स्पर्धेचे नियम

सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धा खालील नियमांनुसार घेतली जाईल. स्पर्धक गावाला हे नियम व सोबतची मूल्यांकन पद्धत मान्य आहे, तरच त्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा. या नियमांबाबत कोणताही वाद निर्माण झाल्यास पानी फाउंडेशनचा निर्णय अंतिम असेल.

स्पर्धेचे विजेते म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या गावांना रोख बक्षिसं दिली जातील. राज्य पातळीवर पहिलं बक्षिस आहे रू. ७५ लाख, दुसरं बक्षीस आहे रू. ५० लाख आणि तिसरं बक्षीस आहे रू. ४० लाख. याशिवाय, प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल. जर या गावाने राज्यस्तरीय बक्षीस पटकावले असेल, तर मात्र त्या गावाला परत हे १० लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार नाही. अशा परिस्थितीत हे बक्षीस तालुक्यात त्याच्या खालोखाल असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या गावाला मिळेल.

२०१६-२०१८ च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत ज्या गावांना राज्यस्तरीय वा तालुक्यातील पहिले बक्षीस मिळाले आहे, ती गावे तालुकास्तरीय बक्षिसास पात्र असणार नाहीत. मात्र तालुकास्तरीय कोणतेही बक्षीस मिळणारे गाव हे राज्य स्तरीय बक्षीसास पात्र असेल. तसेच तालुक्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असणारे गाव हे तालुक्याच्या पहिल्या बक्षिसास पात्र असेल.

निवडक ७६ तालुक्यांमधील प्रत्येक महसुली गाव या स्पर्धेत भाग घेऊ शकते. सहभागाचा निर्णय गावाने स्वतः घ्यायचा आहे. मात्र प्रवेश अर्ज हा ग्रामपंचायतीमार्फतच भरावा.

स्पर्धेतला सहभाग हा ग्रामपंचायत म्हणून होईल. मात्र स्पर्धेत केलेल्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी महसुली गाव हे घटक मानलं जाईल. बहुतेक ठिकाणी महसुली गाव आणि ग्रामपंचायत यांत काही फरक नाही. त्या दोनही एकच आहेत. परंतु गटग्रामपंचायतीत एकाहून अधिक महसुली गावे असतात.

जर तुमची गटग्रामपंचायत असेल तर:

  •  त्यातील प्रत्येक महसुली गाव हे स्वतंत्ररीत्या स्पर्धेत भाग घेऊ शकतं; किंवा
  •  एका गटग्रामपंचायतीमधील सर्व महसुली गावं मिळून एक ग्रामपंचायत म्हणूनही तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता; किंवा
  •  एकाच गटग्रामपंचायतीमधील काही महसुली गावे एकत्र मिळून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

पण या तीनही पर्यायांत स्पर्धेचा प्रवेश अर्ज हा ग्रामपंचायतीमार्फतंच भरून पाठवा.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक गावाने पुढील दोन अटींची पूर्तता करावी:

१. सहभागी ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करावा. सहभागी महसुली गावाने याच प्रकारची गावसभा घेणे गरजेचे आहे.

२. प्रत्येक स्पर्धक गावाला पानी फाउंडेशनने आयोजित केलेल्या पाणलोट व्यवस्थापनाच्या ४ दिवसीय निवासी प्रशिक्षणात भाग घेणे बंधनकारक आहे. या करीता प्रत्येक स्पर्धक गावाला योग्य संख्येत व खालील निकषांप्रमाणे  निवडलेल्या गावकऱ्यांना प्रशिक्षणास पाठवावे लागेल. निवडलेल्या गावकऱ्यांनी प्रशिक्षण शिबिराचे चारही दिवस उपस्थित राहाणे बंधनकारक आहे.

हा अर्ज गटग्रामपंचायतीतील महसुली गावातर्फे असल्यास अशा गावाने किमान तीन आणि कमाल पाच प्रशिक्षणार्थी (वॉटर हिरो) निवडावे. यापैकी किमान एक महिला असावी.

हा अर्ज २,००० पेक्षा कमी लोकसंख्या असणार्या ग्रामपंचायतीतर्फे असल्यास अशा ग्रामपंचायतीने पाच प्रशिक्षणार्थी (वॉटर हिरो) निवडावे. या ५ जणांमध्ये गावचे सरपंच वा उपसरपंच, २ महिला व २ युवकांचा समावेश असावा ही आग्रहाची विनंती आहे.

