फार्मर कप: नियम आणि मूल्यांकन
पहिल्या टप्प्यातील प्रमुख उद्दिष्टे:
1. गटशेतीतूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात – याचा प्रत्यक्ष अनुभव घडवून आणणे.
2. सामूहिकता म्हणजेच collectivism या प्रक्रियेची गोडी निर्माण करणे. त्यासाठी या प्रक्रिये मार्फत आनंद निर्माण करणे.
3. चांगल्या पद्धतीने काम करणारे गट ओळखणे. हे गट म्हणजे शेतकऱ्यांच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची क्षमता असणारे अधिक मोठे गट / FPCs बनण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी असतील.
4. गटशेतीच्या प्रक्रियेला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी योग्य प्रेरणा, दृष्टी आणि क्षमता असणारे चांगले नेतृत्व ओळखणे.
5. शेती एक व्यवसाय आहे, म्हणून त्याच्या जमाखर्चाबाबत शेतकऱ्यांचे बारीक लक्ष केंद्रित करणे.
स्पर्धेचे नियम
1. पीक निहाय गट:
गटातील सर्व शेतकरी सारखेच पीक घेत असावेत. म्हणजेच गट हे पीक निहाय असावेत. यामुळे एका गटातील सर्व शेतकऱ्यांच्या समस्या व त्यावर उपाय मोठ्या प्रमाणात सारखेच असतील.
गटातील काही शेतकरी आंतर पीक घेत असतील किंवा मिश्र पीक पद्धतीने शेती करत असतील. हे शेतकरी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. मात्र गटातील सर्व शेतकऱ्यांनी तेच आंतरपीक किंवा मिश्र पीक त्याच प्रमाणात घ्यावे. उदा. जर एखाद्या गटात सोयाबीन (४ ओळी) हे मुख्य पीक आहे व तूर (२ ओळी) हे आंतरपीक आहे तर अशा गटाने सोयाबीन हे मुख्य पीक निवडून स्पर्धेचा प्रवेश अर्ज भरावा. अट एवढीच आहे की गटातील सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन तसेच तुरीची लागवड करावी व सर्वांनी सोयाबीन ४ ओळी व तूर २ ओळी हे प्रमाण राखावं.
शेतकरी एकाहून अधिक गटात सामील होऊ शकतो. पण एका पिकासाठी एकाच गटाचा सदस्य असू शकतो. मात्र प्रत्येक गट हा पीक निहाय असावा.
2. एकाहून अधिक गावच्या शेतकऱ्यांचे गट
गटातील शेतकरी जवळ असणाऱ्या एकाहून अधिक गावचे पण असू शकतात.
3. किमान क्षेत्र
गटामार्फत ठरलेल्या पिकाखाली किमान २५ एकर शेती असावी. या २५ एकरातून निघणारा सर्व माल हा विक्रीकरिता असावा – घरगुती वापरासाठी नव्हे. किमान २५ एकर शेती करणारे शेतकरी एकत्र आल्यामुळे त्यांना खरेदी आणि विक्री करताना फायदा होईल. गटातील कोणत्याही एका शेतकरी कुटुंबाचे क्षेत्र हे गटातील एकूण क्षेत्राच्या ५०% पेक्षा जास्त नसावे.
4. किमान शेतकरी संख्या
गटात किमान २० कुटुंबातील शेतकरी असावेत. एकाहून अधिक खातेदार असणारे कुटुंब जर एकत्र शेती / व्यवसाय करत असेल, तर त्याला एकच कुटुंब मानण्यात येईल.
5. गटाने स्पर्धेत भाग कसा घ्यावा
स्पर्धेत भाग घेण्यासाठी पानी फाउंडेशनचा प्रवेश अर्ज दोन टप्प्यात भरायचा आहे.
पहिला टप्पा: https://cutt.ly/gat-sheti या लिंकद्वारे एक फॉर्म भरायचा आहे ज्यात गटाचे नाव, प्रस्तावित पीक, तीन निमंत्रकांची नावे, फोन नंबर, तसेच, स्पर्धेतील पिकाखाली प्रत्येकाचे क्षेत्र हे नमूद करावे. हा फॉर्म १५ मे २०२२ पर्यंत भरणे अपेक्षित आहे.
दुसरा टप्पा: सर्व निमंत्रकांना https://cutt.ly/farmer-nondni ही नवीन लिंक पाठवण्यात येईल, ज्याद्वारे गटातील उर्वरित सदस्यांची नावे, फोन नंबर, तसेच स्पर्धेतील पिकाखाली प्रत्येकाचे क्षेत्र हे नमूद करावे. ही माहिती ३१ मे २०२२ पर्यंत भरणे अपेक्षित आहे. ही सर्व माहिती वेळेत भरल्यावरच गटाचा स्पर्धेत प्रवेश पूर्ण होईल.
गटात महिला तसेच पुरुष असू शकतात.
आज अस्तित्वात असलेले महिला बचत गट तसेच शेतकरी बचत गट या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. मात्र प्रवेश अर्ज भरत असताना गट नोंदणीकृत असणे बंधनकारक नाही.
कृपया नोंद घ्या:
- काही कारणास्तव गटातील सदस्य बदलायचे असल्यास किंवा नवीन सदस्य गटात जोडायचे असल्यास हे बदल ३० जून २०२२ पर्यंत केले जाऊ शकतात. ३० जून २०२२ पर्यंत तयार झालेली यादी अंतिम समजली जाईल. त्यानंतर सदस्यांमध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.
