SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

पानी फाउंडेशनचे अंबाजोगाई तालुक्यातील कोऑर्डिनेटर इरफ़ान शेख उलगडत आहेत त्यांचे समृद्ध अनुभव वॉटर कप स्पर्धेदरम्यानचे.वॉटर कप: जलसंधारण ते मनसंधारण

“श्रमदान? असं काही आमच्याकडे होत नाही हो!” असं म्हणणारेच मोठ्या उत्साहाने हातात टिकाव-टोपल घेऊन दुष्काळाशी दोन हात करायला भिडले आणि बघता बघता विकासाचं एक नवं मॉडेल, एक नवीन पद्धत सिद्ध झाली. होय! सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही विकासाची एक नवीन संकल्पना ठरली आहे. जी वेगवेगळ्या ३ तालुक्यातील (प्रदेशातील) ११६ गावात राबली आणि सिद्ध झाली.

फक्त ४५ दिवसांत एखादं गाव कात टाकून कसं ‘अशक्य ते शक्य’ करतं हे पाहायचं असेल तर वॉटर कप स्पर्धेतील राडी तांडा, खापरटोन, पाटोदा, कुंबेफळ, कोळ कानडी, शेपवाडी इत्यादी गावांना भेटी देऊन पहा. आम्हाला खूप वेळा विचारणा झाली, पानी फाऊंडेशनने या गावांना काय दिलं? याचं उत्तर आज द्यावसं वाटतं. पानी फाऊंडेशननी या गावांना आत्मभान-आत्मविश्वास दिला.

माझे मित्र दिलीप मोटे नेहमीच म्हणतात “कुणाला काही द्यायचच असेल तर सर्वप्रथम आत्मविश्वास द्या.” आणि पानी फाऊंडेशनने या गावांना हा आत्मविश्वास दिला कि “भावा! तू लढ, समदं नीट होईल बघ, अन हे जर तू केलास तर हामी बक्षीस बी देवू!”

रामायणात तुम्ही हे ऐकलं/वाचलं असेलच की हनुमान जेंव्हा सीतेला भेटण्यासाठी समुद्र पार करणार होते त्यापूर्वी जांबुवंतांनी त्यांना आत्मविश्वास दिला कि हा सागर तुम्ही एका उड्डाणात पार कराल आणि मग हनुमान आत्मविश्वासाने उड्डाण करून लंकेला गेले. तात्पर्य काय कि आत्मविश्वास निर्माण झाला किंवा करता आला तर स्वत:ला सामान्य म्हणवणारी माणसं सुद्धा असामान्य काम करू शकतात.

वॉटर कप स्पर्धेदरम्यान एकट्या अंबाजोगाई तालुक्यात सरासरी ४२०३ लोकांनी ४५ दिवस श्रमदानातून जवळपास १ कोटी रुपयांची कामे केली. हे अशक्य वाटतं ना? मग एक साधं गणित करूया.

३४ गावातील ४२०३ लोकांनी नियमित सरासरी २ तास श्रमदान केलं. अखंड श्रमदान व महाश्रमदान वगळून हे सलग ४५ दिवस चाललं. काही गावांनी यापेक्षा जास्त काळ केलं. रोजगार हमीचा शासकीय दर प्रती मनुष्य दिवसाला  १९१ रु. आहे. मग यानुसार  ४२०३ x ४५ x १९१=३६१२४७८५ रु. येतात.

पण आपण सरासरी २ तास पकडले आहेत त्यामुळे याच्या एक चतुर्थांश जरी रक्कम पकडली तर ती येते ९०३११९६.२५ रु. म्हणजे जवळपास १ कोटी रुपयांची कामे श्रमदानातून झाली आहेत.

याला साथ मिळाली ती समस्त महाजन ग्रुप, मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी व जलयुक्त शिवार अभियानाची. हे अतुल्य आहे. समस्त महाजन परिवाराचे गिरीशभाई शहा म्हणाले की “यह एक विकास यज्ञ है, हर कोई अपनी तरह से इसमे आहुती देते रहे – यह आवश्य सफल होगा|” आणि त्यांचे शब्द खरे ठरले.