प्रशिक्षणात पानी फाउंडेशनचा मोबाईल ऍप कसा वापरावा हे शिकवले जाणार आहे. या ऍपवर स्पर्धेची सर्व माहिती असणार आहे. त्यामुळे अशी विनंती आहे की ५ प्रशिक्षणार्थीपैकी कमीत कमी १ जण तरी असा असावा ज्याला स्मार्ट फोन नीट वापरता येतो.

स्पर्धक गावाची लोकसंख्या २,००० पेक्षा जास्त असल्यास, प्रशिक्षाणार्थींची किमान संख्या ही पाच एवढीच असली तरी अशा गावांना खालीलप्रमाणे अधिक प्रशिक्षणार्थी पाठवण्याची मुभा असेल:

लोकसंख्या                                                         कमाल प्रशिक्षणार्थी

२०००-२९९९                                                                  ६

३०००-३९९९                                                                  ७

४०००-४९९९                                                                  ८

५००० पेक्षा अधिक                                                          ९

जर स्पर्धक गावाने नियमाप्रमाणे ठरलेले किमान प्रशिक्षणार्थी पाठवले नाहीत तर ते गाव/ग्रामपंचायत स्पर्धेतून बाद करण्यात येईल. जर काही कारणास्तव गावातील ५ प्रशिक्षणार्थी एकावेळी प्रशिक्षणात सहभागी होऊ शकले नाहीत, तर त्यांच्या गावातील उर्वरित सदस्यांना आणखी एक संधी देण्यात येईल. पण तरीही जर पूर्ण उर्वरित सदस्य प्रशिक्षणात सहभागी झाले नाहीत, तर मात्र गाव स्पर्धेतून लगेच बाद करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होऊ इछिणार्‍या प्रत्येक गावाला स्पर्धेचा प्रवेश अर्ज भाग एक व भाग दोन भरून पानी फाउंडेशनने नियुक्त केलेल्या तालुका समन्वयकाकडे किंवा ग्रामसेवकाकडे जमा करावा. तुमच्या तालुका समन्वयकांची नावं व संपर्क क्रमांक प्रवेश अर्जावर देण्यात आली आहेत.

प्रवेश अर्ज भाग एक हा सरपंचांच्या किंवा ग्राम सेवकाच्या स्वाक्षरीनिशी जमा करायचा आहे. गट ग्रामपंचायतीतील महसुली गावांनाही हा फॉर्म भरणे आवश्यक आहे. महसुली गावांनी त्यांच्या संबंधित गट ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या किंवा ग्राम सेवकाच्या स्वाक्षरीनिशी प्रवेश अर्ज सादर करावा. प्रवेश अर्ज भाग एक जमा करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१८ आहे.

स्पर्धक गावाने प्रवेश अर्ज भाग एक जमा केल्यावर त्यांना प्रवेश अर्ज भाग दोन पुरवण्यात येईल. प्रवेश अर्ज भाग दोन जमा करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१९आहे. प्रवेश अर्ज भाग दोन यात गावाबद्दल माहिती आहे. ही माहिती अधिकृत शासकीय रेकोर्ड प्रमाणे आहे. यापैकी कोणतीही माहिती चुकीची असल्यास योग्य माहिती देणारे पत्र ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर पानी फाउंडेशनला ३१ मार्च २०१९ पर्यंत देता येईल. या पत्राची माहिती योग्य आहे हे सिद्ध करण्यास मा. तहसीलदार यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ३१ मार्च २०१९ नंतर कोणताही दुरुस्ती अर्ज स्वीकारला जाणार नाही.

खातेदार संख्या व रब्बी पिकाखालील क्षेत्र यायाबाबत माहिती स्पर्धक ग्रामपंचायतीने भरायची आहे व त्यावर ग्रामपंचायतीच्या मा. तालाठींची सही व त्यांचा शिक्का असावा.

प्रवेश अर्ज भाग दोन करीता स्पर्धक गावाला ग्रामसभा/गावसभा घेणे गरजेचे आहे – ज्यात सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा ठराव मंजूर करावा व प्रशिक्षणा करिता योग्य संख्येत व वरील निकषांप्रमाणे गावकरी निवडावे.

स्पर्धेदरम्यान कधीही, अयोग्य माहितीमध्ये बदल करण्याचे हक्क पानी फाउंडेशनकडे असतील. जे गाव जाणूनबुजून चुकीची माहिती दाखल करेल, त्या गावाला स्पर्धेतून बाद करण्याचे हक्क पानी फाउंडेशनकडे असतील.