- गटातील काही सदस्य जर अकार्यरत असतील आणि त्यांच्यामुळे गटाच्या गुणांवर परिणाम होत असेल तर अशावेळी गटाने अशा सदस्यांची माहिती पानी फाउंडेशनला कळवावी. गट एकूण सदस्य संख्येच्या जास्तीतजास्त १०% अकार्यरत सदस्यांची माहिती पानी फाउंडेशनला कळवू शकतो. या अकार्यरत सदस्यांची माहिती गुण देण्यासाठी मोजली जाणार नाही पण गटाच्या एकूण गुणांपैकी काही गुण पुढीलप्रमाणे कपात करण्यात येतील:
अकार्यरत सदस्यांची टक्केवारी | गटाच्या एकूण गुणांपैकी कपात होणारे गुण |
०% + ते ५% | ५ |
५% + ते १०% | १० |
6. स्पर्धेतील तालुके व गावे
ही स्पर्धा सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा भाग आहे. तेव्हा गटातील सदस्य हे समृद्ध गाव स्पर्धेतील ३९ तालुके व त्यांतील गावातून असावेत. मात्र गटातील जास्तीतजास्त २५% सदस्य हे अशा गावातूनही असू शकतात जी समृद्ध गाव स्पर्धेत भाग घेत नाहीयेत, परंतु स्पर्धक गावाच्या जवळ आहेत. मात्र गटातील सर्व निमंत्रक हे फक्त समृद्ध गाव स्पर्धेतील गावांचेच असावेत.
प्रत्येक तालुक्यातून किमान १० गट स्पर्धेत असणे अपेक्षित आहे.
7. स्पर्धेतील पीके
या स्पर्धेत खरीपांतील सर्व मुख्य पिकांचा समावेश आहे. ती पुढीलप्रमाणे आहेत:
- बाजरी
- मका
- भात
- ज्वारी
- नाचणी
- तूर
- मूग
- उडीद
- भुईमूग
- सोयाबीन
- कापूस
- धने
- ओवा
- घेवडा
- पत्ताकोबी/कोबी
- कॉलीफ्लावर/फुलकोबी
- शिमला मिरची
- वांगी
- भेंडी
- कांदा
- तोंडली
- बटाटा
- रताळे
- भोपळा
- टोमॅटो
- कारले
- दुधी भोपळा
- पडवळ
- दोडकी
- घोसावळी
- वाटाणा
- मिरची
- कोथिंबीर
- मेथी
- पालक
- गवार
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे Directorate of Statistics and Economics मार्फत ज्या खरीप पिकांच्या जमाखर्चाचा अभ्यास उपलब्ध आहे ती पिके स्पर्धेत समाविष्ट केली आहेत.
8. खरीप हंगाम – शेवटची तारीख
स्पर्धेतील सर्व पिकांची कापणी करून त्याबाबत सर्व डेटा ३१ जानेवारी २०२३ पर्यंत भरणे बंधनकारक आहे. काही पिकांचे अधिक तोडे निघतात उदा: कापूस. अशा पिकांचे ३१ जानेवारी पर्यंत जे तोडे निघाले त्यांची माहितीच स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
काही पिके कमी कालावधीची असल्यामुळे ३१ जानेवारी २०२३ च्या आत दोन पिके घेणे शक्य आहे. उदा: मूग आणि कॉलीफ्लावर. पूर्ण गटाने असे नियोजन केल्यास दोन पिके घेणे ग्राह्य धरण्यात येतील. मात्र कापणी पूर्ण होऊन त्याबाबत सर्व डाटा ३१ जानेवारी २०२३ पर्यंत भरणं बंधनकारक आहे. तसेच मूल्यांकन पद्धतीत असणारे सर्व विभाग दोन्ही पिकांसाठी स्वतंत्रपणे लागू होतील.
9. बक्षिसे
बक्षिसे ही गटाला दिली जातील.
राज्यपातळीवर तीन बक्षिसे दिली जातील. पहिले बक्षीस असेल रू. २५ लाख दुसरे रू. १५ लाख, तिसरे रू. १० लाख.
तालुका पातळीवर एक लाख रुपयांचे एकच बक्षिस असेल. मात्र ७०% पेक्षा कमी गुण मिळणारे गट या बक्षीसाला पात्र असणार नाहीत. उदा: एखाद्या तालुक्यात जर एकही गटाला ७०% गुण मिळाले नसतील, तर तालुका पातळीवर एकही बक्षीस दिले जाणार नाही.
ज्या गटाला राज्य पातळीचे बक्षीस मिळेल, त्या गटाचा तालुका पातळीच्या बक्षीसासाठी विचार केला जाणार नाही.
पानी फाउंडेशनमध्ये कार्यरत कोणताही सदस्य अथवा त्याचे / तिचे कुटुंब सहभागी असलेला गट स्पर्धेच्या बक्षिसासाठी पात्र असणार नाही.
10. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेवटची तारीख
स्पर्धेत भाग घेण्यासाठी गटाने १५ मे २०२२ पर्यंत प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण करावा. व ३१ मे २०२२ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करावा.
ही स्पर्धा १५ मे २०२२ ला सुरु होईल.
11. जजिंग/निर्णय प्रक्रिया
स्पर्धेसाठी लागणारा डेटा गटाला पानी फाउंडेशन ॲपवर भरायचा आहे. बक्षीस जिंकण्याची शक्यता असणाऱ्या गटांनी / गटातल्या शेतकऱ्यांनी पाठवलेल्या डेटाचे सत्यापन पानी फाउंडेशनने नेमलेल्या एक किंवा अधिक टीम्स करतील. सत्यापन करण्यासाठी जमाखर्चाच्या नोंदवह्या व इतर डॉक्युमेंट्सची पडताळणी होईल. तसेच गटाने दिलेली माहिती तपासण्यासाठी (उदा. गटातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात इर्जिक झाले का?) गटातील वैयक्तिक सदस्यांच्या मुलाखती घेतल्या जातील.
गटाने स्पर्धेअंतर्गत केलेल्या सर्व उपक्रमांचे/कामांचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
गटाने ज्या दरात मालाची विक्री केली आहे यावर विशेष लक्ष देण्यात येईल. यासाठी व्यापाऱ्याच्या पट्ट्या तपासल्या जातील तसेच त्या वेळेस मार्केटचे दर काय होते हेही तपासले जाईल.
