वॉटर कप स्पर्धेविषयी

सत्यमेव जयते वॉटर कप ही मुळात गावागावांमध्ये होणारी एक निराळी स्पर्धा आहे. स्पर्धेच्या ठरावीक कालावधीत कोणते गाव पाणलोट व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे सर्वाधिक काम करू शकते, हे पाहणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू. पानी फाउंडेशन देत असलेल्या प्रशिक्षणाद्वारे मिळालेले ज्ञान वापरून स्वत:चे गाव पाणीदार करण्याची संधी यानिमित्ताने गावकऱ्यांना मिळते.

आतापर्यंत झालेल्या प्रत्येक वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे.

वॉटर कप २०१६

जेव्हा आम्हाला वॉटर कप स्पर्धेची कल्पना सुचली, तेव्हा सर्वात आधी आम्हाला ह्या स्पर्धेची शक्याशक्यता पडताळून पाहायची होती, तसेच राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ह्या स्पर्धेचा काय परिणाम होईल हे ही तपासून पाहायचे होते. त्यामुळे आमचा अगदी पहिला प्रयोग २०१६ साली महाराष्ट्रातील अतिशय भिन्न विभागांमधील तीन तालुक्यांपासून सुरू झाला. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे ते तीन विभाग आणि (बीड जिल्ह्यातील) अंबाजोगाई, (अमरावती जिल्ह्यातील) वरूड आणि (सातारा जिल्ह्यातील) कोरेगाव हे तीन तालुके होते. या तालुक्यांमधील सर्व गावांसाठी ही स्पर्धा खुली ठेवली. पहिल्या वर्षी एकूण ८५० गावकऱ्यांना या स्पर्धेत भाग घेण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आणि २० एप्रिल ते ५ जून २०१६, या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ११६ गावे उत्साहाने सहभागी झाली.

वॉटर कप २०१६ ह्या स्पर्धेला, म्हणजेच आमच्या पहिल्या प्रयोगाला मिळालेल्या यशाने आम्हाला थक्क करून टाकले. सुमारे १०,००० पेक्षा अधिक लोकांनी रोज श्रमदान केले आणि समाजाच्या वेगवगेळ्या स्तरातील, क्षेत्रातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. बारामतीसारख्या शहरातील राज्य परिवहन मंडळाचे बसवाहक, साताऱ्यातील आयटी विषयाचे विद्यार्थी, डॉक्टर, वकील, नाटक-सिनेमातील कलाकारमंडळी, पत्रकार, शासकीय अधिकारी, तसेच दिव्यांग आणि वयस्कर मंडळीसुद्धा या कार्यात कंबर कसून उभी होती. ह्या एका स्पर्धेने गावांचा अक्षरशः कायापालट झाला होता. काय किमया घडली म्हणून काय विचारता? गावांमध्ये अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळाली. जुने वाद विसरून गावकरी एकत्र आले. या एकत्र येण्यामधून पिढ्यानपिढ्या फणा काढून उभारलेल्या या संकटावर आपण स्वकष्टाने मात करू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला आणि सरकारवर अवलंबून राहण्याचा प्रघातही मोडीत काढता आला. १,३६८ कोटी लिटर पाणी मावेल, एवढ्या क्षमतेचे काम फक्त ४५ दिवसात पार पडले. व्यवहाराच्या भाषेत सांगायचं तर इतक्या पाण्याची वार्षिक किंमत २७२ कोटी रुपये इतकी आहे.

वॉटर कप २०१६ मधील काही ठळक घटना

जिल्हे
तालुके
११६ गावे
८५० प्रशिक्षित गावकरी
१०,००० दररोज श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांची सरासरी संख्या
१,३६८ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते वेळू गाव
mh-map-2016mr
mh-map-2016mr

वॉटर कप मधील काही ठळक घटना

जिल्हे
तालुके
११६ गावे
८५० प्रशिक्षित गावकरी
१०,००० दररोज श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांची सरासरी संख्या
१,३६८ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते वेळू गाव