प्रशिक्षण स्थळी होणारा सर्व खर्च पानी फाउंडेशनकडून केला जाईल. तालुक्याच्या ठिकाणापासून ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत येण्याजाण्याची सोय पानी फाउंडेशन करेल. प्रशिक्षण कार्यक्रमाचं ठिकाण आणि तारीख ग्रामपंचायतीस कळवले जाईल.

प्रशिक्षणात मद्यपान निषिद्ध आहे. प्रशिक्षणार्थी हे निर्व्यसनी असावेत. प्रशिक्षणात मद्यपान केल्यास गावाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

बऱ्याचशा गुणांच्या विभागांसाठी, स्पर्धेच्या कालावधीमध्ये (८ एप्रिल २०१९ व २२ मे २०१९) सुरु केल्या गेलेल्या आणि संपवलेल्या उपचारांचीच दखल घेतली जाईल. मात्र स्पर्धेची पुढील कामे प्रत्येक गाव अगोदरही करू शकते:

सांडपाण्याचा वापर ५ गुण
वृक्ष संवर्धन ५ गुण
माती नमुना तपासणी ५ गुण
आगपेटी मुक्त शिवार ५ गुण
जल बचतीची कामे ५ गुण
गावाचे वॉटर बजेट मधील ४ मार्कांची कामे ही स्पर्धेपूर्वी करता येतील:
गावात जलमापक यंत्र बसवणे १ गुण
रेन रेजिस्टर १ गुण
सध्याचे वॉटर बजेट २ गुण
अस्तित्वात असलेल्या रचनांचे सर्वेक्षण करून रिपोर्ट बनवणे १ गुण

स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावाला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मूल्यांकन पध्दत व नियम देण्यात येतील. तसेच ही मूल्यांकन पद्धत व स्पर्धेचे हे नियम आमच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. www.paanifoundation.in

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा असून बक्षिसासाठी किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय बक्षीसास पात्र होण्यासाठी स्पर्धक गावाला:

– गुणांकन पद्धतीतील सेक्शन तीन अंतर्गत (पाणी साठवण्यासाठी किंवा गाळ अडवण्यासाठी श्रमदानाचा आणि मनुष्यबळाचा वापर करुन बांधलेल्या रचना/उपचार) किमान ४,००० घन मीटर काम करावे लागेल आणि;

– गुणांकन पद्धतीतील सेक्शन चार अंतर्गत (यंत्राचा वापर करून पाणी साठवण्यासाठी/गाळ अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या रचना/उपचार) किमान ५०,००० घन मीटर काम करावे लागेल.

तालुकास्तरीय बक्षीसास पात्र होण्यासाठी स्पर्धक गावाला:

– गुणांकन पद्धतीतील सेक्शन तीन अंतर्गत (श्रमदानाने/मनुष्यबळाने) किमान २,००० घनमीटर काम करावे लागेल; आणि

– गुणांकन पद्धतीतील सेक्शन चार अंतर्गत (मशीनने) किमान २०,००० घन मीटर काम करावे लागेल.

या शिवाय बक्षीसासंदर्भात दोन महत्वाच्या बाबी आहेत:

१. २०१६-२०१८ च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत ज्या गावांना राज्यस्तरीय बक्षीस मिळाले आहे, ती गावे कोणत्याही बक्षिसास पात्र असणार नाहीत. २०१६-२०१८ च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत ज्या गावांना तालुक्यातील पहिले बक्षीस मिळाले आहे, ती गावे तालुकास्तरीय बक्षिसास पात्र असणार नाहीत. मात्र तालुकास्तरीय बक्षीस मिळणारे गाव हे राज्य स्तरीय बक्षीसास पात्र असेल.

२. २०१९ च्या स्पर्धेत ज्या गावाला राज्यस्तरीय बक्षीस मिळेल, त्या गावाला परत तालुक्याचे बक्षीस मिळणार नाही. अशा परिस्थितीत हे बक्षीस तालुक्यात त्याच्या खालोखाल असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या गावाला मिळेल.

पानी फाउंडेशन कोणत्याही गावाला निधी देत नाही. कामांसाठीलागणारा निधी, मशिनरी, साहित्य यांसाठी पुढील कोणत्याही मार्गांचा अवलंब करण्याचं स्वातंत्र्य गावांना असेल:

– सरकारी योजनांचे सहाय्य घेणं. उदा. जलयुक्त शिवार अभियान, मनरेगा इत्यादी.