ज्या गटांनी जाणून बुजून खोटी माहिती दिली आहे त्या गटांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
दुष्काळ, पूर इत्यादीसारख्या हवामान आणि नैसर्गिक आपत्तींमुळे गटाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. दुर्दैवाने, स्पर्धेच्या नियमांद्वारे ते मोजले जाऊ शकत नाही आणि स्पर्धेच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो – याची कृपया नोंद घ्यावी.
12. पानी फाउंडेशनच्या जजेसनी घेतलेला निर्णय अंतिम असेल.
मूल्यांकन पद्धत
(i) ज्ञान: ३० गुण
(ii) उत्पादन प्रक्रिया: ३० गुण
(iii) शाश्वत शेती: ३० गुण.
(iv) विक्री: ३० गुण
(v) संस्था म्हणून गटाची कामगिरी : ८० गुण
एकूण = २०० गुण
ज्ञान: ३० गुण
1. शेतीच्या SOP/उत्तम पद्धतींची निवड करणे – ५ गुण
प्रत्येक गटाने स्वतःसाठी पूर्वमशागत ते कापणी व साठवणुकीपर्यंत शेतीच्या SOP (Standard Operating Practices)/उत्तम पद्धतींची निवड करणे आवश्यक आहे. गट घेत असणाऱ्या पिकासाठी अशा १० किंवा अधिक SOP/ उत्तम पद्धती ठरवून घेणे अपेक्षित आहे. या पद्धती निवडताना गटाच्या सर्व सदस्यांची सहमती आवश्यक आहे. शेतीत अडचणी आल्यावर ऐन वेळी धावपळ करण्याऐवजी अडचणी येऊच नयेत यासाठी अशा शेतीच्या पद्धतींचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेती ज्ञानाधारित करण्याचा हा मार्ग आहे. शेतीच्या SOP/उत्तम पद्धतींचे काही विषय पुढीलप्रमाणे: जमिनीची पूर्वमशागत, बीजप्रक्रिया, पेरणीची पद्धत, दोन रोपांमधील व ओळींमधील अंतर, अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, कापणी, साठवणूक इ.
गटाने ठरवलेल्या पिकासाठी शेतीच्या SOP/उत्तम पद्धतींची निवड ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. हे तज्ज्ञ कृषि विद्यापीठातील असू शकतात, किंवा प्रगतिशील शेतकरी असू शकतात किंवा इतरही कुणी असू शकतात. पानी फाउंडेशन गटाला तज्ज्ञांसोबत जोडून देण्याचा प्रयत्न करेल. मात्र गट त्यांच्या तज्ज्ञांची निवड स्वतः करू शकतात आणि आपल्या गटासाठी शेतीच्या SOP/उत्तम पद्धतींची निवड करणे ही पूर्णपणे त्या त्या गटाची जबाबदारी आहे.
पिकाच्या लागवडीपूर्वी गटाने या SOP / उत्तम पद्धतींची नोंद पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. त्यासाठी गटाला ५ गुण मिळतील.
2. निवडलेल्या SOPs/उत्तम पद्धतींची अंमलबजावणी – २० गुण
गटातील प्रत्येक सदस्याने निवडलेल्या SOP/उत्तम शेती पद्धतींपैकी कोणत्या पद्धतींची अंमलबजावणी केली याची नोंद पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. निवडलेल्या एकूण पद्धतींपैकी गटातले सर्व सदस्य किती पद्धतींची अंंमलबजावणी करतील त्याप्रमाणात गटाला गुण मिळतील. उदा. समजा गटाने १० पद्धतींची निवड केलेली आहे. गटातल्या सर्व सदस्यांनी सर्व म्हणजेच १० पद्धतींची अंमलबजावणी केली, तर गटाला पूर्ण २० गुण मिळतील. मात्र जर गटातल्या सर्व सदस्यांनी १० पैकी ८ पद्धतींची अंमलबजावणी केली, तर गटाला १६ गुण मिळतील.
गटातील सदस्यांनी अंमलबजावणी केलेल्या सर्व SOP/उत्तम शेतीपद्धतींचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
3. एकमेकांकडून तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांकडून शिकण्यासाठी केलेले प्रयत्न – ५ गुण
उत्पादकतेत वाढ, उत्पादित केलेल्या मालाच्या गुणवत्तेत सुधारणा आणि उत्पादन खर्चात कपात तेव्हाच शक्य आहे जेव्हा शेतकरी आपल्या ज्ञानात सतत सुधारणा करत जातील. एकमेकांकडून शिकणे आणि प्रगतिशील शेतकऱ्यांकडे अभ्यासभेटी हे ज्ञान मिळवण्याचे महत्त्वाचे उपाय आहेत. पुढील प्रयत्न केल्यास गटांना ५ गुण मिळतील:
- गट घेत असलेले पीक घेणाऱ्या प्रगतिशील व यशस्वी शेतकऱ्यांना भेटी: भेट दिलेल्या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव व भेटीची तारीख यांची नोंद गटाने पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. किमान एका प्रगतिशील शेतकऱ्याला भेट दिल्यास गटाला १ गुण मिळेल.
गटाने केलेल्या अशा भेटीचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
- अशा शिवारफेऱ्या ज्यात गटाचे सदस्य एकमेकांच्या शेतांना भेट देतील आणि एकमेकांच्या शेताचे बारीक निरीक्षण करतील: या शिवारफेऱ्यांच्या तारखांच्या नोंदी गटाला पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. प्रत्येक शिवारफेरीसाठी गटाला १ गुण मिळेल. या विभागात एकूण ३ गुण असतील.