वॉटर कप २०१७

वॉटर कप २०१६ ह्या आमच्या पहिल्याच प्रयोगात आम्हाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने आमचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला. आता हे वॉटर कप मॉडेल आणखी विस्ताराने तपासून पाहण्याचे आम्ही ठरवले. म्हणूनच २०१७, यावर्षी आम्ही या स्पर्धेची व्याप्ती दहापटीने वाढवली आणि त्याच तीन विभागांमधून एकून ३० तालुके निवडले. मात्र आमच्यासमोर अनंत अडचणी होत्या. प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यानंतर तालुका पातळीवर सुरु होणारी प्रत्यक्ष कामे यांचा दर्जा टिकवणे, हे त्यांपैकी सर्वात महत्त्वाचे आव्हान होते आणि म्हणूनच यासाठी दोन महत्त्वाच्या साधनांची निर्मिती करून ती प्रत्यक्ष वापरात आणली गेली.

आम्ही तयार केलेले पहिले साधन होते, व्हिडिओ. पाणलोट व्यवस्थापनाच्या सर्व पद्धतींची, मराठी भाषेत साध्या सोप्या शब्दात क्रमवार माहिती देणारे जवळपास २० हून अधिक व्हिडिओ तयार केले गेले. हे सगळे व्हिडिओ यू-ट्यूब आणि आमच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहेत आणि तुम्ही या स्पर्धेतील स्पर्धक नसलात तरी ह्या व्हिडिओचा वापर करू शकता.

दुसरे आणि सर्वाधिक महत्त्वाचे साधन होते, पानी फाउंडेशन अॅप. हे अॅपसुद्धा प्ले स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे. ह्या अॅपच्या मदतीने प्रत्येक गावाला स्पर्धेतील त्यांची प्रगती वेळोवेळी तपासून पाहता येते. या अॅपची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत जसे झालेल्या कामाची नोंद करण्यासाठी नोंदणी फॉर्म्स (डेटा एन्ट्री फॉर्म्स), शैक्षणिक माहितीपट (फिल्म्स), मूल्यांकन पद्धत आणि स्पर्धेचे नियम यांबाबतची माहिती आणि याशिवाय गावातील पाणलोट रचनांचे GPS ट्रॅकिंग सुद्धा करता येते. हे अॅप वॉटर कप स्पर्धेच्या यंत्रणेचे एक अविभाज्य अंग झाले आहे. आता गावकरी अत्यंत कुशलतेने झालेल्या कामाची माहिती स्वत:च त्यात नोंदवतात.

फेब्रुवारी (२०१७) मध्ये प्रशिक्षणाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातील २२ केंद्रांवर सुमारे ६,००० व्यक्तींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. वॉटर कप २०१७, ही स्पर्धा ८ एप्रिलला सुरू झाली. एकूण १,३२१ गावांनी या स्पर्धेत भाग घेतला. ज्या जल्लोषात आणि उत्साहात गावकऱ्यांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी काम सुरू केले, तो उत्साह शेवटच्या म्हणजेच २२ मे पर्यंत कायम होता. सगळ्या तालुक्यांमध्ये मिळून राबणाऱ्या हातांची संख्या सुमारे ६५,००० एवढी होती. याशिवाय एक अ-शासकीय (खाजगी) संस्था अशी होती की जिच्या मदतीशिवाय हे काम पूर्णत्वास जाणे कठीण होते; ती म्हणजे भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएस. गाव पातळीवरील काम करण्याचा बीजेएसला दांडगा अनुभव आहे. बीजेएस या संघटनेने सुमारे ७०,००० तासांच्या कामासाठी यंत्र-दान केले. १ मे, म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, ‘चला गावी’ या पानी फाउंडेशनने दिलेल्या हाकेला साद देत लहान-मोठ्या शहरांमधून सुमारे २५,००० शहरी नागरिक स्वेच्छेने महा-श्रमदानासाठी पुढे आले. स्पर्धेचे हे सहा आठवडे मिळून गावागावांमधून पाणलोटाचे प्रचंड काम उभे राहिले. परिणामी ८,२६१ कोटी लीटर क्षमतेची पाणीसाठा रचना उभी राहिली; जिचे वार्षिक मूल्य १,६५२ कोटी रुपये एवढे होते. एक गोष्ट विशेषत्वाने सांगावीशी वाटते, की या जलचळवळीत स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरल्या होत्या.

दुष्काळाकडून समृद्धीकडे (कालावधी ७:४७ मिनिटे)
वॉटर कप २०१७ चा थरारक प्रवास ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे.

वॉटर कप २०१७ मधील काही ठळक घटना

१३ जिल्हे
३० तालुके
१,३२१ गावे
६,००० प्रशिक्षित गावकरी
६५,००० दररोज श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांची सरासरी संख्या
८,२६१ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते काकडदरा गाव

वॉटर कप २०१७ मधील काही ठळक घटना

१३ जिल्हे
३० तालुके
१,३२१ गावे
६,००० प्रशिक्षित गावकरी
६५,००० दररोज श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांची सरासरी संख्या
८,२६१ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते काकडदरा गाव


वॉटर कप २०१८

२०१६ वर्षी ३ तालुके आणि ११६ गावांपासून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा २०१८, या वर्षी २५ पटींनी मोठी झाली आणि महाराष्ट्रातील तब्बल ७५ तालुके आणि ४,०२५ गावांपर्यंत पोहचली. मागील वर्षापर्यंत सहभागी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा ह्या विभागांबरोबरच यावर्षी उत्तर महाराष्ट्र या स्पर्धेला नव्याने जोडला गेला. २०,००० हून अधिक गावकऱ्यांना, पाणलोट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले; यातील एक चतुर्थांश सहभाग स्त्रियांचा होता. राज्यभरातल्या एकूण ५७ केंद्रांवर अतिशय चोख व्यवस्था ठेवून ४ दिवसांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला.

७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ च्या ठोक्याला स्पर्धा सुरू झाली आणि ४५ दिवसांनी म्हणजे २२ मे, यादिवशी संपली. स्पर्धेच्या या सहा आठवड्यांमध्ये सुमारे १,५०,००० लोकांनी रोज श्रमदान केले. दृढनिश्चय आणि प्रेरणा देणाऱ्या अनेक घटना गावागावांतून पाहायला मिळाल्या. स्त्रिया, पुरुष, तरुण मंडळी, तसेच ज्येष्ठ नागरिक सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले. दिव्यांग व्यक्तींनी सुद्धा या कामात लक्षणीय योगदान दिले.

१ मे रोजी, पानी फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या महाश्रमदान कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शहरांतील जलमित्र सहभागी झाले. संपूर्ण राज्यभरात पाणलोट व्यवस्थापन संरचना उभारण्यासाठी गावकरी आणि शहरी नागरिक त्या दिवशी एकत्र आले.

श्रमदानाचे लक्ष्य पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेने एकूण ८.५ लाख तासांसाठी जेसीबी यंत्रे मोफत उपलब्ध करून दिली. यंत्रपुरवठा, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या मदतीमुळे गावकऱ्यांच्या प्रयत्नाला अभूतपूर्व अशी गती आली.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेदरम्यान झालेल्या कामाचे फलित म्हणजे गावागावातल्या एकूण रोपवाटिकांमध्ये मिळून सुमारे ३५,२१,८७० रोपांची लागवड करण्यात आली आहे आणि वार्षिक २२,२६९ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे जलसंधारणाचे काम झाले आहे; ज्याचे वार्षिक मूल्य अंदाजे ४,४५४ कोटी रु. आहे.

वॉटर कप २०१८ मधील काही ठळक घटना

२४ जिल्हे
७५ तालुके
४,०२५ गावे
२०,०००+ प्रशिक्षित गावकरी
१,५०,००० रोज श्रमदान केलेल्या माणसांची सरासरी संख्या
२२,२६९ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते टाकेवाडी (आंधळी) गाव

वॉटर कप २०१८ मधील काही ठळक घटना

२४ जिल्हे
७५ तालुके
४,०२५ गावे
२०,०००+ प्रशिक्षित गावकरी
१,५०,००० रोज श्रमदान केलेल्या माणसांची सरासरी संख्या
२२,२६९ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते टाकेवाडी (आंधळी) गाव


वॉटर कप २०१९

चार वर्षांपूर्वी वॉटर कप प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला होता, तेव्हा “ही लोकचळवळ होईल का?” असा प्रश्न पहिल्यांदा डोक्यात आला होता. २०१९ मध्ये मात्र आम्हाला या प्रश्नाचं स्पष्ट आणि सकारात्मक उत्तर मिळालं. यावर्षीही ७ एप्रिलच्या मध्यरात्री महाराष्ट्रातल्या ७६ तालुक्यांमधील ४,७०६ गावांनी दुष्काळाविरोधातल्या ऐतिहासिक लढ्याला सुरूवात केली. एकजुटीचा उत्सव साजरा करत, हजारो गावकऱ्यांनी माळावर धाव घेतली आणि मशालींच्या उजेडात पहिली कुदळ मारली. त्या दिवशी पेटलेली स्पर्धेची मशाल शेवटपर्यंत लोकांच्या ह्रदयात धगधगत राहिली.

फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये पानी फाउंडेशनतर्फे सुरू केलेल्या ६१ ट्रेनिंग सेंटर्समध्ये जवळपास २५,००० गावकऱ्यांनी पाणलोट विकासाचं ट्रेनिंग घेतलं. या चळवळीत अनेक महिला आणि मुलं नेतृत्त्व करण्यासाठी पुढे आले. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण महिलांची बॅच पाणलोट विकास शिकण्यासाठी आली. शिकताना त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. मुलांनीही यंदा न भूतो न भविष्यति अशी साथ दिली. माध्यमिक शाळांच्या मुलांमध्ये निसर्गाविषयीची संवेदनशीलता जागृत करणाऱ्या पानी फाउंडेशनच्या ‘निसर्गाची धमाल शाळा’ या उपक्रमात हजारो शाळकरी मुलांनी उत्साहाने आणि कुतूहलाने सहभाग घेतला. केवळ पाच आठवड्यांत हा उपक्रम १,१७४ शाळांमधील ३८,००० मुलांपर्यंत पोहोचला.

१ मे, या महाश्रमदानादिवशी १,००,००० पेक्षा अधिक शहरी जलमित्रांनी गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केले. स्वयंप्रेरणेने एकत्र आलेले आणि दुष्काळाविरोधात एकवटलेले विविध शहरांतून गावाच्या मातीत राबलेले हे जलमित्र केवळ ‘पाणी’ या एकाच उद्देशाप्रती लढले. त्यांनी अत्यंत मेहनतीने एकाच दिवसांत शेकडो जलसंधारणाचे उपचार तयार होण्यास हातभार लावला. कोर्पोरेट कर्मचाऱ्यांपासून ते आर्मी ऑफीसर्स, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, अभिनेते, खेळाडू, अशा सर्व स्तरांतून जलमित्रांनी मदतीचा हात पुढे केला.

अहमदनगरच्या स्नेहालय या संस्थेमार्फत वॉटर कप २०१९ मध्ये सहभागी झालेल्या गावांना मशिन्स उपलब्ध व्हाव्यात यासाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी गोळा झाला. १०,००० पक्षा जास्त जलमित्रांनी केलेल्या आर्थिक योगदानामुळे प्रत्येकी १ लाख याप्रमाणे ३३२ गावांना मशिन कामासाठी आर्थिक साहाय्य मिळाले, ज्यामुळे कामाचा वेग, व्यापकता आणि गुणवत्ता वाढण्यास मदत झाली. मशिन्ससाठी निधीची मदत मिळालेल्या गावांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

वॉटर कप २०१९ मधील काही ठळक घटना

२४ जिल्हे
७६ तालुके
४,७०६ गावे
२५,०००+ प्रशिक्षित गावकरी
१,७५,००० रोज श्रमदान केलेल्या माणसांची सरासरी संख्या
२३,२१३ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते सुर्डी गाव

वॉटर कप २०१९ मधील काही ठळक घटना

२४ जिल्हे
७६ तालुके
४,७०६ गावे
२५,०००+ प्रशिक्षित गावकरी
१,७५,००० रोज श्रमदान केलेल्या माणसांची सरासरी संख्या
२३,२१३ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची पाणलोट रचना उभारणी
विजेते सुर्डी गाव