दुष्काळाविरोधात लढणारी लोकचळवळ
पानी फाउंडेशन ही २०१६ मध्ये ना-नफा तत्त्वावर स्थापन झालेली संस्था. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी सत्यमेव जयते ह्या टीव्ही मालिकेच्या टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करायला हवेत, असं आम्हाला वाटतं. म्हणूनच, या दुष्काळाला पळवून लावण्यासाठी ह्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचे माध्यम पुरवणे, हे पानी फाउंडेशनचे लक्ष्य आहे. पानी फाउंडेशन सध्या जलसंधारण (शास्रशुद्ध पाणलोट व्यवस्थापन), नेतृत्वगुण आणि समाजबांधणी/संघटन या विषयांबाबत प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ९०% दुष्काळी भागात पानी फाउंडेशनचे काम सुरू आहे. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी गावकऱ्यांना दिलेली प्रेरणा म्हणून २०१६ यावर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेची निर्मिती झाली. २०१९ या वर्षातली वॉटर कप स्पर्धा ८ एप्रिल ते २७ मे या कालावधीत घेण्यात आली.

सत्यमेव जयते या मालिकेमुळे आम्हाला एक मोठी शिकवण मिळाली की, संवादाने माणसे कार्यप्रवण होऊ शकतात आणि अत्यंत सक्षमपणे ते स्वत:च परिस्थितीत बदल घडवून आणू शकतात. ह्या अनुभवामुळे, आम्ही विचार केला, की आपण एकच विशिष्ट सामाजिक समस्या घेतली आणि ठरावीक कालावधीपर्यंत त्याच समस्येवर लक्ष केंद्रित केले, तर कदाचित आपण एका मोठ्या सामाजिक स्थित्यंतराचे सक्रीय साक्षीदार ठरू. चर्चेअंती आम्ही निवडली पाण्याची समस्या. ग्रामीण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये दरवर्षी दुष्काळाचे सावट असते. परिणामी हजारो गावे त्यात होरपळली जातात, तिथले जनजीवन विस्कळीत होते. अभ्यासाअंती, आमच्या लक्षात आलं की, हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, हिवरे यांसारख्या काही गावांमध्ये स्थानिक गावकऱ्यांनी एकजूट आणि श्रमाच्या बळावर ‘पाणी’ या समस्येवर उपाय शोधून काढला. ग्रामस्थांना दुष्काळाशी लढा देण्यासाठी सक्षम आणि सक्रीय करण्याच्या हेतूने पानी फाउंडेशनने संवादाचे प्रभावी माध्यम बनून लोकजागराची मोहिम सुरू केली. महाराष्ट्रात एकूण ३५५ तालुके आहेत आणि या सर्व तालुक्यांमध्ये मिळून एकूण ४३,६६५ गावे आहेत. पहिल्या वर्षी ३ तालुक्यांमध्ये, दुसऱ्या वर्षी ३०, तिसऱ्या वर्षी ७५ आणि यंदा चौथ्या वर्षी ही स्पर्धा तब्बल ७६ तालुक्यांमध्ये पोहोचली. या जलचळवळीत सहभागी होण्याचे मी तुम्हालाही आमंत्रण देतो. आपण सगळेच एका मोठ्या जलक्रांतीचे साक्षीदार होऊया.
– आमिर खान
संस्थापक, पानी फाउंडेशन
बदलाच्या कथा
वॉटर कप स्पर्धेच्या या विलक्षण प्रवासात आमच्या हाती आल्या सामान्य लोकांच्या काही असामान्य कथा. आपला गाव पाणीदार करण्याच्या ध्यासाने गावकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना केला. पाणीस्वरुपात मिळालेल्या संपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत. पाहूया, सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ या स्पर्धेत यश मिळवलेल्या गावांच्या कथा!
सुर्डी, ता. बार्शी-विजेते, वॉटर कप २०१९
द्राक्ष उत्पादक असलेल्या या गावावर पाण्याअभावी द्राक्षांच्या बागांना टॅंकरने पाणी देण्याची वेळ आली होती. संपूर्ण गावाने मोठ्या मेहनतीने जलसंधारणाची कामं केली व यापुढे अनेकांनी द्राक्ष उत्पादन कमी करून कमी पाण्यावरची पिकं घेण्याची तयारी दर्शवली आहे.
पिंपरी जलसेन, ता. पारनेर-द्वितीय पारितोषिक (विभागून)
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेदरम्यान होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना मनरेगाची जोड देत पिंपरी जलसेनच्या गावकऱ्यांनी मोठ्या खुबीने रोजगारामार्फत पाणीदार होण्याकडे प्रवास सुरू केला आहे.
शिंदी खुर्द, ता. माण-द्वितीय पारितोषिक (विभागून)
१२ महिने पिक घेणाऱ्या शिंदी खुर्दला गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईचे दिवस पहावे लागले. आपले गतवैभव परत मिळवण्यासाठी यावर्षी गावाने जलसंधारणाची कामे केली तसेच पुढील वर्षांमध्ये गाव पाण्याच्या योग्य वापरावर भर देणार आहे.