गटाने केलेल्या शिवारफेऱ्यांचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
- पिकांची माहिती व फोटो गटातल्या सदस्यांसोबत शेअर करण्यासाठी गटाला आपला व्हाट्सॲप ग्रुप बनवणे आवश्यक आहे. एकमेकांकडून शिकण्याच्या दृष्टीने गटातील सदस्य या ग्रुपवर समस्या व उपायांची चर्चा करू शकतात. या ग्रुपवर करमणूक, राजकारण इ. विषयी किंवा शेतीशी संबंधित नसणारी इतर कोणतीही चर्चा होणार नाही याची गटाला काळजी घ्यायची आहे. असा व्हाट्सॲप ग्रुप सुरू करून कार्यरत ठेवणाऱ्या गटाला १ गुण मिळेल.
उत्पादन प्रक्रिया: ३० गुण
1. एकत्रित निविष्ठा खरेदी: १० गुण
एकत्र निविष्टा खरेदी केल्यामुळे खर्चात बचत होते. त्यामुळे गटातील सदस्यांनी निविष्ठांची खरेदी एकत्र गटामार्फत करण्यासाठी खालील तक्त्याप्रमाणे गटाला गुण देण्यात येतील.
निविष्ठांच्या एकूण खर्चापैकी किती टक्के खर्च गटामार्फत करण्यात आला | गुण |
७५% + | १० |
६०% + ते ७५% | ८ |
५०% + ते ६०% | ६ |
४०% + ते ५०% | ४ |
३०% ते ४०% | २ |
३०% पेक्षा कमी | ० |
गटाने निविष्ठांची खरेदी एकत्र केली आहे की नाही हे तपासण्यासाठी विक्रेत्याची पावती प्रमाण मानण्यात येईल. या एकत्र खरेदीची नोंद, तसेच गटातील प्रत्येक शेतकऱ्याने वैयक्तिकरित्या केलेल्या खरेदीच्या नोंदी व खरेदीच्या पावत्यांची नोंद पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे.
2. इर्जिक: २० गुण
सामूहिक श्रम किंवा इर्जिक हा आपल्या समृद्ध परंपरेचा एक भाग आहे. याला महाराष्ट्राच्या विविध भागांत पडजी/सावड/पैरा/वारंगूळा/सायळ असंही म्हटले जाते. यात शेतकरी एकमेकांच्या शेतात पेरणी, कोळपणी इ. कामे करतात. इर्जिकमुळे शेतकऱ्यांमध्ये एकमेकांप्रती विश्वास व घट्ट नाते तयार होतं. इर्जिकमध्ये शेतकरी एकत्र आल्यामुळे शेती आनंददायी बनते. शेतीतल्या कोणत्या कामामध्ये इर्जिक केलं याची नोंद पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. पूर्ण गुण मिळण्यासाठी किमान ५ शेतकामांसाठी इर्जिक करणे अपेक्षित आहे. इर्जिक केलेल्या अशा प्रत्येक कामासाठी गटाला ४ गुण मिळतील. गटातल्या शेतकऱ्यांनी शेतीतील ५ कामांसाठी इर्जिक केले, तर गटाला या विभागाचे पूर्ण म्हणजेच २० गुण मिळतील. त्यांनी शेतीतील एकाच कामासाठी इर्जिक केले, तर गटाला या विभागाचे केवळ ४ गुण मिळतील.
गटाने इर्जिकसाठी निवडलेल्या प्रत्येक कामासाठी, गटातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर इर्जिक करणे आवश्यक आहे. गटातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकच इर्जिकमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता नाही, मात्र प्रत्येक सदस्याने किमान काही इर्जिकमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. जर इर्जिकसाठी निवडलेल्या कामांपैकी एका कामात गटातील एखाद्या शेतकऱ्याने इर्जिकमध्ये एकदाही सहभाग नोंदवला नाही किंवा जर गटातील एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर इर्जिक अजिबात झाले नाही, तर गटाला त्या कामासाठी ० गुण मिळतील.
मोबदला देऊन केलेलं काम ईर्जिकमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही.
गटाने या विभागाअंतर्गत केलेल्या सर्व उपक्रमांचे/कामांचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
शाश्वत शेती: ३० गुण
1. विषमुक्त शेती: २० गुण
शेतीतील रसायनांचा वापर कमी करणे, विशेषतः कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा वापर कमी करणे हे शेतमालाचा ग्राहक, शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. रसायनमुक्त कीडनियंत्रण/NPM हे त्या दिशेने टाकायचे एक महत्त्वाचे पाउल आहे. कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर टाळण्यासाठी उपयुक्त अशा अनेक पद्धती आहेत – उदा. मिश्र पिकपद्धती, चिकट सापळ्यांचा व कामगंध सापळ्यांचा वापर, जैविक कीटकनाशकांचा वापर इ.
या पद्धती वापरून शेती खरोखर विषमुक्त झाली की नाही याची पडताळणी करण्यासाठी शेतमालामध्ये रसायनांचे किती अंश आहेत हे प्रयोगशाळेत तपासावे लागेल. भारत सरकारने प्रत्येक पिकामध्ये रसायनांचे जास्तीत जास्त किती अंश असू शकतात याची मर्यादा स्पष्ट केली आहे. या मर्यादेचे पालन करूनच गटातील प्रत्येक शेतकऱ्याने शेतमालाचे उत्पादन करावे हे गटाचे उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी गटाने रॅंडम पद्धतीने निवडलेल्या शेतमालाच्या नमुन्याची चाचणी सरकारमान्य प्रयोगशाळेत करणे आणि तिच्या निकालाची नोंद पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. रॅंडम पद्धतीने शेतमालाचा नमुना कसा घ्यायचा हे पानी फाउंडेशनने मान्यता दिलेली एक त्रयस्त संस्था स्पष्ट करेल. सरकारने नेमून दिलेल्या पीकनिहाय रसायन अंशांच्या मर्यादा (maximum residue limits) सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या जातील. जर शेतमालामधील रसायनांचे अंश सरकारने आखलेल्या मर्यादेत असतील, तर गटाला पूर्ण २० गुण मिळतील.