– कंपन्यांकडून, स्वयंसेवी संघटनांकडून, एनजीओ (अशासकीय संस्था) यांच्याकडून, धर्मादाय विश्वस्त संस्थांकडून किंवा वैयक्तिक दात्यांकडून

– ग्रामस्थांकडून स्वेच्छेने मदत मिळवणं किंवा गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या ग्रामस्थांकडून मदत मिळवणं

कोणत्याही गावाने ‘पानी फाउंडेशन’ हे शब्द वापरून बँक खाते खोलू नये. त्याबाबत सक्त मनाई आहे व ते बेकायदेशीर आहे. उदाहरण, जर एखाद्या गावाचे नाव ‘डोंगरवाडी’ आहे, तर ‘पानी फाउंडेशन डोंगरवाडी’ या नावाने बँक खाते खोलू नये.

वॉटरशेड ऑर्गनायजेशन ट्रस्ट (WOTR), अहमदनगर ही संस्था पानी फाउंडेशनची नॉलेज पार्टनर आहे. त्यांची प्रशिक्षित इंजिनीयर्सची, तसेच पानी फाउंडेशनच्या तांत्रिक प्रशिक्षकांची व पाणलोट सेवकांची एक टीम आहे ज्याचा सल्ला स्पर्धक गावे स्वेछेने घेऊ शकतात. हे सहाय्य पानी फाउंडेशनमार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी ग्रामपंचायतींना पानी फाउंडेशनच्या तालुका समन्वयकाशी संपर्क साधावा लागेल.

सहभागी गावांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी की विविध मृदा आणि जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करणे, बांधकाम करणे तसेच जर त्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या परवानग्या हव्या असतील तर त्या परवानग्या घेणे – या सर्व बाबींची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीचीच असेल. पानी फाउंडेशन संस्था, WOTR, त्यांचे इंजिनीयर्स, तांत्रिक प्रशिक्षक किंवा पाणलोट सेवक, यांपैकी कोणाही या नियोजनासाठी वा बांधकामासाठी परवानग्यांसाठी जबाबदार नाही.

वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी नियोजन फॉर्म पानी फाउंडेशन ऍपवर सबमिट करायचे आहेत. यासाठी स्पर्धक गावाला पानी फाउंडेशन ऍपवर आपला लोगिन व पासवर्ड वापरून एन्ट्री करावी लागेल. हा नियोजन फॉर्म यशस्वीरित्या पानी फाउंडेशनला सबमिट झाला आहे हे ऍपवर स्पष्ट असले पाहिजे.

स्पर्धेतील बऱ्याचशा गुणांच्या विभागांसाठी, स्पर्धेच्या कालावधीमध्ये (८ एप्रिल २०१९ व २२ मे २०१९) कामे करायची आहेत. त्या कामांचे नियोजन हे २५ मार्च २०१९ पासून २२ मे २०१९ पर्यंत केव्हाही भरता येईल. मात्र जी कामे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी करण्यास मुभा आहे, त्यांची एन्ट्री गावाला पानी फाउंडेशन ऍपचा लोगिन व पासवर्ड मिळाल्यावर कधीही करता येईल.

नियोजन फॉर्म सबमिट केल्यानंतरही गावे त्यात बदल करू शकतात, ‘नवीन एन्ट्री’ सबमिट करू शकतात.

नियोजन फॉर्म मध्ये नसलेला कोणताही जलसंधारणाचा उपचार सुरु करण्यापूर्वी स्पर्धक गावाला नियोजन फॉर्म मध्ये ‘नवीन एन्ट्री’ भरणे सक्तीचे आहे आणि ज्या ठिकाणी उपचार करण्याचे योजले आहे, त्या ठिकाणी फोटो काढायचा आहे. या फोटोद्वारे सिद्ध होईल की प्रस्तावित ठिकाण मोकळे आहे आणि उपचार स्पर्धेदरम्यान बांधण्यात आला आहे. जलसंधारणाच्या नवीन उपचाराचे काम सुरु करण्याअगोदर फोटो काढला नाही तर, तो उपचार स्पर्धेत ग्राह्य धरला जाणार नाही.