देवऱ्याची वाडी, ता. बीड तृतीय पारितोषिक (विभागून)
उसतोडीसाठी गावापासून दूर मैलोनमैल स्थलांतरीत व्हावं लागणाऱ्या या गावातील अनेकानीं मनाशी ठरवलं आणि जिद्दीनं जलसंधारणाची कामं केली. गावातून वाहून जाणारे पाणी बघत बसणाऱ्या गावकऱ्यांनी या वर्षी शिवारात पाण्यासाठी बॅंका तयार केल्या आहेत.
आनोरे, ता. अमळनेर-तृतीय पारितोषिक (विभागून)
१२ महिने टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अमळनेर तालुक्यातल्या आनोरे या गावाने यंदा पाण्याविषयी धडा गिरवला आहे. जलसंधारांबरोबरच संपूर्ण गावात रेनवॉटर हार्वेस्टिंग करून गावात पडणारा थेंब न थेंब जमिनीत मुरवला आहे.
बोरव्हा बुद्रुक, ता. मंगरुळपीर तृतीय पारितोषिक (विभागून)
तीन बाजूंनी नदीने वेढलेलं बोरव्हा बुद्रुक हे गाव, पावसाळ्यात पूर तर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जातं. गेल्या वर्षापासून सातत्याने जलसंधारणाची कामं करत या गावाने बरीचशी परिस्थिती आटोक्यात आणली आहे.
चिलेवाडी, ता. कोरेगाव
शेतीला जोडधंदा म्हणून इथले अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. दुष्काळाची झळ बसल्यानंतर अनेकांना आपली जनावरं विकावी लागली. ही वेळ परत येऊ नये म्हणून जलसंधारणाच्या कामांसोबतच भविष्यात पाण्याचा हिशोब ठेवायचा निश्चय चिलेवाडी गावाने केला आहे.
मांडवखेल, ता. बीड
मराठवाड्याने यंदा दुष्काळाचं रौद्र रुप पाहिलं. या परिस्थितीतही मांडवखेलने, प्रशिक्षणानंतर एकही दिवस न गमावता मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने जलसंधारणाचे उपचार गावात उभे केले.
वडनेर हवेली, ता. पारनेर
नोकरीधंद्याच्या निमित्ताने गाव सोडून गेलेली वडनेर हवेलीची तरुणाई एकत्र आली आणि जलसंधारणाच्या कामांचा नांगर स्वतःच्या खांद्यावर घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली वडनेर हवेलीने दुष्काळाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाईने ठरवलं तर काहीच अशक्य नसतं याचा हा पुरावा.
बांडा पिंपळ, ता. जळगाव जामोद
मजुरीवर जगणाऱ्या आदिवासी जमातीचं हे गाव. कोणाचीच स्वतःची शेती नाही. पाणी असलं तर शेती होणार, तरच मजुरी मिळणार असं सोपं गणित मांडून खडकाला धडका देत गावकऱ्यांनी जिद्दीनं काम केलं आहे.
चिंचोली पिंपरी, ता. जामनेर
पाण्याचा अतिउपसा केल्यामुळे केळीचे पिक सोडून चिंचोली पिंपरीकरांना कमी पाण्यावरच्या कपाशीकडे नाईलाजानं वळावं लागलं. अनुभवातून शिकून चिंचोली पिंपरीने गेल्या वर्षापासून जलसंधारणाचं काम सुरू केल व येत्या काही काळात पुन्हा एकदा संपन्न होण्याचा गावाचा प्रयत्न आहे.
तरसवाडी, ता. खटाव
गावातले गटतट आणि राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी एकत्र येत तरसवाडी गावाने इतिहास रचला. जलसंधारण तर केलंच पण त्याचबरोबर समृद्धतेकडे जाण्यासाठीचे अनेक महत्त्वाचे निर्णय गावाने एकमताने घेतले.
उमठा, ता. नरखेड
१९९८ पासून जलसंधारणाच्या कामांचा इतिहास असूनही केवळ पाण्याचं नियोजन न केल्यानं दुष्काळाच्या दरीत कोसळलेल्या कुंभारवाडी गावाने पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली व जलसंधारणासोबत पाण्याचा ताळेबंद पाळण्याबाबत कठोर नियमावली करण्याची शपथ घेतली.
जानोरी, ता. कारंजा लाड
सातत्याने तीन वर्षे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेत, सपाट भूभागा असूनही गावाने विविध जलसंधारणाची कामं टप्प्या टप्प्याने केली व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
कणसेवाडी, ता. संगमनेर
आपलंही गाव हिवरेबाजार सारखं स्वयंपूर्ण व्हावं यादृष्टीने काम करण्यासाठी कणसेवाडीच्या गावकऱ्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ कडे एक संधी म्हणून पाहिलं. उत्तम नियोजन आणि श्रमदानाच्या जोरावर येत्या काळात कणसेवाडी नक्कीच आदर्श गावांमध्ये समाविष्ट होईल.
सहभागी व्हा
तुम्हाला या जलचळवळीत सहभागी व्हायचे आहे का? येथे क्लिक करा.
सहभागी व्हा
तुम्हाला या जलचळवळीत सहभागी व्हायचे आहे का? येथे क्लिक करा.
आधारस्तंभ
आधारस्तंभ