प्रयोगशाळेत अशी चाचणी करण्याचा पूर्ण खर्च गटाला करावा लागणार आहे. परंतु विषमुक्त शेतमालाला बाजारात जास्तीचा भाव मिळण्यासाठी गटाला या चाचणीच्या रिपोर्टची मदत होईल.
2. जल बचतीच्या साधनांची टक्केवारी – ड्रीप, स्प्रिंकलर, बीबीएफ, आच्छादन: ५ गुण
ठीबक सिंचन, तुषार सिंचन, आच्छादन, बीबीएफ यामुळे जलबचत शक्य होते. गटातील किती सदस्य यापैकी एक किंवा अधिक उपाय करत आहेत आणि किती क्षेत्रावर करत आहेत याची नोंद पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. गटाच्या एकूण सिंचित क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र या जलबचतीच्या साधनांखाली आहे त्यानुसार गटाला पुढीलप्रमाणे गुण मिळतील:
गटाच्या एकूण सिंचित क्षेत्रापैकी किती % क्षेत्र जलबचतीच्या साधनांखाली आहे | गुण |
७५% + | ५ |
७०% + ते ७५% | ४ |
६५% + ते ७०% | ३ |
६०% + ते ६५% | २ |
५५% ते ६०% | १ |
५५% पेक्षा कमी | ० |
या विभागाचे गुण मोजताना कोरडवाहू क्षेत्र गटाच्या एकूण क्षेत्रात मोजले जाणार नाही.
गटाने या विभागाअंतर्गत केलेल्या सर्व कामांचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
3. आगपेटीमुक्त शिवार: ५ गुण
गटाच्या संपूर्ण क्षेत्रात पिकाचे अवशेष न जाळता कोणत्याही पद्धतीने त्यांचे कंपोस्ट बनवणाऱ्या गटाला ५ गुण मिळतील. पिकांचे अवशेष कुटी करून जमिनीत मिसळता येऊ शकतात, किंवा त्यांच्यापासून बायोगॅस व स्लरी बनवता येऊ शकते, किंवा त्यांच्यापासून बायो डायनॅमिक / वेस्ट डीकंपोजर / नॅडेप पद्धतीने कंपोस्ट बनवले जाऊ शकते. जोपर्यंत पिकांचे अवशेष जाळले जात नाहीत, तोपर्यंत कंपोस्टिंगची कोणती पद्धत वापरायची हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक शेतकऱ्याला असेल. गटातील प्रत्येक सदस्याने पिकांच्या अवशेषांवर कोणती प्रक्रिया केली आहे याची नोंद गटाने पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे.
तसेच याचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
विक्री: ३० गुण
1. विक्रीसाठी सामूहिक प्रयत्न: १० गुण
आपल्या सामूहिक शक्तीचा वापर करून शेतमालाला जास्त भाव मिळवणे हे गट स्थापन करण्यामागचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी गटाने शेतमालाची एकत्र विक्री करणे महत्त्वाचे आहे. गटातील प्रत्येक सदस्याचे किती उत्पन्न आले याविषयीच्या नोंदी गटाला पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. त्याचसोबत एकूण उत्पन्नापैकी किती उत्पन्न गटामार्फत एकत्र विक्रीतून मिळाले याविषयीच्या नोंदी, तसेच त्याला आधार म्हणून आवश्यक डॉक्युमेंट व पावत्यांच्या नोंदी पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे.
गटातील प्रत्येक सदस्याने स्पर्धेतील पिकातून मिळवलेल्या उत्पन्नाची बेरीज केल्यावर गटाचे एकूण उत्पन्न केवढे झाले हे कळेल. या एकूण उत्पन्नापैकी किती प्रमाणात उत्पन्न गटामार्फत विक्रीतून मिळाले याला खालील तक्त्याप्रमाणे गुण देण्यात येतील.
गटाच्या एकूण उत्पन्नापैकी किती टक्के उत्पन्न गटामार्फत विक्रीतून मिळाले | गुण |
७५% + | १० |
६०% + ते ७५% | ८ |
५०% + ते ६०% | ६ |
४०% + ते ५०% | ४ |
३०% ते ४०% | २ |
३०% पेक्षा कमी | ० |
चांगला भाव मिळावा या हेतूने गटातील शेतकरी काही माल गोदामात साठवून ठेवतात. याबाबत त्यांच्याकडे गोदामाच्या पावत्या असणे अपेक्षित आहे. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत असा न विकलेला माल सुरक्षित असल्यास त्याचा विक्री दर हा बाजारपेठेत ३१ जानेवारी २०२३ असणारा विक्री दर आहे असे गृहीत धरण्यात येईल. तसेच पुढे जाऊन हा माल एकत्र विकण्याचे गटाचे नियोजन असेल, तर गटाने ॲपमध्ये तसे स्पष्ट करावे.
दुग्ध उत्पादक शेतक-याने स्वत:च्या वापरासाठी मूरघासमध्ये रूपांतरित केलेल्या मक्याच्या बाबतीत, मूरघासाची विक्री किंमत रु. ५/- किलो आहे असे ग्राह्य धरण्यात येईल. मूरघास स्वतःच्या दुग्धव्यवसायासाठीच वापरले जात असल्यामुळे हा दर गृहित धरला जात आहे.
