स्पर्धेविषयी

गावकऱ्यांच्या स्वप्नातील गाव तयार व्हावे आणि महाराष्ट्राच्या गावांमधील अर्थ आणि पर्यावरणशास्त्राचा कायापालट व्हावा हे ध्येय समोर ठेवून २०२० मध्ये समृद्ध गाव स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

निवडत तालुक्यातील ज्या गावांनी २०१६ ते २०१९ मध्ये वॉटर कप स्पर्धेत चिकाटीने जलसंधारणाचे काम केले आणि गुणवत्ता राखली त्या गावांमध्ये समृद्ध गाव ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Photo 1 (1) (1)

आपण ही समस्या सोडवतोय

२०१६-२०१९ या दरम्याने महाराष्ट्रातील हजारों गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत आपापल्या गावात जल आणि मृदसंधारणाची कामं केली. पानी फाउंडेशनने पाणलोट विकासाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान अवगत असलेली एक मोठी फळी प्रशिक्षित केली. या फळीने महाराष्ट्रभरातील गावांना दुष्काळाविरोधात सुरू झालेल्या या जलचळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि सहकार्य केले.

मतभेद, लिंग, वय यांच्या सिमा भेदत लाखों नागरिक या लढ्यात सामिल झाले. भूमीपूत्रांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांतून राज्यात ५५,००० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता तयार झाली. अनेक गावांमधील जलसंवर्धन आश्चर्यकारक पद्धतीने वाढले.

मात्र जसा पाणीसाठी वाढला तसा पाण्याचा उपसाही वाढला.

अनेक गावांमध्ये जास्त पाण्यावरच्या पिकांचं क्षेत्र वाढलं. पाण्याचा वापर झाला. परिणामी उन्हाळ्यात पुन्हा एकदा गावांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागलं.

त्यामुळे केवळ पाणी आणि मृदा संधारणावर काम करून दुष्काळ संपणार नाही हे स्पष्ट झालं. त्यावर कडी म्हणजे तापमान बदलामुळे शेतीतील अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि दुष्काळाचं सत्र सुरूच आहे.

समृद्ध गाव स्पर्धेत शेतीशी निगडीत अनेक समस्यावर काम करण्याचं ध्येय आहे. पर्यावरणाचा समतोल राखणं, वैयक्तिक आर्थिक उत्पन्न वाढवणं आणि दुष्काळाविरोधात एक दीर्घ लढा उभारण्यासाठी प्रोत्साहन देणं या दिशेने ही स्पर्धा प्रवास करेल.

स्पर्धेचे आधारस्तंभ

या स्पर्धेच्या गर्भाशी जलव्यवस्थापन आणि सामुहिक निर्णय प्रक्रिया आहे. गावकऱ्यांना एकत्र बसून पाण्याचा ताळेबंद करण्यासाठी, कमी पाण्यातली पिकं घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल.

एकूणातच प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
१. मृदा आणि जलसंधारण
२. जलव्यवस्थापन आणि पाण्याचा ताळेबंद
३. जंगल आणि वृक्षांची लागवड व वाढ करणे
४. पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे
५. मातीची आरोग्य आणि पोत सुधारणे
६. प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधार तयार करणे

सहभाग आणि कालावधी

जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीत निवडक ४० तालुक्यांतील जवळपास १००० गावं या स्पर्धेत सहभागी होतील. समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवडले गेलेल्या तालुक्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा. अधिक माहिती लवकरच.