १५ दिवस हालचालही करायला मनाई केली. गावासमोर खूप मोठं संकट उभं राहिलं.

अंथरुणाला पाठ लागली तरी छाती संकटाचे घाव झेलायला तयार होती… मनगटातली रग कायम होती. तिसऱ्या दिवशी धर्मराज डोंगरावर श्रमदानासाठी हजर झाला. गावाप्रती जबाबदारीची जाणीव आणि तळमळ यामूळे हे शक्य होऊ शकलं. “डॉक्टर साहेब आराम कर मनलेत पन मला बाजवर पडून करमना. जमल तसं करतो.” ही धर्मराज याची भावना सीमेवर लढणार्‍या सैनिकापेक्षा वेगळी नाही.

स्पर्धेच्या काळात अडचणींवर मात करत पुढे जाणाऱ्या अनेक जिद्दी लोकांची नवी ओळख गावाला झाली. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असतांना पोकलेन मशीन चालकाच्या हलगर्जीपणा मूळे कामाचं टार्गेट पूर्ण होणं कठीण होत चाललं होतं. आता काय करायचं? हा प्रश्न समोर आ वासून उभा राहिला. या समस्येवर तात्पुरता तोडगा म्हणून पोकलेन चालवण्याचा कोणताही पुर्वानूभव नसताना ४० वर्षांचे वचिष्ठ जायभाय यांनी धडपडत मशिन चालवायला घेतलं आणि काय आश्चर्य, पुढचे १०-१२ दिवस मशीनचं पूर्ण काम होईपर्यंत वचिष्ठ डोंगरावरून खाली उतरलेच नाहीत. आंघोळ, जेवण, सर्व काही मशिन जवळच. त्यांच्या या प्रयत्नांमूळे कुठेही न थांबता काम करत राहण्याचं बळ इतरांना मिळालं हे निश्चित.

उत्तम चालत असलेला आपला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेलं घर सोडून डॉ. सुंदर जायभाय ६० दिवस गावात राहिले. स्पर्धेचं प्रशिक्षण, गावकर्‍यांची जागृती, हायड्रोमार्करने मार्किंग अशी एक न अनेक कामं डॉक्टर निष्णातपणे पार पाडत होते.

“स्पर्धेदरम्यान गावात एकही गुन्हा घडला नाही, भांडणं झाली नाही. गुडघे दुखी, कंबरेचे आजार कुठच्या कुठे पळाले. लोकांच्या तब्येती सुधारल्या. औषधांशिवाय आजार बरे झाले.” डॉ. सुंदर जायभाय उत्साहाने सांगत होते.

स्वातंत्र्याच्या ७० वर्षात जायभायवाडीचं नाव कुठल्याही पेपर मध्ये आलं नव्हतं. अशा नावाचं गाव आहे हेही लोकांना माहित नव्हतं. अशा या जायभायवाडीने आपला कणखरपणा दाखवत अनेक गावांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.


 

जिगरबाज काकडदरा!

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ पुरस्कारावर काकडदरा या गावाचं नाव कोरलं गेलं. विदर्भातलं काकडदरा हे गाव याआधी कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं, पण या जिगरबाज गावकऱ्यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर काळाची ही चक्र उलटी फिरवली आणि सहा ऑगस्ट रोजी काकडदरा गावात दोन महिने आधीच दिवाळी साजरी झाली. 

साथ प्रत्येकाची

काकडदरा गावात १९८७ सालापासून पाणलोटाची कामं सुरू झाली आहेत मात्र वेगवेगळ्या कारणांनी ही कामं बंद पडली. त्यामुळे जेव्हा पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा काकडदरा गावाने त्यात भाग घेण्याचा निश्चय केला होता.

“आमचं गाव गट-ग्रामपंचायतीत मोडत असल्याने प्रशिक्षणाला तीन जणांनाच जाता आलं. पण आम्ही शाळेत असलेल्या एल.ई.डी. वर चतुरराव आणि चतुराताई यांच्या फिल्म बघून बघून शिकलो. त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं.” गावातील एकमेव पदवीधर असलेले दौलत भाऊ सांगत होते. ४५ दिवसांत सगळ्याच कामात जास्त मदत महिलांची झाली. “महिला नसत्या तर आम्ही काहीच करू शकलो नसतो, त्यांच्याशिवाय हे काम आणि हा मान शक्य नव्हता.” असं मत काकडदरा गावातील अनेक पुरुषांचं आहे. काकडदरा गावात असे अनेक पुरुष आणि महिला आहेत जे उत्तम एल.बी.एस. बांधण्यात पटाईत आहेत. एप्रिल-मे च्या ४६-४७ डिग्री तापमानातही या लोकांनी काम थांबवलं नाही. चटका देणाऱ्या उन्हात तापलेले गोटे गोळा करताना हात भाजत होते, अशावेळेस सुनिता बाईंनी सगळ्या बायकांना हाताला चिंध्या बांधून काम करण्यास सुचवले. या बायकांच्या हातून तयार झालेले ९० एल.बी.एस. बघून सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचे परीक्षक पोपटराव पवार स्वतः म्हणाले, “महाराष्ट्रात इतक्या उत्तम प्रतीचे एल.बी.एस. मी याआधी पाहिले नाही.” हीच काकडदरावासियांच्या कामाची पावती होती. काकडदराच्या बऱ्याच महिलांनी कधी शाळेचे तोंड देखील पाहिलेले नाही. परंतु कोणत्याही पाणलोट उपचारांविषयी त्या अचूक माहिती देतात.

बिन रक्ताची नाती!

मुख्याध्यापक विकास वातकर यांनी श्रमदानातून मुलांना यशाचे धडे दिले

गावात पाचवीपर्यंत शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक विकास वातकर हे ९ वर्षांपूर्वी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यादिवसापासुन आजपर्यंत अनेक वेळा बदली चे योग आले. पण ना गावाने सरांना जाऊ दिलं ना सरांनी गावाला सोडलं. “गावातलं प्रत्येक जण इतकं प्रेमळ आहे की, मला हे माझं कुटूंबच वाटतं. आणि कुटूंबाला सोडून कुठे जाणार?” हे तितकेच आपुलकीचे शब्द आहेत विकास सरांचे. सरांनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्यापासुन स्पर्धा संपेपर्यंत गावाची साथ दिली. कधी शिक्षणातून तर कधी कष्टातून गावाला पुढे नेलं. सकाळी ७ ते २ आणि परत ४ ते ७ अशा कामांच्या वेळात सगळे दिवस विकास सर गावकऱ्यांच्या बरोबरीने उभे राहिले. कुठलाही निर्णय घेतांना सरांचा शब्द हा गावासाठी मोलाचा असतो.

असंच एक दुसरं उदाहरण म्हणजे मुळचा मराठवाड्यातला इंजिनिअर असलेला कुणाल परदेशी! स्वतःचं शिक्षण आणि गावांमधील समस्या यांची सांगड कुठे घालता येईल या शोधात असलेला कुणाल काकडदरा गावात आला. स्पर्धेचा शेवटचा १ महिना तिथे राहून, त्यांच्यापैकी एक होऊन कुणालने गावाला मदत केली. आपला अनुभव सांगतांना कुणाल म्हणतो, “ते सगळेच दिवस अविस्मरणीय आणि विलक्षण होते. न थकता, न थांबता ४५ दिवस सगळ्यांनी काम केलं. इतकी साधी माणसं, इतकी सरळ माणसं काकडदरात आहेत की त्यांच्याकडे बघून माणूसकी काय असतं ते कळलं.”

“बक्षिसासाठी काम नाही केलं. पण विश्वास होता, पाणी आलं म्हणजे बक्षीस पण येईल. कोणत्याही अशुद्ध गोष्टीचं शुद्धीकरण हे पाण्याचे चार थेंब शिंपडून होतं. गावाच्या समृद्धीला लागलेलं दुष्काळाचं ग्रहण आम्ही आमच्या मेहनतीतून सोडवलं.” असं म्हणत ३७६ लोकसंख्या असलेल्या काकडदरावासियांनी संपूर्ण महाराष्ट्रा समोर उदाहरण ठेवलं आहे की मुठभर लोक एकत्र आली तर आपल्या कामातून जगभर आपलं नाव करू शकतात.

 


पाणी… राजकारण ते समाजकारण व्हाया श्रमदान

आटपाडी तालुक्यातील गटविकास अधिकारी मीना दरीबा साळुंखे यांनी पानी फाउंडेशनतर्फे दिले जाणारे ट्रेनिंग घेतले. चार दिवसांच्या या ट्रेनिंगचा त्यांच्यावर काय परिणाम झाला हे त्यांच्याच शब्दांत.