2. मूल्यवर्धन: १५ गुण
प्रत्येक शेतमालाचे काही ना काही प्रमाणात मूल्यवर्धन करता येऊ शकते. उदा. ज्वारी / बाजरीसारख्या भरडधान्यापासून पीठ, तसेच इतर अनेक मूल्यवर्धित उत्पादने बनवता येऊ शकतात. मक्यापासून मूरघास बनवता येऊ शकतो इ. सर्वच शेतमालासाठी स्वच्छता व प्रतवारी हे एक मूल्यवर्धनाचे स्वरूप आहे. शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी याचसोबत इतर सर्व प्रकारचे मूल्यवर्धन हे शेतकऱ्याला अधिक बाजारभाव मिळवून द्यायला मदत करते. तसेच त्यामुळे गटाचे नाव होण्यासही मदत होते. उत्पादित केलेल्या संपूर्ण शेतमालाचे मूल्यवर्धन करणाऱ्या गटाला १५ गुण मिळतील. जर गटाने एकूण उत्पादनापैकी काही भागाचेच मूल्यवर्धन केले, तर गटाला त्या प्रमाणात गुण मिळतील.
उदा. जर गटाचे एकूण उत्पादन १०० क्विंटल आहे. त्यापैकी ५० क्विंटल उत्पादनाचे गटाने मूल्यवर्धन केले तर गटाला या विभागांतर्गत ७.५ गुण मिळतील.
या विभागा अंतर्गत गटाने केलेल्या सर्व उपक्रमांचे/कामांचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
3. साठवणुकीची व्यवस्था: ५ गुण
बरेचदा पिक कापणीच्या काळात शेतमालाचे भाव पडतात, आणि कापणीचा काळ उलटला की भाव पुन्हा चढतात. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमाल साठवणुकीची योग्य व्यवस्था असणे कळीचे आहे. साठवणुकीची व्यवस्था आणि गोडाऊनच्या पावत्या याच्या जोरावर शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे ते योग्य बाजारभाव मिळेपर्यंत शेतमाल साठवून ठेवू शकतात. भाडेतत्त्वावर अनेक ठिकाणी साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध असते, पण एक वैयक्तिक शेतकरी वाहतूक व भाड्यासाठी खर्च करू शकत नाही. त्यामुळे साठवणुकीची व्यवस्था करणे हा गटाच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे.
यासाठी गटाला असे डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक आहे ज्यातून हे समजेल की गटाने उपलब्ध असलेल्या साठवणुकीच्या व्यवस्थेविषयी माहिती गोळा केली आहे. या डॉक्युमेंटमध्ये किती वजनाचा शेतमाल साठवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे आणि साठवणुकीच्या व्यवस्था उपलब्ध करताना किती खर्च येईल याचीही माहिती असावी.
ही साठवणुकीची व्यवस्था वापरायची की नाही याचा निर्णय वैयक्तिक शेतकऱ्याचा असेल. साठवणुकीची सोय करणाऱ्या गटाला ५ गुण मिळतील. शेतकऱ्यांनी ही व्यवस्था वापरली किंवा नाही वापरली तरी हे गुण मिळतील याची कृपया नोंद घ्यावी.
खरीप कांदा, कोबी, कॉलीफ्लावर, टोमॅटो, तसेच इतर भाजीपाला पिके ही नाशवंत पिके असल्यामुळे त्यांसाठी साठवणुकीची व्यवस्था करणे अपेक्षित नाही. अशा गटांना या विभागात पूर्ण ५ गुण दिले जातील.
काही शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी घरगुती व्यवस्था उपलब्ध असते. अशी घरगुती साठवणुकीची व्यवस्थादेखील या विभागासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
संस्था म्हणून गटाची कामगिरी: ८० गुण
1. गटामार्फत झालेल्या सामूहिक जमाखर्चाची नोंद: २.५ गुण
एक चांगले काम करणारा गट म्हणजे असे व्यावसायिक युनिट जे जमाखर्चाचा हिशोब बारकाईने ठेवते. निविष्ठांची एकत्र खरेदी, सदस्यांनी या निविष्ठांसाठी जमा केलेली रक्कम, शेतमालाची विक्री करून मिळालेली रक्कम इ. सर्व हिशोबाच्या नोंदींमधून समजायला हवे. या नोंदी पानी फाउंडशन ॲपवर करणे आवश्यक आहे.
कृपया नोंद घ्या: गटाने जर एकूण एक जमाखर्च लिहिला नाही तर स्पर्धेतील इतर अनेक विभागांतर्गत गुण देणे अशक्य आहे: उदा: एकत्रित निविष्ठा खरेदी: १० गुण,
विक्रीसाठी सामूहिक प्रयत्न: १० गुण, मूल्यवर्धन: १५ गुण इ.
त्यामुळे गटाने जर एकूण एक जमाखर्च लिहिला नाही तर नाईलाजाने या सर्व विभागांत गटाला ० गुण द्यावे लागतील.
2. गटाचे बँक खाते: २.५ गुण
गटाचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे, ज्यासाठी गटाला २.५ गुण मिळतील.
3. दैनंदिन जमाखर्चाची नोंद: १० गुण
गटाचा प्रत्येक सदस्य शेतकरी व्यवसाय करत आहे, त्यामुळे त्याने / तिने जमाखर्चाच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. जर गटातील प्रत्येक सदस्य शेतकरी अशा नोंदी पानी फाउंडेशन ॲपमार्फत ठेवत असेल, तर गटाला १० गुण मिळतील. जर गटातील काही सदस्यच अशा नोंदी ठेवत असतील, तर गटाला त्या प्रमाणात गुण मिळतील.उदाहरणार्थ २० सदस्य असलेल्या गटातील जर फक्त १० सदस्यांनी जमा खर्चाच्या नोंदी पानी फाउंडेशन ॲपवर ठेवल्या, तर त्या गटाला या विभागांतर्गत फक्त ५ गुण मिळतील.