इथे एक विशेष बाब पुन्हा उद्धृत झाली कि जर चांगल्या कामांना सुरुवात केली तर देणार्‍यांचे हात हजारो पुढे येतात. अंदाजे जवळपास १३ कोटीहून अधिकची कामे वॉटर कप स्पर्धेदरम्यान वेगवेगळ्या लोकवर्गणीतून पूर्ण झाली ती फक्त अंबाजोगाई तालुक्यातील आहेत आणि याहून मोठी गोष्ट म्हणजे अब्जावधी लिटर पाणीसाठा जमिनीत मुरत आहे.

पहिला पाऊस नुकताच बरसला आणि गावच्या गाव नदी-नाल्यांकडे धावू लागले. सगळे पाहत होते कि आपण जिथे घामाच्या धारा गाळल्या तिथे वरुण राजा मोत्यांच्या धारांनी साचला आहे. उदाहरणादाखल सांगतो श्रीपतरायवाडीचं पाणी वरपगाव शिवारात थेंब गेल नाही, वरपगाव परिसराचा थेंब शिव ओलांडून कोळ कानडी परिसरात गेला नाही, असंच कोळकानडीचं माकेगावला गेलं नाही आणि माकेगावचं पाटोदा शिवारात गेलं नाही आणि पाटोदाची होळणा देवळ्याला वाहिली नाही.

प्रत्येकाच्या शिवरातील पाणी-शिवारात मुरलं. तिथे थांबलेले आजोबा म्हणाले ”साहेब मागच्या वर्षी पहिला पाऊस याच्याहुन मोठा पडला होता पण नदीत थेंब साचलं नव्हतं बघा, असं साठलेल पाणी पाहून लई वर्ष झाली बघा.” त्यांचा उत्साह, त्यांचे आनंदी चेहरे, त्यांचे शब्दात वाहणारे अभिमान, सर्वच अतुल्य! होय अगदीच अतुल्य!

प्रसाद दादा म्हणाले कि मी मागे कोळ कानडीला नदीचं खोलीकरण करून गेलो होतो पण कुणी साधी विचारणाही केली नाही कि तुम्ही कोण? हे काय करता? पण आता सगळे जागरूक झाले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जलसंधारणा बाबत प्रचंड जागरूकता निर्माण झाली. लोक रोज पडणारा पाऊस मि.मी. मध्ये मोजतात आणि किती कोटी लिटर पाणी साचलं हे सांगतात.

हीच माणसं मागे काही दिवसांपूर्वी हंडा-घागर घेऊन पाणी पाणी करत फिरत होती, टँकरची वाट पाहत दुसर्‍यांना दूषण देत होती कि करते करविते काहीच करत नाहीत. पण आता प्रत्येकाला हा आत्मविश्वास आहे कि संकट कसेही असो आपण आता त्याच्याशी भिडू शकतो.

वॉटर कप स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे, जलसंधारण करणे, जलसाक्षरता निर्माण करणे पण यासोबतच अनेक अनेक सामाजिक-आर्थिक फायदे निर्माण होत आहेत:

 • गावची तरुण पिढी विधायक कामात वेळ खर्च करताना लढत आहे, जिंकत आहे.
 • निराश झालेला माझा बाप शेतकरी पुन्हा एकदा निश्चयाने उभा आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यातील या स्पर्धक गावात स्पर्धा कालावधी दरम्यान एकही शेतकरी आत्महत्या झाल्याचे माहीत नाही किंबहुना झाली नाही. हा निव्वळ योगायोग कसा असेल?
 • गाव-सामान्य नागरिक आणि प्रशासन यांचे नाते अधिक घट्ट झाले. मा. जिल्हाधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ते गावचे ग्रामसेवक पर्यन्त सगळी साहेबमंडळी आपल्यात येतात, आपल्या सोबत श्रमदान करतात. आपल्यासाठी काम करत आपलेच होऊन जातात हा आनंद गगनात न मावणारा आहे.
 • ग्रामसभा हा विकासाचा केंद्रबिंदू पुन्हा ठरायला लागल्या. दिवसच नव्हे तर रात्री सुधा तांडा-पाड्यावरील ग्रामसभा अगदी उत्तम व्हायला लागल्या.
 • गावच्या महिला इतक्या मोठ्या प्रमाणात या अगोदर दारू बंदीसाठी बाहेर पडल्या होत्या. आता त्या पाण्यासाठी एकत्र श्रमदान करायला बाहेर आल्या आणि दारूबंदी आपोआप झाली. प्रत्येक गावातील श्रमपूजक महिलांची संख्या लक्षणीय होती.
 • बांध-बंदिस्तीचे वाद आपोआप कमी झाले.
 • ग्रामीण पोलिस स्टेशनचे आमचे मित्र म्हणाले कि स्पर्धा कालावधी दरम्यान या स्पर्धक गावांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी झाले, वाद-तंटे अत्यल्प झाले. आणि ग्रामीण पोलिसांची सर्व टीम  स्वत: श्रमदानात सहभागी झाली.
 • स्पर्धा कलावधीत सर्वपक्षीय नेते मंडळी गावागावात जाऊन श्रमदानात सहभागी झाली यामुळे लोकांचा श्रमदानाचा उत्साह आणखी वाढला.
 • आपलं गाव, आपण टि.व्ही. वर दिसतोय हा आनंदच निराळा हो! कित्येकजण श्रमातून हीरो झाले. एबीपी माझा वर ‘दुष्काळाशी दोन हात’ पाहणे हा आवडीचा भाग झाला.
 • उन्हाळ्याच्या सुट्ट्या सत्कारणी लागल्या. अनेक विद्यार्थी या श्रमदानात सहभागी झाले. श्रमसंस्कार अनेकांच्या मनावर बिंबवले गेले.
 • शहरातली माणसं गावात येवून गावचे ऋण फेडताना दिसली. अनेकजण श्रमदानात सहभागी झाले अनेकांनी लाखोंची मदत करून आपल्या गावाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.
 • श्रमदानाने श्रमाची संकल्पना बदलून टाकली. श्रमदान करून लोक थकली नाहीत तर झिंगाट झाली. श्रमदान हा सोहळा झाला.
 • जीम ला जाण्यापेक्षा श्रमादानातून कसदार शरीरं बनायला लागली.
 • जल संधारण हे आपले काम आहे आणि हे तुटले-फुटले तर त्याची दुरूस्ती हा आपली जवाबदारी  आहे. हे पटल्याने अनेकांनी याच्या संगोपनासाठी  लोकवर्गणीची खाते काढली.
 • अखंड श्रमदान-महा श्रमदान असा श्रमदानाचा सोहळा साजरा झाला, तो असाच सुरू राहणार आहे.
 • या स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांना देशभक्ती साजरा करण्याचे एक उत्तम माध्यम मिळाले. असे एक न अनेक फायदे, परिणाम पहायला मिळत आहे.
 • धानोर्‍याचे आमचे श्रमपूजक मित्र बापू पाटील म्हणाले “साहेब बक्षीस म्हणून आम्हाला पाणी तर मिळालच पण यात आम्हाला एक शिकायला मिळालं, ‘संकट कितीही मोठं असो आम्ही ४ पोर उठून उभे राहिलो कि कशाला बी भिडायला तयार आहोत. आपण उठलो आणि कामाला लागलो कि सगळं गाव आपल्या सोबत येतं, हे लई पटलं बघा.”

हे मनसंधारण नव्हे तर काय? म्हणून म्हणतो सत्यमेव जयेत वॉटर कप ही स्पर्धा फक्त जलसंधारण नव्हे तर मनसंधारणही करते.


 

सत्यमेव जयते वॉटर कप – प्रवास (PPT)