शब्दांकन: नम्रता भिंगार्डे

सांगली जिल्ह्यातला आटपाडी तालुका गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. कोरड्या पडलेल्या विहीरी, उजाड माळरान, उन्हानं करपलेली जमिन आणि माणसं. दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या या तालुक्यातील अधिकतर गावं दरवर्षी टॅंकरने पुरवलेल्या पाण्यावरच जगतात. आटपाडी तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी पदर खोचून तालुक्याच्या तरुण-तडफदार गटविकास अधिकारी मीना साळुंखे थेट शिवारात उतरल्या तेव्हाच हा तालुका परिवर्तनाच्या दिशेने निघालाय हे स्पष्ट झालं.

“२०१५ ला माझी नेमणूक आटपाडीत झाली तेव्हा खरंतर या तालुक्यात आता तीन वर्ष काम करायचंय याचं दडपण आलं होतं. कारण दुष्काळी तालुका म्हटल्यानंतर लोकांमधला संयम संपलेला असतो याची जाणीव होती.” पंचायत समितीच्या कार्यालयातील आपल्या केबिनमध्ये बसलेल्या मीना साळुंखे सांगत होत्या.

पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत आटपाडी तालुक्याचा समावेश झाला. पाणलोट आणि जलसंधारणात मनापासून रस असलेल्या बी.डी.ओ. साळुंखे मॅडम यांनी चार दिवसांची रजा घेऊन ट्रेनिंगसाठी नाव नोंदवलं.

“मी एम.पी.एस.सी. चा अभ्यास केला तेव्हा पाणलोट, सी.सी.टी. वगैरेंच्या व्याख्या पाठ केल्या पण एल.बी.एस. म्हणजे नेमकं काय, तो कसा घालायचा, कुठे काम करायचं, त्याचं मोजमाप काय असावं, हे काहीच माहित नव्हतं. BDO म्हणून चार्ज घेतल्यानंतर प्रत्यक्ष याच सगळ्या उपचारांशी संबंध आला. त्यात पानी फाउंडेशनमधून तालुक्यातल्या गावांमधली मंडळी ट्रेनिंग घेऊन आल्यामुळे दररोज कार्यालयात यायचे. कोणाला शेततळं बांधायचं असायचं तर कोणाला शिवारफेरी करायची असायची. हे सगळे शब्द या सामान्य शेतकरी वापरतायत आणि आपल्याला पुस्तकी व्याख्येपलिकडे त्यातलं काहीच कळत नाही हे समजलं होतं. रोज या ना त्या उपचाराची मागणी करणाऱ्या या लोकांच्या त्रासापायीच खरंतर मी ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं.” साळुंखे मॅडमच्या या वाक्यासरशी कार्यालयात हास्याची लहर उमटली.

आटपाडी तालुक्यातल्या या पंचायत समितीच्या कार्यालयात इतर कामांपेक्षा टॅंकरच्या मागणीसाठी येणाऱ्यांचा राबता अधिक असतो. टंचाईच्या दिवसांत गावाला टॅंकर उपलब्ध करून देणं हेच महत्त्वाचं काम अधिकाऱ्यांना करावं लागतं. उन्हाळ्यातील आटपाडी तालुक्यातील परिस्थिती मॅडम सांगत होत्या.
“ग्रामपंचायतीकडून पाण्याच्या टॅंकरसाठी अर्ज येतो मग तिथले पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत का ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी आमची टीम जाते. BDO आणि तहसिलदार यांचा एकत्रित रिमार्क मिळाला की मग तो प्रस्ताव पुढे जातो. त्यावर डेप्युटी इंजिनिअर, BDO सगळ्यांच्या सह्या होतात. मग तो तहसिल कार्यालयात जातो तिथून प्रांत कार्यालयात मग तिथून कलेक्टर ऑफीसला असा त्याचा प्रवास असतो आणि तो दोन दिवसांत पूर्ण करायचा असतो जेणेकरून शासनाने कंत्राट दिलेल्या टॅंकरमालकांना ऑर्डर निघते. पण या सगळ्या पायऱ्यांमध्ये जो वेळ लागतो त्यात लोकांची पाण्यावाचून वाताहत होते आणि त्यांचा रोष थेट आमच्यावरच ओढावतो. उन्हाळ्यात तालुका सोडून चालतंच नाही.”

आपल्या समस्यांसाठी आपण नेहमीच दुसऱ्याला दोषी ठरवत असतो त्यात गावातल्या लहानमोठ्या समस्यांचं खापर अनेकदा शासनाच्या नाकर्तेपणावर फोडलं जातं. आपली कोणतीही समस्या सोडवणं ही फक्त आणि फक्त शासनाची जबाबदारी आहे, हा लोकांचा दृष्टीकोन पानी फाउंडेशनच्या ट्रेनिंगमुळे बदलला. असं साळुंखे मॅडम नमूद करतात.

ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर मॅडम जातीने सर्व गावांमध्ये फिरायच्या. एक महिला अधिकारी आपल्या वावरात येऊन मातीची घमेली उचलतेय या दृष्याचा गावकऱ्यांवर अपेक्षित परिणाम झाला आणि “सगळे शासकीय अधिकारी फक्त एसीमध्ये बसून नुसत्या ऑर्डरी झाडतात… या लोकांच्या गैरसमजाला सुरूंग लावण्यात मी यशस्वी झाले.” हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत समाधान होतं.

महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आरोग्याच्या आशा सेविका, असे शासकीय गट त्यांनी हाताशी धरले. त्यात गावातल्या अनेक महिला सहभागी असतात. त्यामुळे इतर महिलांपर्यंत त्यांना सहज पोहोचता आलं. कार्यालयातल्या फायलींचा ढीग सांभाळून साळुंखे मॅडम श्रमदानाला जायच्या. तालुका पाणीदार करण्यासाठीचा त्यांचा हा उत्साह बघून पंचायत समितीत काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ४५ दिवस श्रमदान केलं.

“पानी फाउंडेशनमार्फत दिलं जाणारं ट्रेनिंग इतकं परिपूर्ण आहे की शासनाने ते सर्व अधिकाऱ्यांना सक्तीचं करावं” असाही एक नवा विचार त्यांनी बोलून दाखवला.

“कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, BDO आणि तहसिलदार यांना हे ट्रेनिंग कंपल्सरी करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. एखादा दुष्काळी तालुका घडवायचा असेल तर हे चार अधिकारी या ट्रेनिंगला गेलेच पाहिजेत. शासनाने हे ट्रेनिंग सक्तीचं करावं किंवा यशदा कडून हे ट्रेनिंग मॉडेल करून घ्यावं. एखाद्या तालुक्यात पाणी मुबलक असेल तरीही या ट्रेनिंगद्वारे त्या पाण्याचं नियोजन कसं करायचं याचे धडे मिळतील आणि लोकांप्रमाणेच त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही प्रॅक्टीकल नॉलेज असणं महत्त्वाचं आहे.”

आटपाडी तालुक्यातून बदली होऊन आता जिथे कुठे जातील तिथे तिथे पाण्यावर अधिक काम करणार असल्याचा निश्चय मीना साळुंखे यांनी केलाय. पाणी हा कसा सर्वसमावेशक विषय आहे याचं उदाहरण देताना त्या म्हणाल्या,
“खरंतर पाणी हा विषय राजकारणाचा. आटपाडी तालुक्यातून गेली २० वर्ष फक्त पाण्यावरच आमदारकी लढवली गेलीये. पण आता राजकारणाच्या पलिकडे या प्रश्नाकडे पहायला लोकं शिकली आहेत. तालुक्यात आता प्रचंड काम झालंय. लोकं म्हणतात आमच्या BDO मॅडम यांनी खुप मदत केली पण मी म्हणते खरंतर लोकांनीच मला मदत केली.”

तालुक्याच्या हाकेला मंत्रालयातून साद

जलयुक्तशिवार योजनेचंही काम आटपाडी तालुक्यात सुरू होतं. तालुक्यात मशीनने जी कामं करायची होती त्याला डिझेलला पैसे कमी पडत होते. पैसे संपल्याने इंधन मिळणं बंद झालं आणि इंधनाअभावी कामं ठप्प झाली. त्यावेळी तालुक्याच्या गटविकास अधिकारी असलेल्या एम. डी. साळुंखे यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना मोठाच्या मोठा मेसेज पाठवला. या मेसेजचा फॉलो-अप गायकवाड यांनी मंत्रालयापासून घेतला. गायकवाड यांनी सतत दोन दिवस केलेल्या पाठपुराव्यामुळे थेट मंत्रालयातून म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आला की जे जे काम पानी फाउंडेशन आणि जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत होतंय त्यांना त्यांना इंधन फुकट पुरवा. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी लगेच तो आदेश साळुंखे मॅडमना वॉट्सअप केला. आटपाडी तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो आदेश लागू करण्यात आला हे विशेष.

