SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

 

पानी फाउंडेशन विषयी

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली पानी फाउंडेशन ही एक ना–नफा तत्वावर काम करणारी (not-for-profit) कंपनी आहे. पानी फाउंडेशनमध्ये सत्यमेव जयतेच्या कोअर टीमचा समावेश आहे. पानी फाउंडेशनचे सी.ई.ओ. आहेत सत्यजित भटकळ (दिग्दर्शक: सत्यमेव जयते) आणि सी.ओ.ओ. आहेत रीना दत्ता.

पानी फाउंडेशनची गरज का आहे?

भारतात पाणी ही मोठी समस्या आहे आणि संधीही. पाण्याच्या दुर्भिक्षाने अनेक आयुष्यांची अक्षरशः वाताहत होते तर पाण्याच्या मुबलकतेनं प्रत्येक मानवी आयुष्यात अनेक सामाजिक आणि आर्थिक सुसंधी निर्माण होतात. ज्या गावात मुबलक पाणी असेल त्या गावातील लोकांची शैक्षणिक पातळी उच्च असते. आणि ती लोक पाण्याची टंचाई असलेल्या गावांच्या तुलनेत अधिक आरोग्यसंपन्न, दीर्घायू आणि भक्कम आर्थिक स्थितीत असतात.

भारतात पाणी संकट आहे का?

जगातील अनेक राष्ट्रांच्या तुलनेत भारत हे पुरेसं पाणी असणारं राष्ट्र आहे. इथे कधी अति मुबलकता नव्हती किंवा दुर्भिक्षही नव्हतं. गरजेपुरतं पाणी होतं पण आज लोकांना प्यायला ही पाणी नाही, शेतकरी दुष्काळाला आणि उपासमारीला तोंड देत आहेत आणि कित्येक कारखाने बंद होत आहेत किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांची वाढ होवू शकत नाही आहे.

हे संकट का आहे?

हे संकट मुख्यत्वे मानवनिर्मित असून याची चार मुख्य कारणे आहेत.

अ. प्रदूषण: आपण आपल्या नद्या आणि तलाव प्रदूषित केले आहेत.

आ. अति-शोषण: भूगर्भातल्या पाण्याचे पुनर्भरण न करता आपण अतिशय बेपर्वाईने भूगर्भातल्या पाण्याचा उपसा केलेला आहे, ज्यामुळे भूगर्भातील पाण्याचा स्तर आपत्तीजनक स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे.

इ. पाण्याचं अविवेकी व्यवस्थापन: जसे की दुष्काळ प्रवण भागात भयंकर जास्त पाणी लागणाऱ्या उसाचं पिकं घेणं.

ई. हवामान बदल: पाऊस पडणारं क्षेत्रफळ आणि कालावधी दोन्ही कमी होत चाललेत. पावसाचे दिवस कमी होत आहेत. पाऊस काही विशिष्ट भागांपुरताच मर्यादित राहिलाय आणि एक मोठ्ठा जनसमुदाय दुष्काळग्रस्त बनलाय.

यावर उपाय आहे का?

मुख्य उपाय आहे स्थानिक पातळीवर पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवणं आणि जिरवणं. त्याद्वारे भूगर्भपातळीत वाढ करणं आणि वाहून गेल्यामुळे तसंच बाष्पीभवनामुळे होणारं पाण्याचं नुकसान टाळणं. एका शब्दात सांगायचं तर हा उपाय आहे ‘पाणलोट व्यवस्थापन’!

अगदी स्वस्त आणि खूपच मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणारा असा हा उपाय आहे पण देशाच्या फक्त काही भागातील गावांनीच हा उपाय केला आहे. हा उपाय प्रचंड मोठ्या संख्येने जास्तीत जास्त गावांनी अवलंबिला पाहिजे, हे आपल्यासमोरचं आजचं आव्हान आहे. भारतातील प्रत्येक गावाने, नगराने, शहराने पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं गरजेचं आहे. त्याशिवाय पाण्याचं प्रदूषण थांबवणं आणि पाण्याचा अनिर्बंध वापर रोखणे हे ही अत्यंत गरजेचं आहे.