या विभागाअंतर्गत शेतकऱ्याला जमाखर्चाच्या सर्व नोंदी (अगदी पूर्व मशागतीपासून ते विक्रीपर्यंत) ठेवणे अपेक्षित आहे. अपूर्ण नोंदी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
कृपया नोंद घ्या: गटातील प्रत्येक सदस्याने जर एकूण एक जमाखर्च लिहिला नाही तर स्पर्धेतील इतर अनेक विभागांतर्गत गुण देणे अशक्य आहे: उदा: एकत्रित निविष्ठा खरेदी: १० गुण, विक्रीसाठी सामूहिक प्रयत्न: १० गुण, मूल्यवर्धन: १५ गुण, गटाला झालेला एकूण नफा: ४० गुण इ.
त्यामुळे गटातील प्रत्येक सदस्याने जर एकूण एक जमाखर्च लिहिला नाही तर नाईलाजाने या सर्व विभागांत गटाला 0 गुण द्यावे लागतील.
4. गेल्या खरीप हंगामात झालेला जमाखर्च व उत्पादन: ५ गुण
गेल्या खरीप हंगामात झालेला जमाखर्च व मिळालेले उत्पादन यातून यंदा आपण पुढे गेलो की मागे पडलो हे कळण्यास मदत होईल. त्यामुळे गेल्या खरीप हंगामात झालेला जमाखर्च व मिळालेले उत्पादन गटातील किती शेतकऱ्यांनी पानी फाउंडेशन ॲपवर भरला या निकषावर खालील तक्त्याप्रमाणे गुण देण्यात येतील.
गटाच्या एकूण सदस्यांपैकी किती टक्के सदस्यांनी गेल्या खरीप हंगामातील पिकांचा जमाखर्च व मिळालेले उत्पादन ॲपवर भरले | गुण |
५०% + | ५ |
४०% + ते ५०% | ४ |
३०% + ते ४०% | ३ |
२०% + ते ३०% | २ |
१०% ते २०% | १ |
१०% पेक्षा कमी | ० |
याबाबतीत गेल्या वर्षीच्या जमाखर्चाच्या पावत्या/कागदपत्रे असणं अपेक्षित नाही. शक्य तेवढी अचूक माहिती भरण्याचा प्रयत्न करावा.
5. इतर गटांसोबत केलेले सहकार्य व सामूहिक प्रयत्न: ५ गुण
सध्याचे गट म्हणजे मोठ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सशक्त FPO हे अंतिम ध्येय आहे, मग त्या companies act नुसार बनवलेल्या असतील किंवा cooperative societies act नुसार, पण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याएवढी मोठी त्यांची आर्थिक ताकद असेल. यासाठी किमान १००० एकर जमिनीवर शेती करणारे शेतकरी एकत्र येण्याची गरज आहे. हे एका रात्रीत घडू शकत नाही.
पहिलं पाऊल म्हणून स्पर्धेत सहभागी गटांनी निविष्ठांची खरेदी, शेतमालाची विक्री, मार्केटिंगची व्यवस्था किंवा स्पर्धेतील इतर कोणताही विभाग याबाबतीत एकमेकांसोबत सहकार्य करावे. स्पर्धेत सहभागी गटांनी इतर गटांसोबत कोणत्या कामासाठी सहकार्य केले याची नोंद पानी फाउंडेशन ॲपवर आवश्यक डॉक्युमेंटसहित करावी. सहकार्य केलेल्या प्रत्येक कामासाठी गटाला २.५ गुण मिळतील. या विभागाअंतर्गत गटाला जास्तीत जास्त ५ गुण मिळतील.
6. सार्वजनिक कामात गटाचा सहभाग: ५ गुण
गट हा गावाचा भाग आहे. गटाचे गावाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान असते आणि गावाची प्रगती झाली की गटाचाही फायदा होतो. वृक्षारोपणासाठी श्रमदान, कुरणक्षेत्र निश्चित करून त्याची देखभाल करणे इ. समृद्ध गाव स्पर्धेत अंतर्भूत अशा कोणत्याही सार्वजनिक कामांमध्ये गट योगदान देऊ शकतो. गटाने कोणत्या सार्वजनिक कामांमध्ये सहभाग घेतला त्याची नोंद गटाने पानी फाउंडेशन ॲपवर करणे आवश्यक आहे. सहभाग घेतलेल्या प्रत्येक सार्वजनिक कामासाठी गटाला २.५ गुण मिळतील. या विभागाअंतर्गत गटाला जास्तीत जास्त ५ गुण मिळतील.
या विभागांतर्गत गटाने केलेल्या सर्व उपक्रमांचे/कामांचे फोटो आणि विडिओ काढून ठेवावेत आणि ते गटाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवावेत. सत्यापनासाठी हे फोटो आणि विडिओ तपासले जातील.
7. गटाला झालेला नफा: ४० गुण
गट हा सर्वप्रथम एक आर्थिक युनिट आहे. गटाचे यश किंवा अपयश, गट भविष्यात तग धरून राहिल का, गटाची वाढ होईल का हे गटाची आर्थिक युनिट म्हणून कामगिरी कशी आहे यावर अवलंबून आहे. गटाच्या नफ्या-तोट्याचे विवरणपत्र कसे आहे यावर गटाची आर्थिक युनिट म्हणून कामगिरी ठरेल. प्रती एकर नफा आणि नफ्याची टक्केवारी यासाठी या विभागात गुण देण्यात येतील. नफा किती झाला याचा हिशोब पुढीलप्रमाणे करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे Directorate of Statistics and Economics मार्फत विविध पिकांच्या जमाखर्चाचा अभ्यास करण्यात आला व त्याचा अंतिम अहवाल जून २०२१ ला प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक पिकाच्या एकरी उत्पादन खर्चाची माहिती देणारा तक्ता या मूल्यांकनाच्या शेवटी परिशिष्ट मध्ये दिला आहे.
हा अहवाल या लिंकमार्फत उपलब्ध आहे.
पानी फाउंडेशन ॲप या तक्त्याचा आधार घेऊन प्रत्येक गटाला शेतीसाठी झालेला खर्च याचा पुढील प्रमाणे हिशेब करेल:
गटाला शेतीसाठी झालेला एकूण खर्च = तक्त्याप्रमाणे एकरी खर्च x गटातील शेतीचे एकूण क्षेत्र
या व्यतिरिक्त गटाने जर मूल्यवर्धन केले असेल, तर त्यासाठी होणारा खर्च यात जोडावा. उदा: मक्यापासून मूरघास बनवण्याचा खर्च.
यासोबत गटाला किंवा शेतक-याला शेतमाल विकण्यासाठी खर्च असतात जसे की वाहतूक, हमाली, तोलाई, व्यापा-यांचे कमिशन इत्यादी. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत विक्री न करता शेतमालाची सुरक्षित साठवणूक केली असेल तर हे खर्च तालुक्याच्या बाजारपेठेत असणाऱ्या दरांनुसार लावले जातील.
गटाचा एकूण खर्च = गटाला शेतीसाठी झालेला एकूण खर्च + (मूल्यवर्धन केले असल्यास त्यासाठी झालेला खर्च) + विक्री प्रक्रियेत झालेला एकूण खर्च
आता आपण गटाचे एकूण उत्पन्न कसे मोजले जाईल हे पाहूया:
गटाचे एकूण उत्पन्न = गटातील सर्व सदस्यांचे मुख्य पिकाचे एकूण उत्पन्न + गटातील सर्व सदस्यांचे आंतरपिकांचे एकूण उत्पन्न + गटातील सर्व सदस्यांचे एकूण सहउत्पन्न (उदा. कडबा, सोयाबीनचे कुटार,इ.) + गटातील सर्व सदस्यांचे मूल्यवर्धित उत्पादनाचे एकूण उत्पन्न
गटाला झालेला एकूण नफा = गटाचे एकूण उत्पन्न – गटाचा एकूण खर्च
नफ्याची टक्केवारी = गटाला झालेला एकूण नफा/गटाचा एकूण खर्च x १००
प्रती एकर नफा = गटाला झालेला एकूण नफा/गटातील शेतीचे एकूण क्षेत्र (एकरमध्ये)
या विभागात २० गुण एकरी नफ्यासाठी व २० गुण हे नफ्याच्या टक्केवारीसाठी देण्यात येतील.
A. एकरी नफा: २० गुण
एकरी नफा (रूपये) | गुण |
५०,००० + | २० |
४०,००० + ते ५०,००० | १६ |
३०,०००+ ते ४०,००० | १२ |
२०,०००+ ते ३०,००० | ८ |
१०,०००+ ते २०,००० | ४ |
१०,००० किंवा कमी | ० |
B. नफ्याची टक्केवारी: २० गुण
नफ्याची टक्केवारी | गुण |
१००% + | २० |
६०% + ते १००% | १५ |
४०%+ ते ६०% | १२ |
२५%+ ते ४०% | ८ |
१०%+ ते २५% | ५ |
१०% किंवा कमी | ० |
8. टीम वर्क, नेतृत्व आणि दूरदृष्टी: १० गुण
गट हा वेगवेगळी पार्श्वभूमी, विचार आणि मानसिकता असलेल्या माणसांचा समूह आहे. गटासमोरचे एक सर्वांत मोठे आव्हान म्हणजे उत्तम टीम वर्क. गट मतभेद कसे हाताळतो? भविष्यासाठी गटाचे स्वप्न काय आहे? नेतृत्वाची गुणवत्ता कशी आहे? या सर्व घटकांवर गटाचे यश किंवा अपयश अवलंबून असते. वरील विभागांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ज्या ज्या गटांना स्पर्धेत बक्षीस मिळण्याची शक्यता आहे, त्या गटांचे या विभागासाठीचे परीक्षण पानी फाउंडेशनने नेमलेले जज करतील. या विभागासाठी १० गुण आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. | पिकाचे नाव | एकरी उत्पादन खर्च (रूपये)
महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या डेटाच्या आधारावर |
१ | बाजरी | १४३१७.३९ |
२ | मका | २४३०२.०७ |
३ | भात | २३२६०.३१ |
४ | ज्वारी | १८१८२.५६ |
५ | नाचणी | ११०९९.१९ |
६ | तूर | २२६०४.४५ |
७ | मूग | १७६३८.०९ |
८ | उडीद | १५४८२.२५ |
९ | भुईमूग | ३२५८८.५२ |
१० | सोयाबीन | २०७१८ |
११ | कापूस | २६४७६.७८ |
१२ | धने | १७२३६.६१ |
१३ | ओवा | २७८५२ |
१४ | घेवडा | ७०९१०.८२ |
१५ | पत्ताकोबी | ६३७१०.१ |
१६ | फुलकोबी | ६०२८३.५ |
१७ | शिमला मिरची | ९६२४४.६७ |
१८ | वांगी | ७५६१८.९२ |
१९ | भेंडी | ५०९७३.४५ |
२० | खरीप कांदा | ३८९७६.१६ |
२१ | तोंडली | ६८३३०.४३ |
२२ | बटाटे | ८९०९६.६७ |
२३ | रताळे | ४७३५६.७१ |
२४ | भोपळा | ७५३४८.७३ |
२५ | टोमॅटो | ८२१२५.६९ |
२६ | कारले | ७४२००.७८ |
२७ | दुधी भोपळा | ४६९९०.८३ |
२८ | पडवळ | ४५२२३.८४ |
२९ | दोडकी | ६३४४४.८३ |
३० | घोसावळी | ७५८२९.७१ |
३१ | वाटाणा | ३८२१४.८९ |
३२ | मिरची | ७०१४०.६९ |
३३ | कोथिंबीर | २३५५४.५४ |
३४ | मेथी | २५०१९.८९ |
३५ | पालक | २८४०४.५१ |
३६ | गवार | २९११९.३५ |