 


पाण्याचा वारसा जपताना

– अपुर्वा वैद्य, पानी फाउंडेशन

पाण्याला जीवन का म्हणतात याचं उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुष्काळी गावात फिरल्यानंतरच मिळतं. कोरडे पडलेले हे ‘जीवन’ वाचवण्यासाठीच पानी फाउंडेशनची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू झाली. पाण्यासाठी सैरावैरा झालेल्या सगळ्यांनाच दिलासा देणाऱ्या या प्रयोगाविषयी थोडक्यात.

इतक्या वर्षात पहिल्यांदाच पावसाच्या येण्याने मन सुखावले. या आधी पावसाला या दृष्टीने बघण्याची समज नव्हती किंवा मग तशी गरज भासली नाही. पावसाळा म्हणजे भटकंती, आनंद देणारा, भरभरून लिहावेसे वाटणारा ऋतु. पावसाळा म्हणजे फजिती, चिकचिक पण तरीही सगळीकडे सुबत्ता आणि सुकाळ आणणारा ऋतु. या पावसाच्या पाण्याने सगळं माळरान हिरवं होतं, मात्र प्रचंड मोलाचं पाणी, प्रत्येकाचं जीवन असणारं पाणी, चव, रंग, गंध, यांच्या चौकटीत न अडकता, कुठलाही भेद आपल्या ठायी न बाळगता चरा-चरात समरसून जाणारं हे पाणी कित्येक वर्षांपासून वाहून जातंय, दुषित होतंय याचा विसरच जणू आपल्याला पडला होता. वाहून जाणारं हे पाणी, थांबवता येतं, जिरवता येतं आणि मुरवता येतं हे मात्र ठाऊक असुनही अलीकडेच मला आणि इतर अनेकांना नव्याने कळलं. आणि निमित्त होतं ‘पानी फाउंडेशन’.

स्पर्धा सुरु होतांना

या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती ‘जनता’ आहे.  त्यांनी एकत्र येऊन जर निसर्गाची सगळ्यात मोठी संपत्ती असणारं ‘पाणी’ वाचवलं तर या देशाचा चेहरा–मोहरा बदलेल. जास्तीत जास्त गावं सहभागी होण्यासाठी काय करता येईल? तेव्हा एक कल्पना समोर आली. ती म्हणजे ‘स्पर्धा’. खेळासाठी, नाच गाण्यासाठी स्पर्धा होऊ शकते तर मग पाणी अडवण्यासाठी स्पर्धा का होऊ नये? या विचारातून सुरु झाली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा.

२०१६ साली महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमधील तीन तालुक्यांमध्ये वॉटर कपची पहिल्यांदा घोषणा केली गेली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि अमरावती मधील वरुड. तसेच या स्पर्धेसाठी ३ बक्षिसं देखील जाहीर झाली. पहिलं ५० लाख रुपये, दुसरं ३० लाख रुपये आणि तिसरं २० लाख रुपये. जी गावं जलसंधारणाची सगळ्यात जास्त आणि उत्तम दर्जाची कामं करतील त्या गावांना ही बक्षिसं दिली जातील.

‘श्रमदान हा या स्पर्धेचा आत्मा आहे’… असं सांगून जास्तीत जास्त श्रमदान करण्याचे आवाहन या स्पर्धेमार्फत गावकऱ्यांना करण्यात आले. आणि निवडलेल्या तालुक्यांतील सगळ्या गावांना स्पर्धेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं गेलं.

प्रशिक्षणातून आत्मविश्वासाकडे!

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन अटी होत्या. पहिली अट ही होती की स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावाने ग्रामसभा घेऊन सहभागी होण्याचा ठराव घेणे गरजेचे होते. या मागे विचार हा होता की ग्रामसभेच्या माध्यमातून भाग घेणाऱ्या गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्पर्धेबाबत माहिती पोहोचेल. याचा पुढे जाऊन त्यांच्या सक्रीय सहभागावर परिणाम पडेल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दुसरी अट होती की स्पर्धक गावाला प्रत्यक्ष स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या कामाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. सहभागी ग्रामस्थांमध्ये किमान दोन महिला असाव्यात असा आग्रह केला गेला.

पाणलोट विकास एक शास्त्र आहे. शास्त्र आणि तंत्रज्ञान सहज आणि सोपं करून लोकांना द्यायचं होतं. जेणेकरून त्यांना त्यात रुची निर्माण होईल आणि आत्मविश्वास येईल की हे आपण पण करू शकतो. या प्रशिक्षणासाठी अतिशय सोप्या पद्धतीने करता येणाऱ्या पाणलोट विकासाच्या आणि पाण्याच्या समस्येवरच्या तोडग्यांचा समावेश केला गेला.

यात पानी फाउंडेशनला WOTR या संस्थेची साथ मिळाली ज्यांनी नॉलेज पार्टनर म्हणून अतिशय महत्वाची भूमिका बजावली. या व्यतिरिक्त स्पर्श ही संस्था देखील सहभागी झाली. या दोन्हीही संस्थांमधून काही प्रशिक्षकांची टीम निवडली गेली. जलसंधारणाच्या बाबतीत आदर्श असलेल्या आणि जलसंधारणाची कामं केलेली हिवरे बाजार, नलवडेवाडी आणि हिवरे ही तीन गावे प्रशिक्षण केंद्र म्हणून निवडली गेली. पाणलोट विकासाची संकल्पना शास्त्र, शिस्त आणि खेळाच्या माध्यमातून शिकवली गेली. प्रेम, मैत्री आणि आपुलकीच्या वातावरणात प्रशिक्षणं लोकप्रिय होऊन पार पडली.

‘माझ्यासाठी, कुटुंबासाठी, गावासाठी, भविष्यासाठी पाणी हवं आहे.’ ‘माझ्या’ पासून सुरु झालेला हा प्रवास ‘आपल्या’ पर्यंत कसा येऊन पोहोचला हे प्रशिक्षणार्थींना कळलेच नाही. आपापल्या गावी जाऊन गावकऱ्यांनी जलसंधारणाची कामं केली. त्यांची मेहनत, त्यांचा पैसा, त्यांची ताकद, त्यांचा घाम, सगळं त्यांनी आणि फक्त त्यांनी केलं. ज्याचं फळ त्यांना मिळालं. या स्पर्धेच्या निमित्ताने स्वतःच्या गावात पाणलोट विकास करून स्वतःच्या हिमतीवर आपली पाण्याची समस्या दूर केली. या तालुक्यांनी एकूण मिळून वार्षिक १,३६८ कोटी लिटर इतका पाणीसाठा करण्याची क्षमता निर्माण केली.  सातारा जिल्ह्यातील वेळू गाव हे सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ चे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

अशा तऱ्हेने एक स्वप्न सत्यात उतरले आणि अधिक मोठे झाले. ‘महाराष्ट्रात असलेला हा दुष्काळ दूर करायचा’… असा मुठभर लोकांनी केलेला विचार बघता बघता दूरवर आणि खोलवर पसरला. पाण्याची समस्या दूर करणे हा एक त्रास म्हणून नाही तर आनंदाने स्वीकारलेले आव्हान हा दृष्टीकोन गावकऱ्यांनी तमाम महाराष्ट्राला दिला.

सुरुवात पुढील पर्वाची

वर्षानुवर्षे दुष्काळामुळे टँकरचा शाप असलेली गावे जेव्हा पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एकत्र येतात आणि शून्यातून विश्व निर्माण करावे तसे थेंबातून सृष्टी निर्माण करतात, तेव्हा त्यांचे हे प्रयत्न उभ्या महाराष्ट्राला अचंबित करणारे असतात. ह्याच गोष्टीने उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर गावांचा आत्मविश्वास दुप्पट केला. आणि याच विश्वासाच्या जोरावर जानेवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या तीन विभागांमधील १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांची घोषणा पुढच्या वॉटर कप स्पर्धेसाठी केली गेली.

निवडलेल्या तालुक्यांमधून १,३०० पेक्षाही अधिक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ च्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या प्रत्येक गावातून २ युवा आणि २ महिला असे ५ ग्रामस्थ प्रशिक्षणासाठी पाठविले गेले. तीनही विभागातून एकूण २२ प्रशिक्षण केंद्रं उभारली गेली. स्वतःवर विश्वास असला किंवा दुसऱ्यात निर्माण करता आला तर अशक्य आणि अवघड वाटणारे कामही आदर्श ठरते. सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ चे काही प्रशिक्षणार्थी या वर्षी प्रशिक्षक म्हणून समोर आले आणि त्यांनी उत्तमपणे प्रशिक्षण शिबिरांमध्ये आपली कामगिरी बजावली. सुरेखा फाळके, सुखदेव भोसले, घनश्याम शिंदे, सुमित गोर्ले ही अशाच काही कुशल तांत्रिक प्रशिक्षकांची उदाहरणं आहेत. त्यांनी स्पर्धेच्या घोषणेपासूनच या कामासाठी आपले योगदान दिले.

