सत्यमेव जयते वॉटर कप

सत्यमेव जयते वॉटर कप ही पानी फाउंडेशनतर्फे आयोजित केली जाणारी एक वार्षिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत, जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापन याबाबतीत सर्वोत्तम कामगिरी करण्याची चुरस गावकऱ्यांमध्ये लागलेली असते. सहा आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत पानी फाउंडेशन दरवर्षी, काही निवडक तालुक्यांमधील गावांना भाग घेण्यासाठी आमंत्रण देतात. जी गावे या स्पर्धेत भाग घेतात, ती गावे साधारण ३ ते ९ गावकऱ्यांची निवड करून पानी फाउंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या चार दिवसीय सखोल प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठवतात.

या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना पाणलोट व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध माहिती मिळते, तसेच नेतृत्त्व आणि संघटन कौशल्येही शिकायला मिळतात. वॉटर कप स्पर्धेचे नियम आणि मूल्यांकन पद्धतीचा (मार्किंग सिस्टीम) सुद्धा परिचय करून दिला जातो.

एकदा प्रशिक्षण पूर्ण झाले की, साधारणपणे संपूर्ण एप्रिल आणि मे महिनाभर पावसाळ्याच्या तयारीसाठी ही स्पर्धा सुरू होते. गावांमध्ये श्रमदानाद्वारे जलसंधारणासाठी आवश्यक पाणलोट रचना उभारल्या जातात, मशीनकामाच्या वापरासाठी पैसे उभे केले जातात, माती परीक्षण आणि माती उपचार केले जातात, पाण्याचा ताळेबंद (बजेट) तयार केला जातो. पाण्याच्या बचतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान अंमलात आणले जाते. पानी फाउंडेशन सहभागी स्पर्धकांना तांत्रिक मदत पुरवते आणि ही स्पर्धा संपल्यावर गावांनी केलेले काम १०० गुणांच्या धर्तीवर तपासले जाते.

२०१८ म्हणजेच यावर्षीच्या स्पर्धेत जिंकणाऱ्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रु., ५० लाख रु. आणि ४० लाख रु. एवढ्या घसघशीत रकमांची बक्षिसे मिळाली आणि प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट गावाला रु. १० लाख रकमेचे बक्षीस देण्यात आले.

अधिक वाचा