आमची मोहीम

संवाद माध्यमाचे सामर्थ्य वापरून महाराष्ट्राला दुष्काळ-मुक्त करायचे, असे ध्येय निश्चित करूनच पानी फाउंडेशनची निर्मिती झाली. सत्यमेव जयतेच्या टीमने पाण्याच्या समस्येविषयी सखोल संशोधन केले. दुष्काळाच्या समस्येला निसर्ग नाही तर मनुष्याचा निष्काळजीपणा जबाबदार आहे, हे सत्य त्यांच्या हाती लागले. पाणलोट व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण हा या समस्येवरचा शास्त्रशुद्ध उपाय होता, पण या मार्गातला सर्वात मोठा अडथळा होता, तो म्हणजे समाज-मनातली दरी. पानी फाउंडेशन ही एकजूटीवर १००% विश्वास ठेवणारी संस्था आहे आणि दुष्काळाची समस्या सोडवायची असेल तर लोकांनीच एकत्र येऊन ही चळवळ हाती घेतली पाहिजे, असे आमचे ठाम मत आहे. म्हणूनच ह्या चळवळीला पाठबळ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

एक अत्यंत परिपूर्ण आणि अनुभवसंपन्न असा प्रशिक्षण कार्यक्रम गावकऱ्यांसाठी आखण्यात आला. दुष्काळाला तोंड देताना, आवश्यक त्या सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींबरोबरच नेतृत्त्व-कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यासाठी सोप्या भाषेतील काही प्रशिक्षण माहितीपट (फिल्म्स), एक अँड्रॉईड अ‍ॅप आणि प्रशिक्षण माहितीपत्रक (मॅन्युअल) आम्ही तयार केले आहेत आणि ह्याची माहिती देण्यासाठी पूर्ण राज्यभर आमची टीम कार्यरत आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून दरवर्षी, ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही स्पर्धा भरवतो. या स्पर्धेमध्ये, सर्वोत्कृष्ट पाणलोट व्यवस्थापनाचे बक्षीस मिळवण्यासाठी गावागावांमध्ये चुरस लागते. चार वर्षांपूर्वी, प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या कामाला आता एका चळवळीचे स्वरूप आले आहे आणि आता आम्ही त्याचा फारच लहान घटक राहिलो आहोत; गावकऱ्यांच्या परिश्रमांनी हे दाखवून दिले आहे की, जलक्रांती आता फार दूर नाही.