वर नमूद केल्याप्रमाणे, ज्या ठिकाणी जलसंधारणाचा नवीन उपचार करण्याचे योजले आहे, त्या ठिकाणाचा फोटो काढायचा आहे. तसेच, मोजमाप पुस्तकामध्ये उपचार केल्यानंतरचा फोटो गरजेचा आहे. दोन्ही बाबतीत, आवश्यक फोटोशिवाय ही माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.

तुमच्या फोनच्या सेटिंग्स मध्ये ‘Location’ सुरु केल्याशिवाय ऍप फोटो स्वीकारणार नाही. ‘Location’ ‘ऑन’ केल्याने फोटोच्या ठिकाणाचे GPS सेटिंग्स घेता येतात.

म्हणूनच, नियोजनादरम्यान फोटो कधी आणि कुठे घेतला आहे ते ऍपला समजते. तसेच मोजमापा दरम्यान फोटो कधी आणि कुठे घेतला आहे ते समजते. दोन्ही वेळेस ठिकाण सारखेच असणे गरजेचे आहे व त्यातून हे कळते की ते काम स्पर्धेदरम्यानच झाले आहे. दोन्ही ठिकाणांमध्ये बऱ्यापैकी फरक असल्यास, ऍपमध्ये माहिती भरल्यानंतरही, पानी फाउंडेशनचे परीक्षक एन्ट्री अवैध ठरवू शकतात.

जर पानी फाउंडेशनला असं वाटलं की एखादं गाव जाणूनबुजून चुकीची माहिती दाखल करत आहे, तर अशा गावाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

सर्व गावांनी रचना पूर्ण होताच त्यांचे मोजमाप करून त्याची माहिती लवकरात लवकर ऍपमध्ये भरावी ही आमची आग्रहाची विनंती आहे. ही माहिती इंटरनेटद्वारे पानी फाउंडेशनला पोचते व त्यासाठी स्पर्धेदरम्यान आठवड्यातून किमान एकदा तरी स्पर्धक गावांनी त्यांचा स्मार्टफोन अशा ठिकाणी आणावा जिथे त्या फोनला WiFi/इंटरनेट भेटेल. पानी फाउंडेशनच्या तालुका कार्यालयांमध्ये WiFi/इंटरनेट उपलब्ध असते आणि जेंव्हा गरज असेल, तेंव्हा स्पर्धेत सहभागी गावं या कार्यालयांमध्ये येऊन ऍपसाठी WiFi/इंटरनेटचा वापर करू शकतात.

२७ मे २०१९ ला किंवा त्याआधी ऍपद्वारे सर्व आवश्यक माहितीसकट अंतिम मोजमाप फॉर्म सर्व स्पर्धक गावांनी दाखल करणे सक्तीचे आहे. त्यानंतर दाखल करण्यात येणारी कोणतीही माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.

गावांनी सादर केलेल्या स्पर्धेतील कामांच्या मोजमापाच्या आधारे आघाडीच्या गावांची यादी बनवण्यात येईल.

या गावांनी दिलेल्या माहितीचे पानी फाउंडेशनच्या परीक्षक टीमद्वारा बारकाईने चेकिंग/वेरीफिकेशन केले जाईल. इतर कोणत्याही गावाने स्पर्धेदरम्यान दिलेल्या माहितीचे चेकिंग देखील पानी फाउंडेशन टीमद्वारा करण्यात येऊ शकते.

गावांनी भरलेली मोजमापाची यादी तपासताना जर मर्यादेपेक्षा अधिक चुकीची आढळली, तर गावातील त्या उपचारा बाबत सर्व मोजमापतून ठराविक प्रमाणात मोजमाप सरसकट कमी करण्यात येईल.

पानी फाउंडेशन परीक्षकांमार्फत तपासणीअंती प्राप्त मोजमाप अंतिम धरण्यात येईल.

गुण प्रणालीमध्ये बहुतांशी स्व-मूल्यांकन (self-assessment) करण्यात येते. स्पर्धेतील गावांनी त्यांनी केलेल्या कामाची संख्या आणि मोजमाप पानी फाउंडेशन ऍपद्वारा दाखल करायची आहे आणि ऍप आपोआप त्यांचे गुण मोजेल.