पाणी माणसा माणसात संघर्ष निर्माण करतं आणि पाण्यावरून युद्ध पेटतात. हेच पाणी लोकांना एकत्र आणतं आणि पाण्यामुळेच नाती जोडली जातात. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी अशीच काही एकमेकांशी संबंध नसणारी पण पाण्याने जोडलेली माणसं एकत्र आली. यावर्षीही प्रशिक्षणाची सुरुवात आपुलकीने झाली. शिबिराच्याठिकाणी प्रशिक्षणार्थींचे स्वागत हात जोडून, गळा भेट, कुठे औक्षण तर कुठे चक्क पाय धुऊन केलं गेलं. सुरूवातच अशी झाल्यावर इतर दिवसांचा अनुभव तर अजुनच थक्क करणारा होता. चार दिवसीय प्रशिक्षण शिबीरात वेगवेगळ्या गावातल्या माणसांच्या एकमेकांशी ओळखी झाल्या. या प्रशिक्षणातुन त्यांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या गावात पाण्याचं अस्तित्व किती महत्वाचं आणि गरजेचं आहे हे कळले. जाणिवेतुन नेणिवेकडे नेणारा प्रवास झाला. राग, द्वेष, लोभ, मत्सर, मतभेद या सगळ्या गोष्टी गळून पडल्या आणि सगळ्यांचा एक निर्धार पक्का झाला.

या प्रशिक्षण शिबिराचा शेवटचा उपक्रम असतो निरोप समारंभ. निरोप घेतांना प्रशिक्षणार्थी आपले विचार आणि अनुभव व्यक्त करतात. शिबिराच्या पहिल्या दिवशी असलेले अनोळखीपण, औपचारिकता जाऊन आपुलकी जाणवू लागते. बरेच प्रशिक्षणार्थी तर “आम्हाला पुढच्या बॅचलाही प्रशिक्षणाला राहू द्या!” अशी विनंती करतात. प्रशिक्षणात स्वतः शिकत असताना प्रशिक्षणार्थी इतरांनाही खूप काही शिकवून गेले.

कुणी आपली दुःख बाजूला सारून तर कुणी सुखांना थांबवून प्रशिक्षण पूर्ण केले. दिव्यांग असूनही दोन तरुणांनी प्रशिक्षणाचा एक भाग, गावाची शिवारफेरी इतरांप्रमाणेच चालत पूर्ण करून आपलं कर्तृत्व दाखवून दिलं तर कुणी आपल्या जवळच्यांच्या लग्नाला हजर न राहता प्रशिक्षण पूर्ण केले. विदर्भातील खैरखेड या गावातील गावकऱ्यांनी ‘स्पर्धेच्या काळात गावात कुणीही लग्नाचे मुहूर्त काढणार नाही’ असा एकमुखाने निर्णय घेऊन जलसंधारणाला महत्व दिले. गावात परतल्यावर प्रशिक्षणार्थींनी न थकता, प्रत्येक घरोघरी जाऊन गाव एवढं एकत्र केलं की गावातील लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत जवळ-जवळ सगळे ग्रामस्थ स्पर्धेसाठी सज्ज झाले. कुणी श्रमदानात सहभागी होण्यासाठी सहकार्याचं दान मागितलं तर कुणी गावफेरी काढली.

सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ मधे अनेक सामाजिक संस्थानी स्पर्धकांचा उत्साह आणि मनोबल वाढविण्याची कामगिरी उत्तम केली होती. या पर्वातही अश्याच काही संस्था ठिकठिकाणी सहकार्य करतांना आढळून आल्या.

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ च्या पर्वात ठिक-ठिकाणी स्त्री-शक्तीची ताकद महाराष्ट्राने अनुभवली. ती कधी आपल्यासमोर  प्रशिक्षक म्हणून आली, तर कधी प्रशिक्षणार्थी म्हणून. प्रत्येक केंद्रावर तिने हजेरी लावली. संसार, कुटुंब, मुलं, घर अशा सगळ्या जबाबदाऱ्या थोड्या बाजूला सारून महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि अतिउत्तम पद्धतीने सांभाळली. चार दिवसाच्या प्रशिक्षणाने त्याचं आयुष्यच बदलून जाणार आहे, हे त्यांच्या ध्यानीमनी नसणाऱ्या, वेगवेगळ्या गावांहून आलेल्या या महिला गावी परतताना स्वतःचं जगणं समृद्ध  करून आत्मभान, आत्मसन्मान, आत्मविश्वास अशा भावना आपल्या बरोबर घेऊन गेल्या. आणि गावी परतल्यानंतर स्वतःच्या ठायी निर्माण झालेला विश्वास त्यांनी गावातील इतर महिलांमध्ये देखील निर्माण केला.

२७ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात प्रथमच एक वेगळा प्रयोग झाला. महाराष्ट्रातील ३० तालुक्यांमधील गावांमध्ये एक अनोखी ग्रामसभा पार पडली, जी उपग्रहा च्या माध्यमातून करण्यात आली. डॉ. अविनाश पोळ यांनी मुंबईतल्या एका स्टुडीओमध्ये ही ग्रामसभा घेतली. त्यांच्या बरोबर रोज एक प्रसिद्ध कलाकार देखील या ग्रामसभेला हजर राहिला. ४५ दिवसांच्या स्पर्धा कालावधी मधे स्पर्धकांना येणाऱ्या अनेक शंका-कुशंकांना या ग्रामसभांतून उत्तरे मिळाली ज्याचा योग्य उपयोग गावकऱ्यांनी स्पर्धेदरम्यान केला.

प्रत्यक्ष युद्ध!

गावं सहभागी झाली… प्रशिक्षण पूर्ण झाले… आणि मग वेळ आली ‘युद्धाची’! महाराष्ट्र पाणीदार होण्याचे पुढचे पाउल टाकले गेले. आणि कष्टाचं, मेहनतीचं, श्रमदानाचं, उत्साहाचं, एकीचं आणि स्पर्धेचं महाराष्ट्रात तुफान आलं! महाराष्ट्रभर तापमानाचा पारा वाढलेला असताना, त्या रणरणत्या उन्हाची थोडीही पर्वा न करता महाराष्ट्रातल्या जलक्रांतिकारकांनी ३० तालुक्यातून प्रचंड मोठ्या उत्साहात श्रमदानाला सुरुवात केली! काही गावांनी तर रात्री १२ वाजल्यापासूनच अवजारांची पूजा करून कामे सुरु केली. तर कुणी ४५ दिवस अखंड श्रमदान करण्याची शपथ देखील घेतली. चारमोळी गावातील ८०० ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी फक्त २ तासात सी.सी.टी. द्वारे १,००० घनमिटर साठा निर्माण केला तर पहिल्याच दिवशी माण तालुक्यातील बिदाल वासियांनी फक्त सी.सी.टी. च्या कामातून एकूण ६ लाख ३० हजार लिटर पाणीसाठा तयार केला! ४,००० पेक्षा पण जास्त लोक या श्रमदानात सहभागी झाले होते.

स्पर्धा सुरु झाल्यापासून पहिल्या पाच दिवसातच १,५०,००० लोकांनी श्रमदान केले! भारतीय जैन संघटनेच्या पुण्यातील वाघोली संकुलात शिकणाऱ्या ६५० मुला-मुलींनी उत्साह आणि जल्लोषात संपूर्ण दिवस औरंगाबाद मधील गोळेगाव येथे महाश्रमदान केले. १६ एप्रिल रोजी मराठवाड्यात झालेल्या महाश्रमदानात एकूण १० तालुक्यातील २८,४६४ लोकांनी एकाच वेळी महाश्रमदान केले.

कधी लग्नाच्या वऱ्हाडा सोबत स्वतः नवरा नवरीने श्रमदान केले तर कधी वाढदिवस शेतात करून चिमुकल्यांनी पाहुण्यांकडून श्रमदान करून घेतले. कुठे आंदोलन करून श्रमदान करणाऱ्यांची संख्या वाढवली तर कुठे मौन पाळून कामाला जास्त वेळ दिला गेला. श्रमदानासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनी एक वेगळीच शक्कल लढविली. जे कुणी रोज श्रमदान करतील त्यांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात आला आणि जिंकणाऱ्याला वेगवेगळी बक्षिसं देण्यात आली.

पाण्याला रंग नसतो. ते ज्यात मिसळले जाईल त्या रंगात एकरूप होण्याचा त्याचा गुणधर्म! १ मे, महाराष्ट्रदिनी पाण्याचा हा गुणधर्म गावागावात माणसांमधे बघायला मिळाला. पाण्यासाठी पाण्यासारखे एकरूप होऊन लोकांनी कष्ट केले, घाम गाळला, आनंद घेतला आणि आनंद दिला. गावागावात गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शहरातील हजारो लोकांनी श्रमदान केले. यादिवशी आनंदाने, श्रमाने, घामाने, गप्पांनी, जुन्या नवीन नावांनी आसमंत जणू उजळून निघाला.  गाव आणि शहर यांच्यात  पाण्यासारखं एक निर्मळ, नवीन नातं निर्माण झालं. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यातही गावांमध्ये जोरदार कामं झाली. एकमेकांचे रेकॉर्ड ब्रेक करत नवे आकडे प्रस्थापित केले गेले. पश्चिम महाराष्ट्रात १० तालुक्यात मिळून ६०,००० लोकांनी श्रमदान केले. कुठे २ तासात ३०० हून अधिक एल.बी.एस. तयार करण्यात आले, तर कुठे २ तासात ५,६०० वृक्षारोपणाचे खड्डे तयार झाले. गावांनी केलेली ही कामे थक्क करणारी होती.

सगळीकडे श्रमदानाच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असताना, या श्रमाच्या दानासोबतच काही दान असं दिलं गेलं जे निस्वार्थी आणि निर्मळ होतं. जवळ देण्यासारखं जे होतं ते दिलं. कधी पैस्यांच्या माध्यमातून तर कधी उदरनिर्वाहाच्या माध्यमातून. कुणी मशिनच्या डिझेलसाठी खर्च दिला तर कुणी आपला पगार, तर कुणी उपजीविकेचं एकमेव साधन असलेली आपली पेन्शन गावासाठी दिली. कुणी आपली शिष्यवृत्ती देऊ केली तर कुणी लग्नात आलेल्या आहेरातील रक्कम या कार्याला दान केली. कुणी श्रमदानासाठी लागणारं साहित्य दिलं तर कुणी श्रमदान करणाऱ्यांना आपल्या शेतातील कलिंगडं खाऊ घातली. निरनिराळ्या प्रकारचं हे दान न संपणारं होतं.

“मी श्रमादानाला जरूर येईन.” असं वचन दिल्याप्रमाणे स्पर्धा सुरु झाल्यापासून तिसऱ्याच दिवशी आमिर खान आणि किरण राव यांनी सातारा जिल्ह्यातील नागझरी गावात जाऊन श्रमदान केले! फक्त इथपर्यंतच ते थांबले नाहीत तर ४५ दिवसाच्या कालावधीत आमीर आणि किरण यांनी उत्तम काम करणाऱ्या अनेक गावांना भेटी दिल्या.

उत्तर सोलापूर मधील राळेरास गावातील अर्धे-अधिक लोक श्रमकरी! दिवसभर पोटासाठी काम आणि रात्री गाव पाणीदार होण्यासाठी काम. त्यांच्या या कष्टाचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि थोडं सहकार्य म्हणून आमिर यांनी स्वतः जाऊन रात्रीच्या काळोखात श्रमदान केले.

कुणाच्याही मदतीशिवाय काम करणाऱ्या पडसाळी गावच्या विष्णू भोसले आणि त्यांच्या दोन सहकार्यांबरोबर जाऊन आमीर आणि किरण यांनी श्रमदान केले. तर कधी नव्या पिढीचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी गावाला भेट दिली. तर कधी स्त्री-शक्ती ठरलेल्या नयना चिंचे, विमलाताई, सुशीलाताई आणि गोकर्णाबाई यांना भेट दिली. तर कधी चौकट मोडून महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण केलेल्या स्त्रियांना भेटून त्यांची हिंमत वाढवली.

एक नवी सुरुवात

वॉटर कप स्पर्धे मुळे साध्य झालेल्या जलक्रांती मधून एक से बढकर एक वॉटर हिरोज् महाराष्ट्राला मिळाले… ज्यांनी आपल्या सर्व अडचणींवर मात करून तन, मन, धन पाण्यासाठी दिलं. स्पर्धेमुळे समाजातील अनेक स्तरावरची मंडळी एकत्र आली. महाराष्ट्राला असलेला दुष्काळाचा श्राप पुसण्यासाठी गावं आणि शहरांनी खांद्याला खांदा लावून कामं केली. जनता आणि प्रशासनातील दरी कमी झाली. आणि जादू झाल्यासारखी गावं एक झाली. सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ च्या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेकडो गावामधल्या लाखो लोकांनी भर उन्हाळ्यात सलग ४५ दिवस श्रमदान करून दुष्काळाला टक्कर दिली. आणि या विक्रमी श्रमदानातून प्रचंड मोठी पाणी साठवण क्षमता निर्माण केली.

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मध्ये तीन विभाग, तीस तालुके, हजारो माणसं ‘दुष्काळमुक्त व पाणीदार महाराष्ट्र’ हे एकच ध्येय घेऊन या जल चळवळीत सहभागी झाले. तहान-भुक विसरले, जात-पात विसरले, अनंत अडचणी, असंख्य संकटांवर मात करुन दिवस-रात्र एक केली. गाव आणि शहर एकत्र आली. निसर्गाला आव्हान दिले. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, “पाण्यात अग्नी अंतर्भूत आहे.” म्हणूनच पाण्यावाचून भडकलेला दुष्काळरुपी अग्नी जल-क्रांतिकारकांनी आपल्या कामातून शमविण्याचं काम केलं. जोपर्यंत पाण्याचं अस्तित्व आहे, तोपर्यंत त्याची शक्ती टिकून राहील. आणि ही शक्ती टिकवून ठेवण्यासाठी, पाण्याचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जल-क्रांतिकारकांची संख्या अजून वाढणार आहे. हे पर्व संपत असलं तरी पुढील पर्व लवकरच सुरु होणार आहे. असं म्हणतात, “काहीतरी संपतांना काहीतरी सुरु होत असतं.” आता पुन्हा एक नवी सुरुवात!येल्डा… जळालेलं पुन्हा उगवतंय

– प्रताप साळवे

तालुका को-ऑर्डीनेटर, अंबाजोगाई

दुष्काळाच्या झळांचे अदृष्य व्रण लोकांच्या आयुष्यावरही उमटले. भेगाळलेल्या जमिनीप्रमाणेच माणमाणसांची मनंही भेगाळली. अशाच भेगाळलेल्या अवस्थेत जगणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या येल्डा गावची ही सत्यकथा.  

येल्डा प्रामुख्याने ऊस तोड कामगारांचं गाव. जिथे शेती तिथे घर असं विखुरलेलं हे गाव होतं. गेल्या काही वर्षांत मात्र गावाला अनेक रोगांनी बेजार केलंय. गावकऱ्यांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा बोकाळली. जे कोणी शिकले ते शहरांत नोकरीनिमित्त गेले आणि तिथेच वसले… पुन्हा कधीही गावी न परतण्यासाठीच!

आमच्या गावातल्या प्रत्येक गोष्टीला दुष्काळाची झळ बसलीये. शेती आणि दुग्धव्यवसाय करणाऱ्या अनेकांना आपली जनावरे विकावी लागली. पाण्याअभावी जमिन ओसाड होत गेली तर कामाअभावी इथला तरुण व्यसनाच्या आहारी गेला. भांडणं आणि गंभीर गुन्हे करण्याचं प्रमाण वाढलं.

२०१२ हे वर्ष तर खूपच भयंकर. या एकाच वर्षात येल्डा गावातल्या ३९९ गंभीर स्वरुपाच्या तक्रारी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राचे तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही या गावाची माहिती घेतली. गावातल्या भांडणात एकमेकांचे मुडदे पाडायलाही गावकरी मागेपुढे पाहत नव्हते.

कधी शेतीच्या फुटभर बांधासाठी तर कधी इतर काही कारणांवरून प्रत्येक वर्षी एक-दोन खून ठरलेले. गावात कोणीच कोणाचे ऐकत नसे. प्रशासकीय अधिकारी सुद्धा या गावातील कार्यभार घेण्यास तयार होत नव्हते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि माणूसकी नसलेले अशी वेगळी ओळख येल्डा गावाला चिकटली होती.

गावातल्या बऱ्याचशा केसेसची माहिती असलेले अॅड. कैलास चामनर सांगतात की, “डिसेंबर महिना म्हणजे आमच्या गावाची ताटातूट करणारा महिना होय. कारण अगोदरच ऊस तोडणीसाठी ८० ते ९०% लोक कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रात जातात. उरलेले लोक जिथे पाणी असेल तिथे आपली जनावरे, शेळ्या, मेंढ्या घेऊन कुटुंबच्या कुटूंब गाव सोडून जातात. गावातली अनेक दारं कुलूपबंद अवस्थेत निपचीत उभी राहतात. एखाद्या उघड्या दारात खुरडणारी एकटी म्हातारी आणि पारावर बसलेले अस्थिपंजर म्हातारे हे भयाण चित्र गावात दर उन्हाळ्यात पहायला मिळतं.”

साठी गाठलेल्या विमलबाई खोडवे यांच्या अधू डोळ्यांनी १९७२चा दुष्काळ पाहिला होता. “खायला अन्न नाय का प्यायला पाणी नाय असा अवघड होता रं ७२चा दुक्काळ. त्यातनं आमी तरलो पन आता रोजचा दिस दुक्काळासारखाच वाटतोय. रोज २ किलोमीटरवरनं पाणी आणायचं ते बी चालत. माझ्या म्हातारीचं सांधं या पाण्यापायीच निकामी झालं रे बाबा.” विमलबाईंचं संपूर्ण आयुष्य केवळ पाणी मिळवण्यासाठी झिजलं पण आता वयोमानामुळे त्या हिम्मत हरल्या आहेत.

विमलबाईंच्या शेजारी बसलेल्या विश्वास कांबळे यांनी तर वेगळीच कथा मांडली. विश्वास कांबळे हे ग्रामरोजगार सेवक म्हणून काम पाहतात. ते म्हणतात, “आजूबाजूच्या गावांमध्ये ‘येल्डा आणि पाण्यानी कोरडा’ म्हणून आमचं गाव ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळे आमच्या गावातल्या पोरांची लग्न जुळेनाशी झाली. एखादी परगावातली मुलगी लग्न करून आलीच तर तिलाही डोक्यावर घागर घेऊन पाण्याला जावं लागतं. इतकंच काय त्या नवरीसोबत आलेल्या करवल्यांनाही पाणी भरायला जावं लागायचं. अनेक गावांनी सोयरीक नाकारल्यानंतर गावातल्या गावातच अनेकांची लग्न लावली गेली त्यामुळे गावातील पाहुणे गावातच आहेत याहीमुळे वादांचे प्रमाण जास्त आहे.”

येल्डा गावात आजवर शासनाच्या अनेक योजना आल्या. मात्र गावच्या राजकारणामुळे कोणतीही योजना पूर्ण झालीच नाही. येल्डा कायम अर्धवट विकासाचं गाव बनून राहिलं. अशा या दुष्काळी प्रदेश असलेल्या आणि स्थलांतरामुळे मरणकळा आलेल्या गावात पाण्यासंदर्भात जागृती करण्याची खूप गरज होती. २०१७ मध्ये होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातून येल्डा हे गाव स्पर्धेत उतरावं यासाठी पानी फाउंडेशनचे अंबाजोगाईचे तालुका कोऑर्डीनेटर म्हणून मी आणि अमोल जोगदंड फेब्रुवारी महिन्यातल्या एका सकाळी येल्डा गावात पोहोचलो.

गावातल्या पारावर खेळणाऱ्या पोरांना मोठ्या माणसांना बोलावण्यासाठी पिटाळलं. थोड्याच वेळात जमा झालेल्या दहा-बारा जणांना आम्ही पाण्यासाठी उपाययोजना वगैरेची माहिती सांगू लागलो. पाणलोट, पानी फाउंडेशन, जलसंधारण वगैरे शब्द ऐकून ते सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. आम्ही बोलतच राहिलो तेवढ्यात एकाने विचारलं, “हे काय? शासन नवीन योजना काढतंय का?”

जमलेले ते सगळेजण अशिक्षित ऊसतोड कामगार असल्याने कोणालाच धड काही कळेना म्हटल्यावर आम्ही सरपंचांना भेटायला निघालो. येल्डा गावचे सरपंच स्वतः ऊस तोडणी मुकादम आहेत आणि ते गावातल्या सगळ्या मजुरांना घेऊन पश्चिम महाराष्ट्रात गेले होते असं कळलं. शेवटी आम्ही ग्रामरोजगार सेवक विश्वास कांबळे यांना फोन करून बोलवून घेतलं. कांबळेंना गावातली परिस्थिती माहित होतीच. “साहेब, गावातले सगळेच बायामाणसं ऊस तोडणीला जातात. गावात माणसाचा तुटवडा, त्यात वॉटर कप स्पर्धेचं एवढं काम कसं आणि कोण करणार?”  त्यांचा प्रश्नही रास्तच होता. ग्रामसेवकाने तर असं काम इथे होणं शक्यच नाही, असं म्हणत थेट फोन कट केला होता. तरीही आम्ही विश्वास कांबळेंशी चर्चा केली आणि आमचा फोन नंबर देऊन ठेवला. “जर तुम्हाला वाटत असेल की इतर गावांप्रमाणे तुमच्या गावानेही पाण्याबाबत काही उपाययोजना कराव्यात जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढीला ऊसतोड कामगार म्हणून राबायला लागू नये तर आम्हाला फोन करा. आम्ही कधीही यायला तयार आहोत.”

पाणी हा विषयच असा आहे ज्यामुळे थेट समोरच्याच्या काळजाला हात घालता येतो. आपल्या गावाच्या पाणीप्रश्नावर ठोस उपाय घेऊन आलेल्या या संधीला येल्डा गाव नाकारणार नाही असा विश्वास होताच. त्याच विश्वासाने ग्रामरोजगार सेवक विश्वास कांबळे यांनी दोनच दिवसांत आम्हाला फोन केला आणि ग्रामसभेला बोलावलं. कांबळेंनी यादरम्यान अक्षरशः घर न घर पिंजून काढलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की ग्रामसभेला चांगली उपस्थिती होती. येल्डा गावातून एक ५५ वर्षाची आजी यांनी पुढाकार घेऊन प्रशिक्षणाला येण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर गावातील लोकांनी विचार विनिमय करून २१ वर्षांची शोभा खोडवे, विश्वास कांबळे व इतर दोन व्यक्तींना प्रशिक्षणासाठी पाठवले.

दोन वेळच्या अन्नासाठी राबराब राबणारे हे पाच जण गावाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्याचा निश्चय घेऊनच गावात परतले. गावात बरेचसेजण ऊसतोडीसाठी गेलेले मात्र तरीही स्पर्धाकाळात एकही दिवस काम बंद पडू दिले नाही. “आम्ही मुळातच कष्टकरी, ऊसतोड कामगार आहोत. आमच्यासाठी श्रम रोजचेच आहे. मनात आणलं तर दहा दिवसांत डोंगर खोदून काढू शकतो. मात्र आम्ही आजवर दुसऱ्याच्या शेतात श्रम केले. पहिल्यांदाच आम्ही स्वतःसाठी श्रमदान करतोय.” श्रमदानात अग्रेसर असलेल्या सखाराम सोन्नर यांची ही प्रतिक्रीया जवळपास सगळ्या गावकऱ्यांच्या ओठांत होती.

स्पर्धा आता फक्त २२ दिवस राहिली होती, येल्डा या गावातील महिला आणि पुरुष करीत असलेल्या कामाची माहिती गावोगावी पोहचू लागली आणि जगण्यासाठी इतर गावांमध्ये स्थलांतरीत झालेली गावातलीच अनेक कुटूंब परतली आणि श्रमदानात सहभागी झाली.

येल्डासारख्या स्थलांतरितांच्या गावाने वॉटर कप स्पर्धेच्या ४५ दिवसांत एवढं काम केलं यावर आजही विश्वास बसत नाही. अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी येल्डा गावाला भेट दिली आणि गावकऱ्यांचं कौतुक केलं. पाण्याअभावी जिवावर उठलेल्या संकटांना येल्डा गावाने एकजूट होऊन सामोरं जायचा निर्णय घेतलाय आणि हेच त्यांचं सगळ्यात मोठं बक्षिस आहे.

देना निसर्ग आम्हाला पाणी ||

घोटभर पाण्यासाठी फिरतो रानो रानी ||

जातीत कुठे पुन्हा येतील पाऊसाचे थेंब ||

जळालेलं पुन्हा उगवायला हिरवं हिरवं कोंब ||थेंबे थेंबे तळे साचे

– राकेश कदम

मे २१, २०१७

एका रात्रीत जगातला कुठलाच समाज बदलत नसतो. एका क्षणात जगातल्या कुठल्याच समाजाची मानसिकता बदलत नसते. हे बदल बऱ्याचदा अदृश्य स्वरूपाचे असतात, बऱ्याचदा कासवगतीनेही होत असतात. पण हीच कासवगती हरघडी आशावादही जागवत असते. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पानी फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांचे श्रमदान सुरू झाले. जलसंवर्धनाचा उद्देश नजरेपुढे ठेवून या प्रक्रियेत सामील समाजाच्या मानसिकतेवर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष लेख दिव्य मराठी या प्रतिष्ठीत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी, हिरज, राळेरास, भागाईवाडी, कोंडी तर सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी, नरळे, लोणवीरे… साधारण दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेली गावे. गेली अनेक वर्षे दुष्काळाची धग सोसणारी. परंतु, आता या गावातील अठरापगड जातींतील माणसांमध्ये एक वेगळीच धग आहे. गावात-शिवारात तंत्रशुद्ध पद्धतीने पाणी मुरवण्याची. या गावांची सकाळ शिवारातील श्रमदानाने उगवते आणि रात्र ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ या विषयांवरील प्रबोधनाच्या मशालींनी पेटलेली असते.

गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक तालुके दुष्काळाच्या धगीत होरपळत आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘मागेल त्याला शेततळे’ जलयुक्त शिवारसारख्या योजना ठेकेदारांनी खिशात घातल्यामुळे गावांच्या घशाला पडलेली कोरड कायम आहे. अशा वातावरणात अवर्षणग्रस्त तालुक्यांतील लोक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून, वर्गणी जमवून गावाला पाणीदार करण्यासाठी धडपडत आहेत. त्याला आमिर खानप्रणीत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेबरोबर नाम फाउंडेशन, मुंबईच्या केअरिंग फ्रेंड, मराठवाड्यातील मानवलोक, विदर्भातील दिलासा, पश्चिम महाराष्ट्रातील माणदेशी, महाराष्ट्र विकास केंद्र यांसारख्या सामाजिक संस्थांनी केलेल्या प्रबोधनाचेही निमित्त आहे. याचाच एकत्रित परिणाम म्हणून रानमसले, नान्नज, गुळवंची, अकोलेकाटी या गावांमध्ये पूर्णपणे तंत्रशुद्ध कामे सुरू नसली तरी ओढा खोलीकरण, पाझर तलाव दुरुस्ती अशी मोठी कामे सुरू आहेत.

१९७२ च्या महाभीषण दुष्काळानंतर महाराष्ट्रात पाणलोट विकासाचे, जलसंधारणाचे अनेक शासकीय प्रकल्प हाती घेतले गेले. तरीही गावांगावांमध्ये पाण्याची ओरड होतच राहिली. गेल्या अडीच वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेतून काम केली जात आहेत. तंत्रशुद्ध कामांचा अभाव असलेली ही योजना ठेकेदारीला प्राधान्य देत असल्याची टीका काही जलतज्ज्ञ करत आहेत. या योजनांच्या माध्यमातून राजकीय नेते, ठेकेदार प्रथम पैसा मुरवतात, त्यानंतर पाणी.

सरकारच्या पाणलोट विकास योजनेत ठेकेदाराला महत्त्व असते. राजकीय नेत्यांचे, ठेकेदाराचेच त्यात भले होणार असल्याने लोकही या योजनांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत नाहीत. परंतु, राजकीय-व्यापारी हितसंबंध नसलेल्या निस्पृह व्यक्ती/संस्थांनी लोकांना विश्वासात घेऊन मार्गदर्शन केले, की ते हजारोंच्या संख्येने कामाला लागतात, हे आता उभा महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्रातील ३० तालुक्यांतील ५०० हून अधिक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने सध्या पाणी मुरवण्याचे तंत्रशुद्ध काम सुरू आहे. वॉटर कप स्पर्धेतील बक्षीस वगैरे हा दुय्यम भाग आहे. आपण आपल्या गावासाठी काही तरी करावे हा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरत आहे.

या घटकेला पानी फाउंडेशनसारखी संस्था श्रमदानाचा मोबदला म्हणून एक रुपयाही देत नाही. परंतु गावासाठी जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापन गरजेचे का, आहे याचे भान जरूर देत आहे. यासाठी चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरात पाणलोट व्यवस्थापनाचे विज्ञान शिकवले जाते. हे विज्ञान शिकवण्यासाठी सामाजिक संस्थांनी सखोल अभ्यास केल्याचे पदोपदी जाणवते. माळावर एक आडवा चर खोदल्यास त्यात किती पाणी मुरते, शोषखड्डा कसा घ्यावा, इथपासून पाझर तलावाच्या कामांचे तांत्रिक मागदर्शन या शिबिरात केले जाते.

पानी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेऊन आलेले बहुतांश लोक भारावलेले असतात. गावाला विधायक वळण देण्याचा प्रयत्न करतात. काही लोक ढेपाळतातही. बेलाटी, भागाईवाडी, हिरज येथील असेच भारावून आलेले लोक ५ एप्रिलला स्पर्धा सुरू झाल्यापासून आजतगायत ते गावात शोष खड्डे, वृक्षारोपण, मृदा, जलसंधारणाच्या रचना, माळावर माथा ते पायथा उपचारांवर भर, विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण, पाझर तलाव दुरुस्ती अशी अनेक कामे करीत आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यात जलसंधारणाच्या कामावरील समन्वयक विकास गायकवाड म्हणतात की, “बेलाटी, भागाईवाडी, हिरज या गावांतील माळरानांवर चर खोदण्यापासून विहिरी, बोअरवेलचे पुनर्भरण, पाझर तलाव दुरुस्ती अशी अनेक कामे सुरू आहेत. बेलाटी गावचे सरपंच सुनील काटकर पहाटेपासून रात्रीपर्यंत पाण्यासाठी श्रमदान करीत आहेत. १७ एप्रिल रोजी त्यांच्या घरात लग्न असतानाही ते सकाळी १० पर्यंत श्रमदान करत होते. लग्न समारंभ झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी कामावर हजर झाले. याच गावातील लोहार समाजाचे लक्ष्मण वाघमारे श्रमदानाला आलेल्या ग्रामस्थांच्या कुदळ, फावड्याच्या दुरुस्तीचे काम करतात. आरोग्य सेविका मोफत उपचार करतात. बेलाटी गावातील ८५ वर्षीय मायाबाई चव्हाण ४२-४३ अंश सेल्सियस इतक्या तापमानात माळरानावर पाणी अडवण्यासाठी आवश्यक असलेली कामे करत आहेत.

शेजारच्या हिरज गावातील डॉ. अमोल निकम श्रमदानाला जाणाऱ्या लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. तिऱ्हे गावातील नवल बनसोडे पाणलोट व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. गावातील लोक सामूहिक श्रमदानासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे त्या शेजारच्या हिरज गावात जाऊन श्रमदान करत आहेत. भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील आणि त्यांचे कुटुंबीय श्रमदान करत आहेत. पाणलोट व्यवस्थापनाच्या कामात ग्रामस्थांचा सहभाग वाढवा यासाठी प्रबोधनावर जोर दिला जात आहे. गावातील उमाकांत पाटील या तरुणाने पाणलोटाचे काम करण्यासाठी आवश्यक असलेला हायड्रोमार्कर बनवला आहे. यलमार मंगेवाडीने श्रमदानाला येणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ जाहीर केला आहे. लकी ड्रॉमध्ये सायकल, शिलाई मशीन, टीव्ही अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. काही लोक पाण्याची गरज ओळखून तर काही लोक बक्षीस मिळवण्याच्या हेतूने पाणलोट व्यवस्थापनाच्या कामाला लागली आहेत. पाणलोट व्यवस्थापनात काही कामे यंत्राच्या साहाय्याने करावी लागतात. निधीअभावी या कामांमध्ये सुरुवातीला अडचणी आल्या. परंतु, भारतीय जैन संघटनेसारख्या सामाजिक संस्थांनी या कामांसाठी मोफत मशिनरी उपलब्ध करून दिली आहे.’’

उत्तर सोलापूरच्या पडसाळी गावातील विष्णू भोसले, त्यांच्या पत्नी लक्ष्मी आणि इतर तिघे असे पाच जण पानी फाउंडेशनच्या प्रशिक्षण शिबिराला गेले होते. परतल्यानंतर भोसले यांनी सर्वच ग्रामस्थांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु माणिक माळी, शहाजी भोसले हे दोघेच त्यांच्यासोबत श्रमदानास तयार झाले. ही गोष्ट आमिरच्या कानावर गेली. तेव्हा या तिघांना भेटण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी एक दिवशी थेट पडसाळी गाव गाठले.

आमिर भेटायला येणार असल्याची माहिती विष्णू भोसले अथवा पडसाळी ग्रामस्थांना देण्यात आलेली नव्हती. आमिर अचानक आला, तेव्हा विष्णू भोसले, शहाजी भोसले, माणिक माळी हे तिघेही पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम करत होते. आमिरने त्यांची गळाभेट घेतली. त्यांच्यासोबत श्रमदानही केले. श्रमदान सुरू असताना गावातील काही लोक तलावाच्या बाजूलाच शौचास बसल्याचे आमिरच्या लक्षात आले. तलावाचा काही भाग हागणदारी झालेला होता. पडसाळीहून परत जाताना आमिर पुरता हादरून गेला होता. गावातील तीन माणसे श्रमदान करतात आणि इतर लोकांना याचे गांभीर्य कसे नाही, याचे वैषम्य त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मात्र, आमिरच्या त्या भेटीनंतर साधारण २० लोक श्रमदानासाठी पुढे आले. गावात प्रबोधनासाठी अनेक कार्यक्रम झाले. त्यानंतर लोकवर्गणी जमा होऊ लागली आहे.

परंतु, श्रमदानाचा उत्साह अपेक्षेइतका वाढताना अजूनही दिसत नाही. समाजाची कासवाच्या गतीने बदलणारी मानसिकता हे त्यामागचे कारण आहे. पण, ती कासवगतीने का होईना बदलते आहे, हाच आशावाद महाराष्ट्रातल्या गावागावांत सुरू झालेल्या पाणलोट विकास आणि पाणी व्यवस्थापन चळवळीला एकप्रकारे उभारी देणाराही ठरला आहे.


 

रेखाटू या पाणीदार नकाशे

– माधव गाडगीळ

महाराष्ट्राच्या खेड्या-खेड्यांना पाणीदार बनवणारा वॉटर कप उपक्रम महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेने आधुनिक माहिती युगात जोशात पदार्पण करण्याच्या दिशेनेही महत्वपूर्ण योगदान करू शकेल.

लंकादहन करणाऱ्या हनुमानजींच्या महापुच्छाच्या लांबीचा अंदाज करणे अवघड आहे, पण त्या खालोखाल सात फूट लांब शेपटीवाले चाक्मा बबून आफ्रिकेत राहतात. ह्या मर्कटांच्या टोळ्या ठराविक टापूत खाद्य शोधत फिरतात. चुकून शेजाऱ्यांच्या टापूत घुसल्यास भांडण-तंट्यात वेळ गमावतो. तेव्हा सगळे आपापल्या सीमेत राहण्याचा प्रयत्न करतात. जिथे टेकाडे, ओढ्यांसारख्या खाणाखुणा असतात, तिथे टापूंच्या सीमा चटकन उमगतात, भराभर खात राहता येते. अशा खाणाखुणा नसल्या तर सावधपणे टेहळणी करण्यात वेळ दवडतो. चाक्मा बबूनांच्या वेळापत्रकांच्या अभ्यासावरून दिसते की त्यांच्या मेंदूत परिसराचा एक नकाशा आखलेला असतो.

माणसांच्या मेंदूतही असे, अधिकच भक्कम नकाशे असतात, शिवाय संवादातून आसमंतातल्या खाणाखुणांची माहिती आप्तेष्टांकडे पोचवली जाते. लेखन-रेखाटन अस्तित्वात आल्यावर अशा माहितीच्या आधारे नकाशे बनवले जाऊ लागले. तीन हजार वर्षांपूर्वीच्या ईजिप्तमधील नकाशात नाइलच्या पूर्वेचे डोंगर, सोन्या-चांदीच्या खाणी, खाणींपासूनचे रस्ते दाखवले आहेत. एकूणच राज्यकर्त्यांना नकाशे हे महत्वाचे माहितीभांडार आहे.  सोळाव्या शतकात उदयाला आलेल्या आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर युरोपीय जगभर आपले वर्चस्व प्रस्थापित करू लागले. ह्या खटाटोपात होकायंत्रांसारखी उपकरणे, पृथ्वीचा गोलावा लक्षात घेणारी गणितीय तंत्रे व ह्यांवर आधारित नेटके नकाशे ह्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. नकाशे बनवण्यासाठी युरोपीयांनी स्थानिक ज्ञानही खुबीने वापरले. भारताचा ‘ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिक सर्व्हे’ करताना इंग्रज हिमालयातील गिरिजनांवर विसंबून होते. जगातले सर्वोच्च शिखर नयनसिंग रावतांनी दाखवून दिले; राणीने त्यांचा सन्मान केला, पण शिखराला एव्हरेस्ट ह्या सर्व्हेयर-जनरलचे नाव दिले. असे स्थानिकांच्या मदतीने बनवलेले सर्व्हे ऑफ इंडियाचे नकाशे इंग्रजांनी व नंतर भारत सरकारने अधिकृत गुपित बनवून राखले.  पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत ते खुल्या बाजारात विकले जात होते; तर इकडे भारतात परिसरशास्त्रीय अभ्यासासाठी मिळवणे अशक्यप्राय होते. १९७०च्या दशकात उपग्रहाची चित्रे उपलब्ध होऊ लागल्यावर अंतरिक्ष विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. सतीश धवनानी ठरवले की आता हे सगळे खुले करू व आपल्या सहकाऱ्यांकडून भारताच्या वृक्षाच्छादनाचा अभ्यास करवला. पण ह्यातून अधिकृत माहितीतल्या घोडचुका बाहेर यायला लागल्यावर शासकीय यंत्रणेने त्यात मोडता घातला.

पण आज डॉ. सतीश धवनानी लावलेले रोपटे लाल फितीतून डोके वर काढत एक महावृक्ष बनले आहे. आज नकाशांसकट नानाविध माहितीवरची, ज्ञानावरची  सरकारची  आणि तज्ञांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. ज्ञानप्रक्रियेत सर्वांनी भाग घ्यावा व मानवाची सर्व साहित्य-कला-ज्ञान निर्मिती सर्वांना उपलब्ध व्हावी हा आदर्श पुढे ठेवलेल्या विकिपीडिया ज्ञानकोशासारख्या पूर्ण विनामूल्य उपक्रमातून जगभरचे ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; आज विकिपीडिया मराठीसह शेकडो भाषांत उपलब्ध आहे. ह्याच धर्तीवरच्या ओपन-स्ट्रीट-मॅप ह्या उपक्रमातून सर्वांनी सहभागी होऊन संकलित केलेल्या जगभरच्या भौगोलिक माहितीचे भांडार सतत वाढते आहे. आज आपल्या स्मार्टफोनद्वारे आपण कोणत्याही स्थळाचे अक्षांश-रेखांश अजिबात लबाडी करता येत नाही अशा प्रकारे नोंदवू शकतो, ही माहिती ओपन-स्ट्रीट-मॅप प्रणालीद्वारे जगभर खुलेपणाने पसरवू शकतो. अर्थात ह्याची सरकारी यंत्रणेला धास्ती आहे, कारण एक शेततळे बांधून त्याचे वेगवेगळ्या बाजूने फोटो काढून दहा शेततळ्यांचे पैसे खिशात घालण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडली आहे. म्हणूनच माझ्या परिचयाच्या एका प्रामाणिक प्रशासकांचा प्रत्येक तळ्याचे नीट अक्षांश-रेखांश दाखवणारे फोटो काढले जावेत असा प्रयत्न हणून पाडला गेला. परंतु आपण जर निढळाचा घाम गाळत आपल्या गावात एक तळे बनवलेले असेल, तर त्याचा अक्षांश-रेखांशसहित फोटो व संबंधित माहिती विकिमिडीया कॉमन्सवर अथवा ओपन-स्ट्रीट-मॅपवर विनामूल्य चढवत सर्वांपर्यंत पोचवू शकतो. आपल्या गावाबद्दल २०११च्या जनगणतीच्या माहितीचा उपयोग करून मराठी अथवा इंग्रजी विकिपीडियात एक लेख सुरु करू शकतो, व त्या लेखात आपल्या विधायक कामाची, किंवा त्रासदायक प्रदूषणाची नोंद करू शकतो.

अजून मराठी मंडळी ह्या आधुनिक माध्यमांचा पुरेसा फायदा उठवत नाहीत. पण आज गाजत असलेली वॉटर कप मोहीम ह्या दिशेने महत्वाचे योगदान करू शकेल. ह्या मोहिमेत लोक झटून पाणी ह्या जिव्हाळ्याच्या नैसर्गिक संसाधनांचे लोकाभिमुख व्यवस्थापन म्हणजे काय असू शकते हे दाखवून देत आहेतच. पण त्या बरोबर महत्वाचे म्हणजे ह्या उपक्रमांतर्गत काय काय केले जात आहे ह्याची माहिती काटेकोरपणाने नोंदवली जात आहे. विकिपीडियातील लेखांत काहीही उल्लेख करायचा झाला तर अशा विश्वसनीय माहितीचा संदर्भ द्यावा लागतो. वॉटर कपच्या निमित्ताने अशा विश्वसनीय माहितीचे सर्व लोकांना खुले असे एक समृद्ध भांडार विकसित होते आहे; ह्याचा आधार घेत विकिपीडियामध्ये अशा प्रगतीशील गावांबद्दलचे, तसेच वॉटर कपच्या सगळ्या प्रक्रियेबद्दलचे उत्तम लेख लिहिता येतील, आणि त्याला जोडून ओपन-स्ट्रीट-मॅपच्या उपक्रमाद्वारे एक सुव्यवस्थित डेटा बेस व नकाशे निर्माण करता येतील. अशा प्रयत्नांतून वॉटर कपच्या मोहिमेत आलेले सगळे अनुभव, उपजलेले सगळे ज्ञान शाश्वत रूपाने जतन करता येईल, त्यातून सारखे शिकत राहता येईल, हा आदर्श देशभर, जगभर पसरवता येईल. पाणीदार हा शब्द आज जलयुक्त ह्या अर्थाने वापरला जाऊ लागला आहे. पण त्याचा मूळ अर्थ आहे खंबीर, स्वावलंबी. वॉटर कप मोहिमेतून गावे जलयुक्त बनण्याबरोबरच, त्यांबद्दलचे माहिती भांडार आणि नकाशेही स्वावलंबी व पाणीदार बनवता येतील!