शालेय उपक्रम

२०१६ पासून हजारो गावकऱ्यांनी दुष्काळाला तोंड देण्यासाठी पाणलोट व्यवस्थापनाचे विज्ञान आत्मसात केले आणि स्वकष्टाने अनेक गावांना जलयुक्त केले. या लोकचळवळीत एकदम आघाडीवर होते ते शाळकरी विद्यार्थी. कोणताही आग्रह किंवा सक्ती नसूनही अनेक तालुक्यांमधली मुले स्वेच्छेने पुढे सरसावली आणि आपापले गट बनवून सत्यमेव जायते वॉटर कप स्पर्धेत त्यांनी अचाट कामगिरी करून दाखवली. हैड्रोमार्कर तयार करून वापरणे, बीज बँक आणि नर्सरी तयार करणे, वृक्ष लागवड करणे, एवढेच नाही तर शेतात काम करणाऱ्या गावकऱ्यांना तत्परतेने पाणी देण्याची व्यवस्था सुद्धा मुलांनी केली. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या भावनेने स्वत:च्या वयाचा विचार न करता ही मुले मदतीसाठी धावपळ करत होती.

दुष्काळाच्या विरोधातील लढाई जर आपल्याला जिंकायची असेल, तर ह्या मुलांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे आणि निसर्गाचे संगोपन करण्यासाठी त्यांना एखादे माध्यम पुरवणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. हा विचार करून आम्ही एका कार्यशाळेची निर्मिती केली आहे, ‘निसर्गाची धमाल शाळा’. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या खेळ आणि उपक्रमांच्या मदतीने मुलांच्या मनात पर्यावरण आणि पाणी यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण केली जाते आणि या प्रभावातून त्यांनी कृतीशील व्हावे यासाठी त्यांना सक्षम केले जाते. मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते अधोरेखित होईल यादृष्टीने आम्ही संगीत, चित्रपट आणि प्रयोग या माध्यमांची मदत घेऊन एक-एक तासाची सत्रे तयार केली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे, जिल्हा परिषद आणि राज्यशासनाच्या १,००० हून अधिक शाळांमधील इयत्ता ७ वी ते ९ वीच्या ३५,००० विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहचणार आहे.