पानी फाउंडेशन काय करणार आहे?

सुरुवातीला पानी फाउंडेशन फक्त महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येवर काम करणार आहे.

महाराष्ट्र सरकारने गावपातळीवर पाणलोट व्यवस्थापन करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. यांतर्गत अनेक स्वयंसेवी संस्था आणि कार्पोरेट कंपन्यानी अनेक गावं दत्तक घेतली आहेत. आणि गावकऱ्यांच्याच मदतीने त्या गावांमध्ये स्थानिक पातळीवर जलसंवर्धनाच काम ते करत आहेत. ही सर्व काम तर महत्वाची आहेतच पण याचबरोबर आम्ही पाण्याच्या या आव्हानाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून भिडण्याचा प्रयत्न करतोय.

आमचा हा विश्वास आहे की पाण्याची समस्या सोडवण्याची सर्वात मोठी शक्ती आणि क्षमता लोकांमध्येच आहे. एकदा का लोकांना ही गोष्ट मनापासून पटली आणि ते प्रेरित झाले मग त्यांच्या त्यांच्या भागात पाणी अडवायला आणि साठवायला जे जे उपाय आवश्यक असतील, लोक ते ते उपाय शोधतील आणि करतीलही. अपुऱ्या पाण्याच संकट दूर करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना जो मोठ्या प्रमाणावर वेग द्यावा लागणार आहे त्यासाठी यापेक्षा वास्तवदर्शी उपाययोजना कदाचित दुसरी असू शकत नाही.

पानी फाउंडेशन तीन प्रमुख आघाड्यांवर ठोस काम करणार आहे:

अ. प्रेरणा: लोकांना याची खात्री पटायला हवी की स्थानिक पातळीवर पावसाचं पाणी वाचवणं हाच जलसुरक्षेचा खात्रीशीर मार्ग आहे. शेतकरी, उद्योगपती, लहान-मोठा प्रत्येक नागरिक या चळवळीचा एक भाग झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही भवना रुजली पाहिजे की या कामात माझी एक महत्वाची भूमिका असणार आहे आणि ती मी सहज आणि हसत खेळत पार पाडू शकणार आहे. 

पानी फाउंडेशन जनसंपर्काच्या प्रत्येक माध्यमाचा व डिजिटल मिडीयाचा वापर करत लोकांचं मनोरंजनातून शिक्षण करेल त्याद्वारे त्यांना प्रेरित करेल आणि या चळवळीशी त्याचं एक भावनिक नातं प्रस्थापित करेल.

आ. प्रशिक्षण: पानी फाउंडेशन प्रत्येक गावातील पाच लोकांना पाणलोट व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्याचं काम करील. या संपूर्ण प्रक्रियेत साधारण अडीच लाख लोक हे प्रशिक्षण पूर्ण करतील. या प्रशिक्षणाचे दोन प्रमुख घटक असतील:

१) पाणलोट विकास आणि जलसंवर्धन योजनांच तांत्रिक प्रशिक्षण

२) आपापल्या गावातील पाणलोट योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी साठी गावातील सर्व लोकांची एकजूट घडवून आणणारे सक्षम नेतृत्व निर्माण करणे

इ. संसाधनांसाठीचं व्यासपीठ: पानी फाउंडेशन एक डिजिटल व्यासपीठ निर्माण करेल ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पुढील गोष्टी सहज शक्य होतील:

– माहितीगार आणि तज्ञ लोकांकडून तांत्रिक माहिती मिळवणे.

– लोक समुहाकडून निधींच संकलन करणे.

– सरकारी मदत मिळवणे व सरकारसोबत जोडलं जाणे.

– मार्गदर्शकांच्या ज्ञानाचा फायदा घेणे.

– स्वयंसेवकांसोबत जोडल जाणे.