केवळ खालील विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून गुणात्मक (qualitative assessment) मूल्यांकन करण्यात येईल:

– कामाच्या गुणवत्तेसाठी – १० मार्क

– वॉटर बजेट विभागामध्ये वॉटर बजेट मधील तूट भरून काढण्याच्या उपायांवर – २ मार्क

– जर एखाद्या गावात जुन्या रचना अस्तित्वात नसतील किंवा त्या दुरुस्त करण्यास योग्य रचना नसतील, तर गुणांकन पद्धतीतील सेक्शन ११ अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाखाली गुण (४ किंवा ५) देण्यात येतील.

अशा प्रकारे किमान १२ आणि जास्तीत जास्त १७ गुण हे गुणात्मक मूल्यांकनावर आधारित असतील. यासाठी गावाची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे.

स्पर्धेमध्ये किमान ८३ आणि कमाल ८८ मार्क संख्यात्मक (objective) आणि स्व-मूल्यांकनावर (self-assessment) आधारित असतील. या विभागात ज्या गावांचे गुण असे असतील की राज्य किंवा तालुका स्तरावर त्यांनी बक्षीस जिंकणं शक्य आहे, अशा गावांचेच फक्त गुणात्मक मूल्यांकन पानी फाउंडेशनने नेमलेल्या पंचांच्या पॅनलद्वारा करण्यात येईल.

तालुका स्तरावर पारितोषिक विजेता ठरवण्यासाठी पानी फाउंडेशनद्वारा परीक्षकांचे पॅनल नियक्त करण्यात येईल. ऍपमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार आणि पानी फाउंडेशन टीमने त्या माहितीची चेकिंग केल्यानंतर, परीक्षकांचे पॅनल फक्त विजेते ठरू शकणार्‍या गावांना भेट देवून अंतिम तपासणी करेल. ऍपमध्ये दिलेले गुण आणि परीक्षकांचे पॅनलने दिलेल्या गुणांची बेरीज करून तालुका पातळीवरील विजेता घोषित करण्यात येईल.

राज्यस्तरीय पारितोषकाचा निर्णय देण्यासाठी पानी फाउंडेशनद्वारा परीक्षकांचे ज्येष्ठ पॅनल नियुक्त करण्यात येईल. ऍपमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार आणि पानी फाउंडेशन टीमने त्या माहितीची चेकिंग केल्यानंतर, परीक्षकांचे पॅनल फक्त राज्य पातळीवर विजेते ठरू शकणार्‍या गावांना भेट देवून अंतिम तपासणी करेल. ऍपमध्ये दिलेले गुण आणि परीक्षकांचे पॅनलने दिलेल्या गुणांची बेरीज करून राज्य पातळीवरील विजेते घोषित करण्यात येतील.

या स्पर्धेमध्ये भाग घेणारी सर्व गावं कटाक्षानं ही अट पाळतील की परिक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागी गावांवर बांधील असेल.

बक्षिसाची रक्कम ही ग्राम पंचायतीला देण्यात येईल. विजेते गाव जरी महसुली गाव असले, तरी ही रक्कम ग्राम पंचायतीला देण्यात येईल. सोबत ग्राम पंचायतीला पत्र देण्यात येईल की ही रक्कम फक्त त्या महसुली गावावारच खर्च व्हावी.

बक्षिसाची रक्कम कशी वापरावी हे फक्त ग्राम सभेच्या (शक्य तोवर एकमताने) ठरावाने निश्चित केले जाऊ शकते. आमचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की बक्षीस मिळाल्यामुळे गावात प्रचंड उत्साह निर्माण होतो, अनेक गावकऱ्यांना प्रेरणा मिळते. परंतु काही ठिकाणी बक्षिसाच्या रकमेवरून वाद देखील निर्माण होतात. या वादामुळे गावाने कष्टाने कमावलेली एकी भंग होते. त्यामुळे गावाचा विकास खंडीत होतो. हे टाळण्यासाठी संपूर्ण गावाला विश्वासात घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे बक्षिसाच्या रकमेचा खर्च कसा करावा, कोणत्या कामावर करावा, कुठे करावा या सर्व तपशीलावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभेत (शक्य तोवर एकमताने) ठराव पास करून यावर निर्णय घ्यावा. महसुली गावाने याच पद्धतीची गाव सभा घेणे गरजेचे आहे.

कृपया लक्षात ठेवा: वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाला पाण्याने स्वयंपूर्ण होण्याची संधी असते. आणि तेच खऱ्या अर्थाने एक मोठे आणि महत्त्वाचे बक्षीस आहे. वॉटर कप स्पर्धेत मनापासून सहभागी झालेल्या प्रत्येक गावाचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. स्पर्धेसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा!